Home » लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष

लाल बहादूर शास्त्री जयंती विशेष

by Jyotsna Kulkarni
0 comment
Lal Bahadur Shastri
Share

ब्रिटिशांनी भारतावर केलेले १५० वर्ष राज्य, त्यांच्यापासून देशाला मुक्त करण्यासाठी भारताचा स्वातंत्र्य लढा हे सर्वच सगळ्यांना माहित आहे. आपल्या देशाला ब्रिटिशांच्या त्रासातून सोडवण्यासाठी अनेकांनी प्राणांची शर्थ लावली. यात असंख्य लोकांनी आपले प्राण गमावले. मात्र ब्रिटिशांविरोधात मोठा आणि कट्टर लढा दिला. सगळ्याच दिग्ग्जनी जाणत्या वयात जणू शपथच घेतली होती ब्रिटिशांना बाहेरचा रास्ता दाखवण्याची. या लढ्यामुळे आपल्या देशाला असे अनेक व्यक्तिमत्व मिळाले ज्यांचे कर्तृत्व अनन्यसाधारण होते.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक स्वातंत्र्यसेनांनी यांनी देशाच्या राजकारणात देखील उत्तम कामगिरी करत आपला ठसा उमटवला. असे एक मोठे नाव म्हणजे लाल बहादूर शास्त्री. देशाचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे त्यांच्या साधेपणा आणि कार्यक्षम स्वभावासाठी ओळखले जातात. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती एकाच दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी साजरी केली जाते.

भारताचे दुसरे पंतप्रधान असलेल्या लाल बहादूर शास्त्री यांचे जीवन कायमच आदर्श आणि संघर्षाने भरलेले होते. अत्यंत प्रतिकूल परिस्थितून येऊन त्यांनी देशाचे सर्वोच्च पद भूषवले. लाल बहादूर शास्त्री यांचे संपूर्ण जीवन आजही सगळ्यांसाठीच आदर्श आणि प्रेरणा देणारे आहेत. त्यांचा साधेपणा आणि त्याचे किस्से आजही सर्वश्रुत आहे. यंदा आपण लाल बहादूर शास्त्री यांची १२० वी जयंती साजरी करत आहोत. त्यानिमित्ताने थोडक्यात जाणून घेऊया त्यांच्या संपूर्ण प्रवासाबद्दल.

Lal Bahadur Shastri

लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दि. २ ऑक्टोबर १९०४ रोजी वाराणसीच्या नजीक असलेल्या मुगलसराय नावाच्या एका छोट्या गावात झाला. त्यांचे कुटुंब अगदी सामान्य कायस्थ स्वरूपाचे होते. शास्त्री केवळ दीड वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांची आई रामदुलारी या त्यांना घेऊन त्यांचे वडील श्री. हजारीलाल यांच्याकडे आल्या. शास्त्री यांचे त्यांच्या आजोळी पालनपोषण तर झाले सोबतच त्यांनी सहावीपर्यंतचे शिक्षण तिथेच घेतले.

बालवयापासूनच शास्त्री यांच्याकडे भरपूर आत्मविश्वास आणि स्वावलंबन होते. स्वतःचे कपडे स्वतः धुणे, बूट पॉलिश करणे, आठ किलोमीटर चालत शाळेत जाणे, पैसे नसतील तर नदीत पोहून दुसऱ्या बाजूला जाणे, उपाशी राहून कधी अर्धपोटी राहून खूप कष्ट करत त्यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. पुढे शास्त्री त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी ते वाराणसीच्या हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये त्यांच्या मावशीकडे राहण्यास आले.

शास्त्री यांच्या जाणत्या काळात स्वातंत्र्य चळवळ अधिक जोरात आणि नेटाने पेटून उठली होती. वाराणसीला लोकमान्य टिळकांचे भाषण ऐकण्यासाठी शास्त्री यांनी तब्बल ८० किलोमीटर चालत भाषणाचे ठिकाण गाठेल होते. कारण त्यांच्याकडे भाड्यासाठी पैसेच नव्हते. इ. स. १९२१ मधल्या देशातल्या असहकार चळवळीत लाल बहादुर शास्त्री त्यांच्या सगळ्या अडचणी बाजूला ठेवून सहभागी झाले होते.

