Home » इजिप्तमध्ये सापडले मृतांचे शहर

इजिप्तमध्ये सापडले मृतांचे शहर

by Team Gajawaja
0 comment
City of Dead
Share

इजिप्तमधील पिरॅमिड हे जगप्रसिद्ध आहेत. मात्र या देशात आणखीही अशा इतिहासाच्या खुणा आहेत, ज्या अद्यापही जमिनीच्या पोटात दडलेल्या आहेत. अशाच एका शहराला नुकतेच संशोधकांनी शोधून काढले आहे. या शहराला मृतांचे शहर म्हणजेच सिटी ऑफ डेड असे नाव देण्यात आले आहे. कारण हजारो वर्षापूर्वी जमिनीत गाडल्या गेलेल्या प्राचीन थडग्यांचे हे शहर आहे. येथे ३०० अधिक प्राचीन थडगी आणि ममी मिळाल्या आहेत. पाच वर्षांच्या उत्खननानंतर इजिप्तमधील पुरातत्वशास्त्रज्ञांना हे यश मिळाले आहे. आगा खान तृतीय यांच्या आधुनिक समाधीजवळ उत्खनन गेली काही वर्ष संशोधक संशोधन करीत होते. त्यातून त्यांना एकाच जागी ३०० हून अधिक थडगी मिळाली असून त्यात ममीही सुरक्षित असल्यानं संशोधकांची जिज्ञासा जागी झाली आहे. इजिप्तसह अन्य देशातील संशोधकांनीही या सिटी ऑफ डेड ला भेट देऊन संशोधन करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यातून मानवी इतिहासातील खुणा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. इजिप्त या देशाचा इतिहास अतीप्राचीन आहे. (City of Dead)

इजिप्तमधील पिरॅमिडकडे एक अजुबा म्हणून बघण्यात येते. पण या देशात पिरॅमिडसह अन्यही स्थळे अशीच आश्चर्यचकीत करणारी आहेत. त्यामध्ये आता सिटी ऑफ डेड ची भर पडली आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना इजिप्तमध्ये एक अती प्राचीन स्मशानभूमी सापडली आहे. यात ३०० हून अधिक मृतदेह असून ही स्मशानभूमी अस्वान शहराजवळ आहे. गेल्या पाच वर्षापासून चालू असलेल्या संशोधनातून हे यश मिळाले आहे. काही वर्षापूर्वी या जागेवर ३६ थडग्यांचा शोध लागला होता. तेव्हापासून येथे संशोधन सुरु झाले आहे. ही सिटी ऑफ डेड अस्वान शहराच्या २ लाख ७० हजार फूट उंचीवर आहे. यासाठी संशोधकांनी १० ठिकाणी उत्खनन केले होते. यातील प्रत्येक थडग्यात ३० ते ४० लोकांचे अवशेष सापडल्यानं संशोधक अधिक आश्चर्यचकीत झाले आहेत. हे अवशेष सुमारे काही हजार वर्षे जुने असावेत असा अंदाज आहे. इसवी सन पूर्व ६ व्या शतक ते इसवी सन ९ व्या शतकादरम्यान हे अवशेष असल्याची माहिती आहे. (City of Dead)

इजिप्तच्या पुरातन वस्तू विभागाच्या परिषदेचे प्रमुख अयमान अश्मावी यांनी दिलेल्या माहितीनुसार यातील सर्व अवशेष हे किशोरवयीन मुलांचे आहेत. त्यामुळेच एवढ्या मुलांचा अचानक मृत्यू कसा झाला, की त्यांना मारण्यात आले होते, हा प्रश्न आता संशोधक सोडवत आहेत. संशोधनानुसार, अस्वानजवळील ही जागा खाणकाम, व्यापार आणि लष्करी क्षेत्र म्हणून वापरली जात होती. त्याचा संबंध लावून आता या किशोरवयीन मुलांचा मृत्यू कसा झाला, याची शोध चालू आहे.

ही सिटी ऑफ डेड आगाखान तिसऱ्याच्या कबरीशेजारी असल्यानं संशोधक अधिक बुचकळ्यात पडले आहेत. कारण या जागेवर जी थडगी आहेत, त्यांचे दफन हे सामाजिक स्थितीनुसार करण्यात आले आहे. वरिष्ठ जातीच्या लोकांना टेकडीच्या माथ्यावर पुरण्यात आले आहे. मध्यमवर्गीयांना टेकडीच्या मध्यभागी आणि खालच्या वर्गाला टेकडीच्या खाली पुरण्यात आले आहे. या सर्वांचा मृत्यू एखाद्या महामारीमध्ये झाल्याचाही संशय आहे. क्षयरोग किंवा ॲनिमिया यांसारख्या संसर्गजन्य आजारांमुळे या किशोरवयीन तरुणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. (City of Dead)

============================

हे देखील वाचा : दुबईत महिलांना वस्र परिधान करण्यासाठी आहेत कठोर नियम, अन्यथा….

============================

सध्या मिलान विद्यापीठातील पुरातत्वशास्त्रज्ञांचे पथक या अवशेषांची पाहणी करीत आहे. पॅट्रिझिया पियासेंटिनी हे या संघाचे नेतृत्व करत आहेत. पियासेंटिनी यांनी ४५०० वर्षांपूर्वी नाईल नदीच्या पूर्व किनाऱ्यावर वसलेल्या अस्वान शहरावरही संशोधन केले आहे. या अस्वान शहाराच्या वेशीवर ही सिटी ऑफ डेड मिळाली आहे. स्वतः पियोसेंटिनी या शोधावर खुष आहेत. अस्वान शहर हे लष्करी चौकी, ग्रॅनाइट खाणी आणि व्यापाराच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे केंद्र होते. त्याकाळी युरोप आणि आफ्रिकेतील लोकही येथे स्थायिक झाले होते. आता त्याच अस्वान भोवती संशोधकांचे चोवीस तास उत्खनन सुरु आहे. उत्खननादरम्यान २ हजार वर्षे जुन्या वस्तीचेही अस्तित्व स्पष्ट झाले आहे. जे अवशेष मिळाले आहेत, त्यांच्या बाजुला मातीची भांडी मिळाली आहेत. त्यावरील कलाकुसरही कायम आहे. आता याच सर्वाचा आधार घेत संशोधक इतिहासातील इजिप्तवर प्रकाश टाकणार आहेत.

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.