ब्रम्हपुत्र… जगातली १५वी सर्वात लांब नदी आणि ९वी सर्वात मोठी नदी… मुळात अनेकदा आपण ब्रम्हपुत्रचं नाव चुकून ब्रम्हपुत्रा असं घेतो, जे चूक आहे. ब्रम्हपुत्र ही नदी नसून हा नद आहे. म्हणजे नदी प्रणाली प्रकारातला पुरुष… त्यामुळेच या पुरुष असलेल्या नदला ब्रम्ह यांचा पुत्र असं म्हटलं गेलं आहे. पण तुमच्या माहितीसाठी आपण तिला नदीच म्हणू… भारतातील नद्यांशी प्रत्येक जण अध्यात्मिक, धार्मिक आणि नैसर्गिक कारणांनी जोडला गेला आहे. त्यामुळे प्रत्येक नदीला भारतात एक वेगळच महत्त्व आहे. पण ब्रम्हपुत्रच्या बाबतीत खूप आधीपासूनच सावळा गोंधळ आहे. कारण ही नदी तिबेट म्हणजेच आजचा चीन, नंतर भारतात आणि त्यानंतर बांगलादेश अशी वाहत नंतर बंगालच्या उपसागराला मिळते. चीनसोबत आपली आधीपासूनच बनत नाही. त्यातच चीनने जगातलं सर्वात मोठ धरण याच ब्रम्हपुत्र नदीवर बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे, असं म्हटलं जातंय. पण आधीच बलाढ्य धरण बनवणारा चीन आता पुन्हा नवीन धरण बांधून इतर देशांना बुचकळ्यात का पाडतय, जाणून घ्या… (Brahmaputra)
चीनने ब्रह्मपुत्र नदीवर जगातलं सर्वात मोठ धरण बांधण्याची योजना जाहीर केल्यामुळे भारताची चिंता वाढली आहे. याचं कारण म्हणजे ती जवळपास ५०% तिबेटमध्ये वाहते. त्यामुळे या नदीवर आमचा हक्क आहे, हे चीन नेहमीच सांगत आला आहे. चीनमध्ये तिला यारलुंग त्सांगपो म्हणतात. सध्या चीन आणि भारताचे मिळून या नदीवर जवळपास १२ धरण आहेत. पण चीनचा नवा धरण प्रकल्प फक्त भारतासाठी नाही तर भविष्यात बांगलादेशसाठीही काळजीचा ठरणार आहे. या भव्य धरणामुळे ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रवाहावर परिणाम तर होणारच पण धरण क्षेत्रातल्या भौगोलिक स्थितीचं प्रचंड नुकसान होण्याचीही चिन्ह आहेत. मात्र चीननं या धरणावर ठाम भूमिका घेत भारतातील ब्रह्मपुत्रच्या प्रवाहावर कोणताही परिणाम होणार नाही, असं सांगितलं आहे. त्यासाठी हा प्रकल्प हाती घेण्यापूर्वी संपूर्ण वैज्ञानिक पडताळणी केल्याची ग्वाहीसुद्धा चीन सरकारनं दिली आहे. (Social News)
हे धरण जगातलं सर्वात मोठ धरण असणार आहे आणि यासाठी चीन तब्बल 13.7 बिलियन युएस डॉलर्स इतका खर्च होण्याचा अंदाज आहे. याचं नाव चीनने यारलुंग झांगबो असं ठेवलं आहे. मात्र हे धरण किती पर्यावरण पूरक असेल, याबाबत शंका व्यक्त करण्यात येतेय. भविष्यात या धरणातील पाण्याच्या दबावामुळे हिमालयीन प्रदेशात टेक्टोनिक प्लेट सीमेवर सतत भूकंप होण्याची भीती आहे. असं झालं तर भारतातील सीमा भागातील प्रदेशाला मोठा धोका उत्पन्न होऊ शकतो. काहीतरी भव्यदिव्य करून स्वतसोबत इतरांचं नुकसान करावं, ही चीनची जुनीच सवय आहे. (Brahmaputra)
महत्त्वाच म्हणजे चीन ज्या ठिकाणी हे धरण बांधत आहे, ते भारताच्या जवळच आहे. याच स्थानावरुन ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेशात आणि नंतर बांगलादेशपर्यंत वाहत जाते. हे धरण जिथे होतंय, तो भाग तिबेटसाठीही महत्त्वाचा मानला जातो. या भागात तसे सतत भूकंप येतच असतात. त्यामुळे धरणामुळे जमिनीवर येणाऱ्या प्रेशरमुळे भूकंपांना आयतं आमंत्रण मिळू शकत. मात्र या धरणाचं आणि यावर उभारण्यात येणा-या जलविद्युत प्रकल्पाचं बांधकाम शास्त्रीय पद्धतीने पडताळणी करण्यात आलं असून याचा कुठलाही परिणाम पर्यावरणावर होणार नाही, असं चीन म्हणतय. यासोबतच ब्रम्हपुत्र नदीच्या जलस्रोतांवर कसलाही परिणाम होणार नसल्याचे चीनकडून सांगण्यात आलं आहे. (Social News)
मुळात ब्रम्हपुत्र नदीचा भारतात येणारा प्रवाहमार्गच पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो. हे धरण पूर्ण झाल्यावर त्यापासून 60,000 मेगावॅट वीज निर्मिती होणार आहे. तिबेटमधून जेव्हा ही नदी अरुणाचल प्रदेशात प्रवेश करते, जिथे ती सियांग म्हणून ओळखली जाते. आसाममध्ये ती दिबांग आणि लोहित यांसारख्या उपनद्यांशी जोडली जाते आणि नंतर तिला ब्रह्मपुत्र म्हणतात. शेवटी ब्रम्हपुत्र नदी बांगलादेशात प्रवेश करते आणि बंगालच्या उपसागराला मिळते. चीनला या धरणातून प्रचंड उर्जा स्रोत निर्माण करायचा आहे. चीन आपला फायदा करून घेईलच, पण भारतावर आणि तिबेटवर त्याचा घातक परिणाम होणार आहे. सध्या भारताचा अक्साई चीन हा भाग चीनच्या ताब्यात आहे. त्यातच अरुणाचल प्रदेशवरही गेल्या कित्येक वर्षांपासून चीनचा डोळा आहे. त्यामुळे या धरण प्रकल्पाच्या माध्यमातून अरुणाचल प्रदेश बळकावण्याचा चीनचा डाव आहे का ? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. (Brahmaputra)
=============
हे देखील वाचा : Mahakhumbh 2025 : गंगा नदी लुप्त होणार !
=============
हे धरण झाल्यावर अरुणाचल प्रदेशमधील शेतीसाठी महत्त्वाचा असणा-या गाळाचा प्रवाह विस्कळीत होण्याची भीती आहे. तसेच धरण परिसरात नदीच्या प्रवाहात होणारे बदल पाहता, येथील जैवविविधतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. आधीच या भागात मोठ्या प्रमाणात भूस्खलन होत असत. त्यामुळे या भागातील सूपीक जमीन तर नष्ट होईलच, पण इथले शेतकरीही हवालदिल होतील. त्यामुळे हे धरण जगातलं सर्वात मोठ धरण असा कितीही गाजावाजा केला, तरी त्याचा परिणाम हा पुढच्या काही वर्षात नक्कीच पहायला मिळणार आहे. भारत यावर आता काय निर्णय घेतंय, हे महत्त्वाचं ठरणार आहे. (Social News)