स्वातंत्र्यलढा आणि अभ्यास दोन्हीही एकाच वेळी चांगल्या प्रकारे चालू ठेवण्यासाठी इ. स. १९२१ मध्ये त्यांचे प्राचार्य असलेल्या डॉ. भगवानदास यांच्या सल्ल्यावरून लाल बहादुर शास्त्री यांनी ‘काशी विद्यापीठात’ प्रवेश घेतला. तिथे त्यांनी रामकृष्ण परमहंस, संत विवेकानंद, महात्मा, टॉलस्टॉय, लेनिन यांच्या साहित्याचा भरपूर अभ्यास केला. ‘शास्त्री’ ही पदवी मिळविली. यानंतर लाला लजपतराय यांनी स्थापन केलेल्या ‘लोक-सेवक मंडळ’ या संस्थेमध्ये सभासदत्व घेऊन साठ रुपये मासिक पगारावर देशसेवेच्या कामाला त्यांनी सुरुवात केली.

जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतसे शात्री यांचे देशाप्रती कार्य वाढत गेले. शिक्षणासोबतच त्यांनी स्वातंत्र्यलढा चालू ठेवला. इकडे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देखील अनेक घडामोडी घडत होत्या. त्यांचे मिर्झापूर येथील ललितादेवींशी १९२७ मध्ये लग्न झाले. त्यांना चार मुलगे व दोन मुली झाल्या. त्यांचे दोन मुलगे पुढे सक्रिय राजकारणात आले. पत्नी ललितादेवी धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या उपासना आणि पतीची सेवा यात मग्न असायच्या. त्यांनी शास्त्री यांना त्यांच्या कामात कायम साथ दिली.

Lal Bahadur Shastri

लग्नानंतर लालबहादूरजी स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले. इ. स. १९३० ते इ. स. १९४५ या काळात ९ वर्षे ते तुरुंगात होते. तिथे अनेक प्रकारच्या यातना शास्त्रीजींना भोगाव्या लागल्या. 1946 मध्ये काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यावर त्यांची उत्तर प्रदेशचे संसदीय सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढे लाल बहादूर शास्त्री नवी दिल्लीत आले. येथे त्यांनी रेल्वे, वाहतूक दळणवळण, वाणिज्य आणि उद्योग मंत्री यांच्यासह मंत्रिमंडळात अनेक महत्वाची पदे भूषवली.

एका रेल्वे अपघातात अनेक जणांना जीव गमवावा लागल्यामुळे त्यांनी स्वत:ला जबाबदार ठरवत रेल्वेमंत्री पदाचा राजीनामा दिला. देश आणि संसदेने त्यांच्या अभूतपूर्ण निर्णयाची प्रशंसा केली. मे १९६४ मध्ये पं. नेहरूंच्या मृत्यूनंतर ९ जून १९६४ रोजी संसद सदस्यांनी एकमताने लालबहादूर शास्त्रींना आपला नेता निवडून भारताचे पंतप्रधान बनविले. 1965 मधील भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान, त्यांनी ‘जय जवान जय किसान’चा नारा त्यांनी देशातील ‘अन्न टंचाई’ दरम्यान सैनिक आणि शेतकऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी दिला होता. त्यावेळी त्यांनी पगार घेणेही बंद केले होते.

अलिप्तवादी राष्ट्रांची चळवळ अर्थातचं ‘नाम’चे अधिवेशन इजिप्तची राजधानी कायरो येथे आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी भारत ‘नाम’ राष्ट्रांच्या चळवळीच्या अग्रस्थानी होता. या अधिवेशनाला भारताकडून पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री उपस्थित राहीले. या दौऱ्यात त्यांचा मुक्काम हिल्टन या जगप्रसिध्द पंचतारांकीत हॉटेलमध्ये होता. मात्र असे असूनही शास्त्रींजीनी बाहेरचे जेवण घेतले नाही. त्यांना मुळातच बाहेरचे जेवण आवडत आवडत नसायचे.

