महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल 23 नोव्हेंबर रोजी लागले. त्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीला भरभरून यश मिळाले. भाजपाच्या पद्धतीनुसार या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी आणि मतदारांचे आभार मानण्यासाठी नवी दिल्लीतील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या मेळाव्याला मार्गदर्शन केले. त्यांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी जे एक संबोधन वापरले ते पुढील दिशा स्पष्ट करणारे होते. अन्य प्रमुख नेत्यांची नावे घेऊन झाल्यावर ते म्हणाले, “मेरे परममित्र देवेंद्र फडणवीस” नरेंद्र मोदी यांचे भारतीय राजकारणातील आजचे स्थान पाहिले तर अशा प्रकारचे संबोधन वापरले जाणे कुठल्याही नेत्यासाठी अत्यंत मानाची गोष्ट म्हणावे लागेल. त्यामुळे राज्यातले देवेंद्र उद्या केंद्रातले नरेंद्र होऊ शकतात का, जाणून घेऊया. (Devendra Fadnavis)
खरे तर मोदी यांच्या परममित्र या एका वाक्यातच फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार, हे पक्के झाले होते. फक्त त्यावर अधिकृततेची मोहर उमटण्यासाठी दहा दिवस लागले. दीर्घ प्रतीक्षेनंतर गुरुवारी गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी फडणवीस यांच्या नावाची घोषणा केली. अशा रीतीने राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणून तिसऱ्यांदा फडणवीस ‘ परत आले आहेत’. इतकेच नाही तर ज्या मोदी यांनी त्यांना परममित्र म्हणून संबोधले, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. 2014 हे वर्ष भारतीय राजकारणाच्या दृष्टीने एक मैलाचा दगड ठरणारे वर्ष होतं. काँग्रेसची दशकभराची राजवट संपवून नरेंद्र मोदी यांनी भाजपाला एकहाती सत्ता मिळवून दिली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत पातळीवर भारताला एक सन्मानाचे स्थान मिळवून देण्याच्या दिशेने त्यांनी पावले टाकायला सुरुवात केली. मे महिन्यात त्यांनी घडविलेल्या या ऐतिहासिक सत्तांतरानंतर सहा महिन्यांच्या आत भाजपाने महाराष्ट्रात सर्वाधिक जागा मिळवून सत्ता संपादन केली. देवेंद्र फडणवीस या तरुण तडफदार नेतृत्वामुळे भाजपा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला. (Political Updates)
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा महाराष्ट्राचं राजकारण आणि व्यवस्था तसे बिघडलेच होते. राज्याच्या काही भागांमध्ये तीन वर्षे दुष्काळ पडला होता. त्यामुळे पदावर आल्या आल्या त्यांनी प्रशासनाला गती देण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी मार्ग पत्करला तो लोकांना आपल्या कामात सहभागी करून घेण्याचा. हे सरकार आपले आहे आणि आपण त्याचे भागीदार आहोत, ही भावना लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी त्यांनी कंबर कसली. उदाहरणादाखल, प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी सुरू केलेली मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम. युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनासाठी उपयोग व्हावा, असा स्तुत्य उद्देश घेऊन ही योजना सुरू झाली. मोदी यांनी आधी गुजरातमध्ये व नंतर केंद्र पातळीवर अनेक कल्पक आणि नाविन्यपूर्ण योजना राबविल्या. त्याच धर्तीवर फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी विविध प्रकल्प आखले. अनेक योजना राबवायला सुरुवात केली. त्याच बरोबर राजकीय नेतृत्व म्हणून फडणवीस यांनी सर्व प्रतिकूलतांवर मात करत सर्व समाज घटकांमध्ये व वर्गांमध्ये आपली विश्वासार्हता निर्माण केली. जलयुक्त शिवार अभियानाद्वारे राज्यातील सुमारे 5 हजार गावे दुष्काळमुक्त करण्याच्या निर्धार त्यांनी व्यक्त केला होता. राजेंद्रसिंह यांच्यासारख्या जलतज्ज्ञानेही या प्रकल्पाची प्रशंसा केली होती. दुर्दैवाने 2019 मध्ये निवडणुकीनंतर राजकारणाला वेगळे वळण लागले. (Devendra Fadnavis)
