भारताचा युवा बुद्धीबळपटू आर. प्रज्ञानंदची (R Praggnanandhaa) घोडदौड अंतिम सामन्यात थांबली. वर्ल्ड रँकिंगमध्ये अव्वल असणाऱ्या मॅग्नस कार्लसनने अंतिम लढतीत प्रज्ञानंदचा पराभव केला. कार्लसनचे हे कारकिर्दीतील पहिलेच विश्वचषक जेतेपद ठरले.
विश्वविजेता विश्वनाथन आनंद यांच्यानंतर विश्वचषक पटकावणारा दुसरा खेळाडू बनण्याची संधी प्रज्ञानंदकडे (R Praggnanandhaa) होती. अंतिम सामन्यातील लढतीत त्याने पाच वेळच्या जगज्जेत्या कार्लसनला पारंपारिक पद्धतीच्या दोन सामन्यांत बरोबरीत रोखले होते. त्यानंतर झालेल्या जलद ‘टायब्रेकर’ मध्ये काळ्या मोहऱ्यांनी खेळतांना कार्लसनने पंचेचाळीस चालीत विजय नोंदवत प्रज्ञानंदला (R Praggnanandhaa) बॅकफूटवर धाडले. त्यानंतर काळ्या मोहऱ्यांनी खेळतांना प्रज्ञानंदला दुसरा सामना जिंकणे अनिवार्य होते. परंतु कार्लसनने बचावात्मक पावित्रा घेत खेळ केला आणि बावीस चालीत प्रज्ञानंदला बरोबरीत रोखत स्पर्धेचे जेतेपद पटकावले.
अंतिम सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला असला तरी अठरा वर्षीय प्रज्ञानंदने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. जागतिक क्रमवारीत दुसऱ्या अन तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या खेळाडूंना त्याने मात दिली. या स्पर्धेतील कामगिरीच्या बळावर प्रज्ञानंद पुढील वर्षी टोरांटो येथे होणाऱ्या ‘कॅनडीडेट्स’ स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. यामुळे विश्वचषकाची अंतिम फेरी गाठणारा आणि कॅनडीडेट्ससाठी पात्र ठरणारा प्रज्ञानंद (R Praggnanandhaa) विश्वनाथन आनंद नंतरचा दुसरा खेळाडू ठरला.
==========
हे देखील वाचा : इस्रोचे ‘पिता’ म्हणून ओळखले जाणारे विक्रम साराभाई
==========
आपल्या कुशल खेळाचे प्रदर्शन करत ज्या प्रकारे प्रज्ञानंदने अंतिम फेरीपर्यंत मार्गक्रमण केले ते पाहता भारतीय बुद्धीबळाचे भविष्य उज्ज्वल आहे असे आपण निश्चिंतपणे म्हणू शकतो. अतिशय प्रतिकूल परीस्थितीतून पुढे आलेल्या प्रज्ञानंदने (R Praggnanandhaa) वयाच्या अठराव्या वर्षी जो टप्पा गाठला आहे तो खरंच कौतुकास्पद आहे.