गेल्या महिन्यातच केनियामधून आलेल्या एका बातमीमुळे प्राणी प्रेमी नाराज झाले होते. केनियामध्ये कावळ्यांची संख्या लक्षणिय वाढली आहे. या कावळ्यांमुळे तेथील पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसत आहे. शिवाय हे कावळे मानवी वस्तीवरही हल्ला करत असल्याच्या घटना केनियामध्ये घडल्या आहेत, त्यामुळेच केनियासरकारनं १ दशलक्ष कावळ्यांना मारण्याची घोषणा केली. या वर्षअखेरीस ही आकडेवारी पूर्ण करण्याचे त्यांचे लक्ष आहे. मात्र आता केनियापाठोपाठ आणखी एका देशानं अशीच घोषणा केली आहे. हा देश आहे अमेरिका आणि अमेरिकेला त्रासदायक ठरले आहेत, ते घुबड. आपल्या भारतात ज्या घुबडाची देवी लक्ष्मीचे वाहन म्हणून पुजा करण्यात येते, त्याच घुबडांना आता अमेरिकेत मारण्यात येणार आहे. थोडे नाही तर अमेरिकन सरकारनं ५००००० एवढ्या घुबडांना मारण्याची घोषणा केली आहे.
त्यासाठी प्रशिक्षीत अशा शिका-यांची एक टीमही तयार करण्यात आली आहे. अमेरिकेसारख्या सर्वशक्तीमान देशाला घुबडांचा काय त्रास आहे, हा प्रश्नही यामुळे उपस्थित झाला आहे. अमेरिकेतही असलेल्या प्राणीमित्रांनी याला विरोध केला आहे. मात्र या घुबडांना मारलं नाही तर अन्य जातीच्या लहान घुबडांना गमवावं लागले हे कारण पुढे करत अमेरिकन सरकारनं आपला निर्णय मागे घेण्यास नकार दिला आहे. या कामासाठी नेमण्यात आलेले प्रशिक्षीत शिकारी घुबडांना मारण्याच्या मोहिमेला रवानाही झाले आहेत.(American Owls)
अमेरिकेतील मुळ घुबडांच्या प्रजातींना वाचवण्यासाठी ५००००० घुबडांना मारण्यात येणार आहे. यासाठी अमेरिकेच्या पश्चिमेकडील जंगलात प्रशिक्षित नेमबाज तैनात करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत पुढील काही महिन्यात ५ लाख ५० हजार घुबडांना गोळ्या घालून ठार करण्यात येणार आहे. याचे कारण म्हणजे, अमेरिकेतील ‘स्पॉटेड आऊल’ प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. या छोट्या ‘स्पॉटेड घुबडां’ ना मोठ्या घुबडांची धास्ती आहे. कारण बॅरेड या घुबडांच्या मोठ्या जातीची या भागात संख्या वाढली आहे. ही घुबडे लहान, स्पॉटेड घुबडांना आपले लक्ष करीत आहेत. त्यांच्या हल्ल्यात रोज अनेक स्पॉटेड घुबडे बळी पडत असल्यानं सरकारनं या बॅरेड घुबडांना मारण्याचा निर्णय घेतला आहे.
पूर्व युनायटेड स्टेट्समध्ये बॅरेड घुबड जास्त प्रमाणात आढळतात. त्यांची संख्या एवढी आहे की, त्यांनी पश्चिम किनारपट्टी व्यापली आहे. ही घुबडांची जात आक्रमक म्हणून ओळखली जाते. अन्य लहान पक्षांवरही ते आक्रमण करतात. मात्र त्यांचे पहिले लक्ष हे स्पॉटेड घुबडंच ठरतात. लहान असल्यामुळे ठिपकेदार घुबड स्वतःचा बचाव करू शकत नाहीत. बॅरेड घुबड हे आपलं घरटही तयार करीत नाहीत. तर स्पॉटेड घुबडांच्या घरट्यावर ते आक्रमण करून त्यावर ताबा मिळवतात. (American Owls)
त्यानंतर घरट्यातील अंडी किंवा स्पॉटेड घुबडांच्या पिल्लांना ते मारत आहेत. त्यामुळे स्पॉटेड घुबडांची संख्या आपसूक कमी होत चालली आहे. अमेरिकन जंगलतज्ञांच्या मते जंगल टिकून रहाण्यासाठी या लहान घुबडांची अधिक गरज आहे. मोठ्या घुबडांच्या हल्ल्यात त्यांचा असाच मृत्यू झाला तर जंगलांचाही नाश होईल. ही स्पॉटेड घुबडांची प्रजाती धोक्यात येईल. वन्यजीव विभाग आता ओरेगॉन, वॉशिंग्टन आणि कॅलिफोर्नियामध्ये ठिपकेदार घुबडांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी अनेक पावले उचलली जात आहेत. मात्र यामध्ये बॅरेड घुबड हा मोठा अडथळा ठरत आहेत. त्यामुळेच त्यांना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
====================
हे देखील वाचा : नद्यांमध्ये मगरींची वाढती संख्या !
====================
या निर्णयामुळे वन्यजीव मित्र विभागले गेले आहेत. एकाला वाचवण्यासाठी दुस-याला मारण्याचा ही निर्णय चुकीचा असल्याचे मत येथे व्यक्त होत आहे. पण सरकारनं त्याकडे दुर्लक्ष करीत घुबड मारण्याची मोहीम सुर केली आहे. वसंत ऋतूपासून घुबडांची हत्या सुरू होईल पण बॅरेड घुबडांची संख्या त्यामुळे कमी करता येणार नाही, असे काही पक्षीतज्ञांचे म्हणणे आहे. या घुबडांना मारण्यासाठी स्पॉटेड घुबडांचे आवाज रेकॉर्ड करण्यात आले आहेत. ते आवाज वाजवून बॅरेड घुबडांना एका भागात आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि त्या जंगलात पोहोचल्यावर त्यांना बंदुकींनी मारले जाणार आहे. मारल्या गेलेल्या घुबडांचे सांगाडेही तेथेच जाळले जाणार आहेत. (American Owls)
सई बने