गेल्या वर्षी विधिमंडळात खुद्द उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले, की जलयुक्त शिवार अभियानाची कामे नीट झाली असती तर राज्याला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागला नसता. गुजरातचे मुख्यमंत्री झाले तेव्हा मोदी हे तसे राज्याच्या राजकारणात नवखे होते. ते कधी आमदारसुद्धा झाले नव्हते. फडणवीस यांचीही परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. ते आमदार असले तरी गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी यांच्यासारखे दिग्गज नेत्यांसमोर ते झाकोळून गेले होते. त्यांच्याकडे राजकीय वारसाही नाही. असलाच तर तो कार्यकर्त्याचा वारसा आहे. परंतु फडणवीस यांनी ते साध्य करून दाखविले. सध्या नगरसेवक पदापासून ते मुख्यमंत्री असा प्रवास त्यांनी केला तो सर्वांना बरोबर घेऊन ! गुजरातचे मुख्यमंत्री असताना व त्यानंतर पंतप्रधान झाल्यावरही मोदी यांना अनेक शाब्दिक हल्ले आणि कठोर टीकेला सामोरे जावे लागले. फडणवीस यांच्याही वाट्याला तीच परिस्थिती आली. ते मुख्यमंत्री असताना मित्रपक्ष म्हणून येणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी त्यांना धारेवर धरले होते. मात्र मोदी यांच्याप्रमाणेच फडणवीसही या टीकेला पुरून उरले. तुम्ही जे शिव्या शाप देता तीच माझी ऊर्जा आहे, असे मोदी यांनी संसदेत सांगितले होते. ती उक्ती फडणवीस यांनी खरी करून दाखविली. आपल्यावरील सर्व टीकेला त्यांनी शब्दातून नव्हे तर कृतीतून उत्तर दिले. (Political Updates)
विरोधी पक्षनेता असताना फडणवीसांनी तेव्हाच्या आघाडी सरकारच्या कारभाराचे वाभाडे अनेकदा काढले होते. त्यांच्या व्यासंगी नेतृत्वाची प्रचिती तेव्हाच सर्वांना आली होती. परंतु विरोधी पक्षनेता म्हणून आक्रमकता दाखविणे वेगळे आणि शासक म्हणून सर्वसमावेशकता बाळगणे वेगळे. त्यामुळे मोदी यांनी मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली, तेव्हा ते आपला प्रभाव पाडू शकतील का, अशी शंका सगळ्यांनीच व्यक्त केली होती. ती शंका आज 10 वर्षांनंतर फोल ठरलेली दिसते. स्वच्छ प्रतिमा हा फडणवीस आणि मोदी यांना जोडणारा आणखी एक दुवा. एका दशकाच्या राजवटीत अजूनही भ्रष्टाचाराचा एकही आरोप नसलेले मोदी जसे आहेत, तसेच पाच वर्षे मुख्यमंत्री आणि अडीच वर्षे उपमुख्यमंत्री असूनही फडणवीस आरोपांपासून मुक्त आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी टोपी फिरविली आणि 105 आमदार निवडून आले तरी फडणवीस यांना विरोधी बाकावर बसावं लागले. त्या कसोटीच्या काळातही फडणवीस यांनी आपले कर्तृत्व दाखवून दिले. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले. (Devendra Fadnavis)
=======
हे देखील वाचा : कणकवलीचा कौल कोणाच्या बाजूने? राणे की पारकर?
========
इतकेच नव्हे तर आधी 2020 च्या बिहार विधानसभा निवडणुकीत आणि नंतर 2022 च्या गोवा विधानसभा निवडणुकीत फडणवीस यांनी भाजपचे प्रभारी म्हणून काम केले. या दोन्ही ठिकाणी त्यांनी भाजपला जोरदार यश मिळवून दिले. त्यामुळे महाराष्ट्राबाहेरही फडणवीस यांच्या नेतृत्वाबद्दल एक दरारा निर्माण झाला. म्हणूनच जवळजवळ एक हाती बहुमत मिळाल्यासारखे परिस्थिती असतानाही मुख्यमंत्र्याचे नाव जेव्हा जाहीर होत नव्हते, तेव्हा अनेकांना फडणवीस आता राष्ट्रीय पातळीवर जाणार असल्याचे वेध लागले होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री म्हणून बहुजन समाजातील एखाद्या नेत्याचे नाव जाहीर होईल आणि फडणवीस भाजपचे अध्यक्ष म्हणून सूत्रे घेतील, अशा वावड्या पसरवण्यात आल्या होत्या. फडणवीस यांचे कर्तृत्व आणि प्रभाव पाहिला तर ती चर्चा अनाठायी वाटतही नव्हती. केवळ राजकारणी म्हणून नाही तर एक अभ्यासू, व्यासंगी नेता म्हणून फडणवीस यांच्याकडे पाहिले जाते. एकंदर पाहिले तर ‘केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र’ ही 2014 सालच्या विधानसभा निवडणुकीतील घोषणा होती. पुढची पाच वर्षे ही घोषणा गाजत होती आणि पाच वर्षांच्या खंडानंतर आता परत ती घोषणा ऐकू येणार आहे. मात्र या घोषणेला आता नवीन वळणही मिळणार आहे. अनेक राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, भविष्यात पंतप्रधानपदासाठी देवेंद्र फडणवीस हे नेतृत्व योग्य आणि उपयुक्त ठरू शकतं. त्यामुळे आजचे राज्यातले देवेंद्र उद्या केंद्रातले नरेंद्र होऊ शकतील का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. (Political Updates)