लालबहादूर शास्त्री खासदार असतांना त्यांना घरखर्च भागवणे कठिण जात असायचे. त्यावेळी खासदारांना केवळ ५०० रुपये पगार होता. त्यांच्या घरात त्यांना भेटणाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची कायम वर्दळ असायची. त्यांचा पगार त्यांना अजिबातच पुरत नव्हता. त्यामुळे घरखर्चासाठी अतिरीक्त पैसे कसे जमवायचे या विचारत शास्त्रीजी असताना कुलदीप नायर य़ांनी त्यांना वर्तमानपत्रात स्तंभलेखण करण्याचा सल्ला दिला. यानुसार लाल बहादूर शास्त्री चार इंग्रजी दैनिकात घोस्ट कॉलम लिहिण्याचे काम सुरु केले. त्यातून महिन्याला प्रत्येकी ५०० रुपये प्रमाणे २ हजार रुपये त्यांना मिळायचे. त्यातून शास्त्रींजी यांनी त्यांच्या घराचा अतिरीक्त खर्च काढला.

शास्त्रींजी यांचा लहान मुलगा हरी याचे काही व्यापाऱ्यासोबत घनिष्ठ संबध होते. वडिलांच्या अधिकार पदाचा वापर करुन त्याने काही कामे केल्याचा आरोप हरीवर लागला. याबद्दल लाल बहादुर शास्त्री यांच्या कानावर माहिती पडताच, त्यांनी आपल्या शासकीय बंगल्यातून मुलाला हाकलून दिले होते.

लाल बहादूर शास्त्री यांना त्या काळातील अतिशय प्रसिद्ध दिग्दर्शक कमाल अमरोही यांनी त्यांच्या ‘पाकीजा’च्या सिनेमाच्या सेटवर आमंत्रित केले होते. ते आल्यानंतर त्यांच्यासाठी सेटवर एक छोटा कार्यक्रम ठेवला होता. ‘पाकीजा’च्या अभिनेत्री मीना कुमारी त्यावेळी त्यांच्या कारकिर्दीच्या शिखरावर होत्या. कमाल अमरोही यांनी शास्रींजींचे स्वागत केले आणि त्यांना मिना कुमारी यांच्यावर बोलण्याची विनंती केली.

========

हे देखील वाचा : महाराष्ट्रातल्या जागृत साडे शक्तिपीठांची माहिती

========

मात्र त्यावेळी देशात सर्वाधिक लोकप्रिय आणि आघाडीच्या अभिनेत्री असलेल्या मिना कुमारीबद्दल शास्त्रीजींना काहीच माहिती नव्हते. त्यांनी हळूच कुलदीप नायर यांना या अभिनेत्रीचे नाव काय आहे, हे विचारले. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच, मला माफ करा मात्र मी आयुष्यात पहिल्यांदाचं, मिना कुमारी यांचे नाव ऐकले अशी थेट आणि जाहिर कबूलीही शास्त्रीजीनी दिली.

लालबहादूर शास्त्री ११ जानेवारी १९६६ रोजी निधन झाले . मात्र शास्त्रींवर विषप्रयोग झाल्याचा आरोप त्यांच्या पत्नी ललिता शास्त्रींनी सातत्याने केला. मृत्यूनंतर त्यांचे शरीर काळेनिळे पडले होते हा त्यांच्यावरील विषप्रयोगाचा पुरावाच असल्याचे अनेकांचे मत आहे. शास्त्रींच्या रशियन स्वयंपाक्याला त्यांच्यावर विषप्रयोग केल्याच्या आरोपावरून अटकही करण्यात आली होती, मात्र नंतर त्याची निर्दोष सुटका करण्यात आली होती.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.