पणत्यांचा मंद प्रकाश, विद्युत रोषणाईचा झगमगाट, फराळाचा घमघमाट, रंग बे रंगी रांगोळीची आरास, आकाशकंदिलाचा रुबाब, फटाक्यांची आतिषबाजी या सर्व गोष्टी एकत्र आल्या म्हणजे समजावे की, सगळ्यांचा लाडका आणि आवडता सण दिवाळी आला आहे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण. तिमिरातून तेजाकडे जाण्याची अमूल्य शिकवण देणारी दिवाळी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचा आवडता सण आहे. आपण वसुबारस साजरी केली आज धनत्रयोदशी साजरी करत आहोत.
धनत्रयोदशीला छोटी दिवाळी देखील म्हटले जाते. या दिवशी कुबेर, लक्ष्मी आणि धन्वंतरी यांनी पूजा करून आशीर्वाद प्राप्त केला जातो. त्यानंतर येते ती नरक चतुर्दशी. नरक चतुर्दशी ही कधी कधी वेगळी येते किंवा लक्ष्मीपूजनासोबतच येते. या दिवशी अभ्यंगस्नानाला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवाळीचे एक वैशिष्ट्य म्हणून देखील अभ्यंगस्नान ओळखले जाते. थंडीची चाहूल लागत असताना सकाळी सूर्योदयापूर्वी उठून साग्रसंगीतपणे अंघोळ करणे म्हणजे अभ्यंगस्नान होय.
दिवाळीला अभ्यंगस्नानाची परंपरा आहे. पहाटे उठून अंगाला तेल व उठणे लावून, मग अंघोळ केली जाते यालाच अभ्यंगस्नान, असे म्हणतात. काही ठिकाणी या दिवशी अंघोळ झाली की घरातील पुरुषांना स्त्रिया कणकेचा दिवा करून ओवाळतात देखील. आयुर्वेदामध्ये अभ्यंगस्नानाला फार महत्त्व आहे. त्याला गंगा स्नान, थैला स्नान असेही म्हणतात. नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने यमाचे भय नाहीसे होते, असे मानले जाते. अभ्यंगस्नान योग्य वेळी केले तर त्याचे विशेष पुण्य प्राप्त होते. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेच दिवाळी साजरी होते आणि फटाके फोडले जातात.
हिंदू मान्यतेनुसार, जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते मृत्यूनंतर नरकात जात नाही, आणि त्यांची सर्व पापातून मुक्तता होते. नरक चतुर्दशी त्याच दिवशी किंवा कधीकधी लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी साजरी केले जाते. अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी करावे, नरक चतुर्दशीच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने अंधार दूर होतो. या दिवशी अभ्यंग स्नान करताना दिवे लावावे. सर्वांगाला सुवासिक तेल आणि उटणे लावून सुवासिक साबणाने अंघोळ केली जाते.
धनत्रयोदशीच्या दिवसाप्रमाणे अनेक ठिकाणी नरक चतुर्दशीला देखील यमदीप लावला जातो. नरक चतुर्दशीला संध्याकाळची पूजा केली जाते आणि यमदीप प्रज्वलित केला जातो. असे केल्याने नरकातून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. या दिवशी पाण्याजवळ किंवा नाल्याजवळ दिवा लावल्याने माणसाला नरक भोगावे लागत नाही, असे सांगितले जाते.
नरक चतुर्दशीचे अजून एक महत्व म्हणजे, या दिवशी कृष्ण, सत्यभामा आणि काली यांनी नरकासुर राक्षसाचा वध केला. आणि नरकासुराच्या कैदेतून सोळा हजार मुलींची सुटका करून त्यांचा सन्मान केला होता. त्या दिवसाला ‘नरक चतुर्दशी’ असे म्हणतात. या दिवशी सकाळी अंघोळ झाली की, नवीन वस्त्रे परिधान करतात. आणि देवळात जाऊन कृष्णाचे किंवा विष्णूंचे दर्शन घेतात. संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी करून उत्सवाचा आनंद लुटला जातो.
नरक चतुर्दशीची कथा
रंती देव नावाचा एक पुण्यवान आणि धार्मिक राजा होता. नकळतही त्याने कोणतेही पाप केले नव्हते, पण जेव्हा मृत्यूची वेळ आली तेव्हा त्याच्यासमोर यमदूत उभे राहिले. समोर यमदूत पाहून राजा आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला की मी कधीही कोणतेही पाप केले नाही, मग तुम्ही लोक मला न्यायला का आला आहात कारण तुमचे इथे येणे म्हणजे मला नरकात जावे लागेल. माझ्यावर दया करा आणि मला सांगा की माझ्या कोणत्या अपराधामुळे मी नरकात जात आहे. पुण्यवान राजाचा धीर देणारा वाणी ऐकून यमदूत म्हणाला, राजा, एकदा एक भुकेलेला ब्राह्मण तुझ्या दारातून परत आला, त्या पापकर्माचे हे फळ आहे.
==========
हे देखील वाचा : धनत्रयोदशीला पूजा केले जाणारे धन्वंतरी आहे कोण?
==========
दूतांच्या या विनंतीवर राजा यमदूताला म्हणाला की, मी तुम्हाला वर्षभराचा अधिक वेळ देण्याची विनंती करतो. यमदूतने राजाला एक वर्षाची कृपा दिली. राजाने आपला त्रास ऋषीमुनींना सांगितला आणि त्यांना विचारले की, या पापातून मुक्त होण्याचा मार्ग काय आहे. ऋषी म्हणाले, हे राजा, तू कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला व्रत पाळावे आणि ब्राह्मणांना भोजन करून इतरांविरुद्ध केलेल्या अपराधांची क्षमा मागावी.
ऋषींनी सांगितल्याप्रमाणे राजाने केले. अशा प्रकारे राजा पापमुक्त झाला आणि त्याला विष्णूच्या जगात स्थान मिळाले. त्या दिवसापासून पाप आणि नरकापासून मुक्तीसाठी कार्तिक चतुर्दशीचे व्रत भुलोकात प्रचलित आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तेल लावणे आणि चिरचिरीची पाने पाण्यात टाकणे आणि त्यात आंघोळ करण्याचे मोठे महत्त्व आहे. स्नानानंतर विष्णू मंदिर आणि कृष्ण मंदिरात देवाचे दर्शन घेणे खूप पुण्यकारक आहे, असे म्हणतात. याने पाप नाहीसे होते आणि सौंदर्याची प्राप्ती होते.