‘डेव्हिड अलेक्झांडर सेसिल लो’ हे व्यंगचित्रकार डेव्हिड लो यांचे पूर्ण नाव. चार भावंडांमधले हे तिसरे होते. त्यांच्या मोठ्या भावाचे एका आजाराने निधन झाले. या निधनाचे कारण ‘अति अभ्यास’ असावे, असे डेव्हिड यांच्या पालकांना वाटू लागले. त्यामुळे डेव्हिड यांना वयाच्या अकराव्या वर्षी शाळेतून काढण्यात आले. शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी यांच्या अभावी डेव्हिड यांच्यावर हवा तसा प्रभाव पडला नाही. मग डेव्हिड यांनी स्वतःतच प्रेरणा शोधली आणि कारकिर्दीस प्रारंभ केला.
डेव्हिड यांचा जन्म न्यूझीलंड मध्ये झाला; पण युनायटेड किंगडम देशात काम करून त्यांनी व्यंगचित्रांच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळवली. व्यंगचित्र शिकण्यासाठी त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतले नाही. त्यांनी काढलेली व्यंगचित्रे ही स्वयंस्फूर्त होती.
११ वर्षांचे असताना त्यांचं पहिलं व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं. व्यंगचित्राचा विषय होता ‘स्थानिक अधिकाऱ्यांनी ट्रॅफिकच्या कारणामुळे तोडलेल्या झाडांबाबत डेव्हिड आणि इतर अनेक नागरिकांची नाखुषी!’ अनेक राजकीय वृत्तपत्रांसाठी त्यांनी व्यंगचित्रकार, हास्यचित्रकार म्हणून काम केले. त्यांच्या कारकीर्दीतील काही महत्त्वाच्या व्यंगचित्रांचा आढावा घेऊया.
१. पहिल्या महायुद्धाच्या काळात डेव्हिड हे ऑस्ट्रेलियन सरकारच्या विरोधात गेले. महायुद्धाच्या परिस्थितीतही १९१७ मध्ये झालेल्या निवडणुकीत त्याच सरकारला विजय मिळाला. सरकारने देशाकडे लक्ष द्यावं कि लष्कराकडे, यासाठी जनमत घेण्याची वेळ आली. यावर डेव्हिड यांनी एक हास्य चित्र काढले. पण सेन्सॉरशिपमुळे ते प्रसिद्ध करण्यात आले नाही. या घटनेवर आधारित डेव्हिड यांचे व्यंगचित्र.
२. जेव्हा कामानिमित्ताने डेव्हिड ब्रिटनला आले, तेव्हा ‘डेव्हिड लॉईड जॉर्ज’ हे युती सरकारचे पंतप्रधान होते. लिबरल पक्षाचे सदस्य असले, तरी जॉर्ज हे कंझर्व्हेटीव्ह पक्षाच्या पाठिंब्यावर अवलंबून होते. इथेच सगळं अडत होतं! शिक्षण, गृहनिर्माण, आरोग्य, वाहतूक अशा सुधारणांचे जॉर्ज यांनी आश्वासन दिले तरीही ही युती सरकारमधील इतरांना ही कामे करण्याची इच्छा नव्हती. यावर आधारित डेव्हिड लो यांनी काढलेले व्यंगचित्र..
३. ऑक्टोबर १९३३ मध्ये जिनेव्हा निःशस्त्रीकरण परिषदेत जर्मनीला माघार घेण्याच्या हिटलरने घेतलेल्या निर्णयाला डेव्हिड लो यांनी व्यंगचित्रातून उत्तर दिले. वरून साधेपणाचा आणि मित्रत्वाचा आव आणणारे राजकीय मैत्रीला कसे नाकारू शकतात, यांचे वर्णन व्यंगचित्रात केले आहे.
४. ब्रिटिश गव्हर्मेंटचा हिटलरला मिळणारा प्रतिसाद डेव्हिड यांना पचनी पडत नव्हता. १९३४ मध्ये हिटलरने नाझी पार्टी मधील अनेक लोकांना अत्यंत घृणास्पदरित्या मारले. हिटलरच्या काही तत्त्वांना विरोध करणारे हे लोक होते. नाईट ऑफ द लॉंग नाईफ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या घटनेचे व्यंगचित्र डेव्हिड लो यांनी काढले. त्यामुळे हिटलरचा रोष लो यांना पत्करावा लागला.
५. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटिश नागरिकांना प्रेरणा देण्यासाठी लो यांनी पुढील व्यंगचित्र रेखाटले. व्यंगचित्राचे नाव होते ‘ऑल बिहाईंड यु, विंस्टन’!
६. दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडात डेव्हिड बरेच गाजले. यांनी व्यंगचित्रांच्या मार्फत महायुद्धातील खरी परिस्थिती लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. त्यातील काही व्यंगचित्रे:
‘पाश्चात्त्य जगाचा व्यंगचित्रकार’ अशी डेव्हिड लो यांची जगभर ओळख आहे. व्यंगचित्र रेखाटताना समाजातील व्यंगांचा प्रखर अभ्यास करण्याचे कौशल्य त्यांनी उपयोगास आणले. १९६३ साली त्यांचा मृत्यू झाला.. परंतु पाश्चात्य जगातील व्यंग आत्मविश्वासाने सर्वांसमोर आणणाऱ्या डेव्हिड लो यांना विसरणे अशक्यच. ते व्यंगचित्रांच्या माध्यमातून कायम अमर राहतील!
- संकलन आणि शब्दांकन : सोनल सुर्वे