भारताच्या सभोवतालचे तीन ही बाजूंचे सागरी प्रदेश, समुद्रकिनारे हा एक वेगळा निरीक्षण करण्याचा विषय असून एखादा संपूर्ण पर्यटन विशेषांक त्यातून निघावा. अफलातून निसर्गसौंदर्य असलेले समुद्रकिनारे भारताला लाभलेत. भौगोलिकदृष्ट्यादेखील ही सर्व किनारपट्टी महत्वाची ठरते. गुजरातच्या पार अगदी पश्चिम टोकाचं द्वारका बेट. पौराणिक महत्व असलेलं ठिकाण. कृष्णाने यादवांच्या संरक्षणासाठी बसवलेली नगरी. त्याच्याच अगदी जवळ प्रभासपट्टणचा समुद्र जिथे सोरटी सोमनाथ (Somnath Jyotirlinga Temple) हे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक शिवस्थान आहे. तिथला सोमनाथ मंदिराचा परिसर आणि त्यामागचा अथांग सागर केवळ अवर्णनीय.
तिथली सुरम्य संध्या काय वर्णावी. प्रासादिक आनंद मिळतो तिथे. तिथून केवळ ८० कि.मी.अंतरावर असणारं दीव बेट. दोन तीन दिवसांच्या शांत विश्रांतीला अतिशय लायक ठिकाण. कारण संपूर्ण दीव एका दिवसात, किंबहुना सहा सात तासात भटकून घेता येतं. उत्तम हाॅटेल्स आहेत. आरामाची उत्तम दर्जेदार सुविधा असलेली सोय तिकडे आहे. दीव प्रमाणेच दमण ही केंद्रशासित असल्याने तसाच आनंद दमण येथेही मिळतो. दीव ला जायला थेट विमानसेवा आहे. दमण तर वापीपासून हाकेच्या अंतरावर आहे. पुढे डहाणू ते पेडणे इतकी मोठी लांबलचक किनारपट्टी महाराष्ट्राला लाभलीय ही देणगीच ठरावी निसर्गाची.
महाराष्ट्राची किनारपट्टी ही तर मोठी पश्चिमेची संरक्षक तटबंदीवरून ठरावी जणू. डहाणूच्या विभागात नरपड नावाचं एक छोटंसं गाव आहे. तिथला समुद्रकिनारा शांत आहे. सुरुचं बन आहे. तो समुद्र पर्यटनास उत्तम आहे. पुढे चिंचणी घोलवड गावांसही किनारे छान लाभलेत. चिकूसाठी घोलवड प्रसिद्ध. आणखी थोडं खाली आलं की पालघर केळवे माहीम बीच प्रसिद्ध आहे. अर्नाळा तर आमचं खासच आहे. “जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी”
थोडा नौकानयनाचा आनंद घेत अर्नाळा (Arnala Fort virar) इथे असलेला पेशवेकालीन किल्लाही पाहता येतो. वसई व अर्नाळा इकडे कोळीसमाज खुप आहे. पुढे भाईंदरला खाडीच्या रुपात खुप आत येणारं बॅकवाॅटर्स आडव्या मार्गाने मुंबई ठाण्याच्या पार पूर्वेस खुप आत शिरलंय व त्याच्या तटावर अनेक गावं आजही आहेत. त्यापैकी एक उत्तन येथे वनवासी कल्याण आश्रम आहे. तो पहाण्याजोगा आहे. इथे संघाचं कार्य खुप चालतं व एकदिवसीय क्रीडा सहलीस छान जागा आहे. पुढे गोराई खाडीवर तर एस. एल.वर्ल्ड नावाने मोठा नियोजनबद्ध जलक्रीडा प्रकल्प व इतर खेळ विशेष करून थोडे भयावह पण आनंद मिळवता येणारे यांत्रिक खेळ खुप आहेत.
मढ, मार्वे, आक्सा बीचचे किनारे चित्रपट व्यावसायिकांनी जम बसवलेले थोडे आरक्षित विभाग म्हटल्यास गैर नव्हे. आमचे एक काका होते. इंडो बर्मा पेट्रोलियम कंपनीचे जनरल मॅनेजर. त्या कंपनीचा एक छानदार बंगला मढ येथे होता. आम्ही सर्वजण त्या बंगल्यावर धमाल करायला जायचो. वर्षानुवर्ष तो बंगला आम्ही वापरला. “दर्या किनारी एक बंगलो ग पोरी दै जो दै” हे गाणं ऐकताना आजही मला ते दिवस आठवतात.

वर्सोवा, खार दांडा, माहीम, जुहू पार अगदी दादर चौपाटीपर्यंत कोळी लोकवस्तीने दाटलेला भाग आहे. गिरगाव चौपाटीला फक्त धमाल करायला भेळपुरी खायला जावं आणि अगदी नरिमनपर्यंत, कुलाब्यापर्यंत बरीच विरळ वस्ती आणि पारशी समुदाय असलेला विभाग आहे. गेट वे आँफ इंडिया ही महान वास्तू आणि त्या समोरचा अथांग जलसागर म्हणजे तर मुंबईची शान आहे. पूर्व विभागात असलेला भाऊचा धक्का हा जलपर्यटन व्यवसायाचा विभाग आहे. थोडासा सागर जलाशयाचा आत आलेला भाग पण खाडी म्हणता येणार नाही असा, जिथुन उरण, एलिफंटा गुहा, रेवस, मांडवा बंदर येथे जल वाहतूक होते. कमी वेळात कमी खर्चात इकडे पोचता येतं.
अलिबाग, किहीम पासून कोकण किनारपट्टी सुरू होते. अलिबाग म्हणजे जवानीचा जोर असणाऱ्या तरुणाईतील पछाडलेल्या युवकांना उन्माद व्यक्त करायला मोकळी मिळालेली जागा… हेच अलिबागचं स्वरूप बनायला लागलंय. मुरूड जंजिरा आणि मुरूडच्या हर्णे दोनही मध्यवर्ती कोकणवासीयांचा सागरी परिसर पाहून खुद्द छत्रपती शिवाजी राजेही आनंदले. दूरदृष्टी ठेऊन योजना पूर्वक त्यांनी सागरी किल्ले बांधून घेतले. हर्णेयेथील सुवर्णदुर्ग तर मराठ्यांच्या आरमाराचं प्रमुख स्थान. मालवणचा किल्ला हा केवळ तटबंदी कशी असावी याचा अभ्यास करण्याजोगा आहे. बाणकोटचा किल्ला ही तसाच.
(क्रमशः)
॥ शुभं भवतु ॥
पं.युधामन्यु गद्रे.
Yudhamanyu@gmail.com