असे म्हणले जाते की, काळ जस-जसा पुढे सरकतो तस-तशा काही गोष्टी काळाच्या पडद्याआड जातात. इतिहासात याची अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. भारताला पण खूप मोठा इतिहास लाभलेला आहे.
या इतिहासात ताजमहाल या वास्तूला अनन्य साधारण महत्व आहे. शहाजहानने आपली पत्नी मुमताजच्या प्रेमाखातर आणि आठवणीत ताजमहाल ही जगातील सर्वात सुंदर वास्तू उभारली. अनेकांनी अशी दुसरी वास्तू शोधूनही सापडणार नाही असे ठरवून टाकले होते.
मात्र अनेकांना या पांढऱ्या शुभ्र ताजमहालकडे बघितल्यानंतर शहाजानला हा ताजमहाल बनवण्याची कल्पना कुठून सुचली असेल? असा प्रश्न पडत असेल. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न आज आम्ही आजच्या या लेखातून करणार आहोत.
असे म्हणले जाते की शहाजानने आग्र्यात ताजमहाल बनवण्याआधीही आजून एक ताजमहाल जगात अस्तित्वात होता. विशेष म्हणजे हा ताजमहाल भारतातच होता. मात्र त्याची ओळख आणि इतिहास अजूनही लपून राहिला आहे.
मध्य प्रदेशमध्ये मिठाईसाठी प्रसिद्ध असणारे आणि इंदुरपासून जवळपास १८० किलोमीटर दक्षिणकडे वसलेले बुरहानपूर हे एक शहर आहे. या शहरात काळा ताजमहाल (Black Taj Mahal) म्हणून एक भव्य वास्तू आहे. त्याला काही लोक मकबरा असेही म्हणतात.
असे म्हणले जाते की शाहजहांने याच मकबऱ्यावरून ताजमहाल बनवण्याची आयडिया घेतली असावी. मात्र यासंबंधी इतिहासात ठोस असे पुरावे सापडत नाहीत. या वास्तूचा इतिहास पहायला गेले तर आपल्याला समजते की, अब्दुल रहीम खानचा मुलगा शाहनवाज खान हा अतिशय शूर होता.
त्यांचे अनेक किस्से आज देखील बुरहानपूर (Burhanpur) या भागात प्रसिद्ध आहेत. शाहनवाज खानच्या दुसऱ्या पत्नीने १४ व्या अपत्यास जन्म दिला, तेव्हा तिचा इथे मृत्यू झाला. तेव्हा त्यांच्या पत्नीला येथे दफन केले. त्यांच्या मृत्यूप्रित्यर्थ शाहनवाज खानने या जागी काळ्या दगडात हा मकबरा बांधला होता.
शाहजहांला मध्य प्रदेशच्या बुरहानपुर येतील काळा ताजमहाल पाहूनच आग्र्यात संगमरमरचा ताजमहाल बांधण्याची आयडिया आली. बुरहानपूरच्या मातीत जास्ती कीटक, वाळवी असल्याने त्यावेळी शहाजानने ताजमहाल आग्र्याला बांधण्याचा निर्णय घेतला होता.
पुढे जाऊन बुरहानपूरच्या या वास्तूला काळा ताजमहाल असे नाव पडले. आपण या वास्तूचे बांधकाम जवळून पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येते ही वास्तु फार सुंदर आहे. मात्र इतिहासाने याची दखल न घेतल्याने या काळ्या ताजमहालाची दुर्दशा झाली आहे.
काळ्या ताजमहालाबाबत लोकांना खूप कमी माहिती आहे. अनेक वर्षांपासून ऊन-वारा-पाऊस, पशु-पक्ष्यांचा वास्तूतील मोकळा वावर, मानव प्राण्याचा हलगर्जीपणा आणि सरकारचे दुर्लंक्ष सहन करत ही वास्तू उभी होती. अखेर २०१९ मध्ये भारतीय पुरातत्व आणि सर्व्हेक्षण विभागाने या वास्तूची काळजी घेणे सुरू केले आहे. त्यामुळे आज हा काळा ताजमहाल पर्यटकांचे आकर्षण ठरतो आहे.
– निवास उद्धव गायकवाड
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.