Home » Nirmala Devi : काय आहे ग्रीन आर्मी ?

Nirmala Devi : काय आहे ग्रीन आर्मी ?

by Team Gajawaja
0 comment
Nirmala Devi
Share

वाराणसीनगरीमधील कुशियारी या गावातील निर्मला देवी (Nirmala Devi ) या महिलेला एक दिवस चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र मिळाले. या पत्रात पंतप्रधान मोदी यांनी निर्मला देवी यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांनी दिलेल्या खास भेटीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. या निर्मलादेवी म्हणजे कोण आहेत, असा प्रश्न पडला असेल तर त्याआधी ग्रीन आर्मी म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. या ग्रीन आर्मीनं फक्त निर्मला देवीचेंच आयुष्य बदलले आहे, असे नाही तर त्यांनी या संपूर्ण परिसरातील महिलांचे आयुष्य बदलले आहे. महिलांच्या हाताला काम मिळवून दिले आहे. त्यांचा स्वाभिमान जागा केला आहे. एवढेच नाही तर नवजात मुलींच्या संरक्षणासाठीही ही ग्रीन आर्मी उभी रहात आहे. निर्मला देवींच्या या ग्रीन आर्मीनं स्थानिक महिलांना एकत्र करीत चप्पल निर्मिती उद्योगाची स्थापना केली. त्यातीलच एक चप्पल पंतप्रधान मोदी यांना पाठवली. त्यावर पंतप्रधान मोदी यांनी त्यांना आभार व्यक्त करणारे पत्र पाठवले आणि ग्रीन आर्मीच्या कार्याचे तोंडभरुन कौतुक केले आहे. वाराणसीच्या कुशियारी गावातील ग्रीन आर्मी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. (Nirmala Devi)

या ग्रीन आर्मीच्या मागे कुशियारी गावातील निर्मला देवी या महिला आहेत. यांनी गावातील महिलांना एकत्र करत उद्योग उभारणी केली. त्याची सुरुवात चप्पल बनवण्याच्या कारखान्यापासून झाली. या कारखान्यातील पहिली चप्पलांची जोडी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना भेट म्हणून पाठवली. नेहमी हिरव्या साड्यांमध्ये वावरणा-या या ग्रीन आर्मीच्या महिलांचे पंतप्रधानांनी कौतुक केले, तुमच्या भेटवस्तूचे मनापासून कौतुक होत आहे. तुमच्यासारख्या महिलांना मार्ग दाखवताना आणि आपल्या राष्ट्राच्या आणि समाजाच्या प्रगतीमध्ये योगदान देताना पाहून मला खूप अभिमान वाटतो, अशा शब्दातील पंतप्रधानांचे भलेमोठे पत्र सध्या या कुशियारी गावातील सर्वात बहुमोल ठेवा झाला आहे. या ग्रीन आर्मीची स्थापना होई पर्यंत हे कुशियारी गाव अगदी वेगळं होतं. त्याची ओळख ही, अंमली पदार्थाचा व्यापार करणारे, जुगार खेळणा-यांचे, हुंडा पद्धतीला प्रोत्साहन देणारे गाव अशी होती. मात्र निर्मला देवी यांनी पुढाकार घेत या गावाचा चेहरा मोहरा बदलून टाकला आहे. आता या गावात अंमली पदार्थ आणि जुगार यांचे नावही काढले जात नाही. (Marathi News)

जिथे मुलगी जन्माला आली तर तिच्या आईला दोष दिला जायचा, त्याच गावात आता मुलगी जन्माला आली की, ग्रीन आर्मीच्या महिला ढोल, ताशे घेऊन त्या घरात पोहचतात आणि मुलगी जन्माचा आनंदोत्सव साजरा करतात. मुख्य म्हणजे, गावातील लग्न आता विनाहुंडा होतात. महिलांवर होणा-या अन्यायाविरोधात या ग्रीन आर्मीतील महिला जाब विचारु लागल्यानं महिलांवरील छळ, लैंगिक आणि घरगुती हिंसाचाराच्या घटनांमध्ये कमी आली आहे. 2014 मध्ये स्थापन झालेल्या या ग्रीन आर्मी संघटनेमध्ये प्रामुख्याने दलित, आदिवासी आणि इतर मागास जातींमधील महिलांचा समावेश आहे. या ग्रीन आर्मीमधील महिलांनी गावात प्रथम दारुबंदी सुरु करत आपल्या कार्याची पावती दिली. त्यामुळे इतर समाजातील महिलांनाही विश्वास निर्माण झाला. आणि या संघटनेमधील महिलांची संख्या वाढली. (Nirmala Devi)

========

हे देखील वाचा : Crime Story : नरभक्षक राजा कोलंदर लोकांना मारून मेंदुच बनवायचा सूप

TAX : स्तनांपासून दाढीपर्यंत जगात लागू केलेले विचित्र TAX!

======

आता ही ग्रीन आर्मी गावातील महिलांच्या आरोग्य आणि शिक्षणाबाबतच्या कार्याला हातभार लावत आहेत. गावातील अंधश्रद्धा निर्मुलनासाठीही या ग्रीन आर्मीच्या सभासद कार्यरत असतात. ग्रीन आर्मीच्या महिला सदस्यांना पोलीसांचेही चांगले सहकार्य मिळत असून सुमारे 200 महिलांना पोलीस मित्र ओळखपत्रही मिळाले आहे. विशेष म्हणजे, कोविड काळात या ग्रीन आर्मीचे कार्य लक्षणीय ठरले. लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प असतांना या महिलांना सामाजिक उपक्रम राबवत गावाचे रोगापासून रक्षण केले. सुमारे 1800 सदस्य असलेल्या या ग्रीन आर्मीमधील महिला या स्वयंरोजगार निर्मितीमध्येही पुढे आहेत. या महिलांना चालू केलेला चप्पल निर्मिती कारखाना हा थोड्याच अवधित लोकप्रिय झाला असून त्यातील चप्पल आणि अन्य वस्तूंना मोठी मागणी आहे. याच कारखान्याची पहिली चप्पल पंतप्रधनांना पाठवल्यानं कारखान्याच्या लोकप्रियतेत अधिक वाढ झाली आहे. (Marathi News)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.