Home » शेख हसीनांच्या सिंहासनाला हादरा देणारे तिन खांब !

शेख हसीनांच्या सिंहासनाला हादरा देणारे तिन खांब !

by Team Gajawaja
0 comment
Bangladesh Agitation
Share

बांगलादेशात आरक्षणावरून सुरु झालेल्या आंदोलनात ४० दिवसांत ४०० हून अधिकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर पंतप्रधान शेख हसीना वाजेद यांना अवघ्या ४५ मिनिटांत देश सोडला. लष्कराच्या विमानानं त्या भारतातील गाझियाबाद येथील हिंडन एअरबेसच्या सेफ हाऊसमध्ये आल्या. आता भारतातूनही त्या अन्य देशात रवाना झाल्या आहेत. शेख हसीना यांनी ज्या विद्यार्थी आंदोलनाकडे सुरुवातीला दुर्लक्ष केले आणि आंदोलकांची अवहेलना केली, त्याच आंदोलकांनी त्यांना देश सोडालयला भाग पाडले. बांगलादेशात सुरु झालेल्या या आंदोलनात तीन विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची होती. आसिफ महमूद, नाहिद इस्लाम आणि अबू बकर मजुमदार हे या आरक्षणविरोधी आंदोलनाचे तीन प्रमुख चेहरे आहेत. या तिघांचेही वय २६ ते ३० वर्षांपर्यंत आहे. (Bangladesh Agitation)

१९७१ च्या युद्धातील दिग्गज आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या वंशजांना ३० टक्के कोटा देण्याचा निर्णय दिल्यावर ही चळवळ सुरू झाली. या आंदोलनात पहिले नाव येते ते २६ वर्षाच्या नाहिद इस्लाम याचे नाहिद इस्लाम हा विद्यार्थी नेता असून तो ‘स्टुडंट्स अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन’ या विद्यार्थी संघटनेची समन्वयक आहे. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता नाहिद यांनी येत्या २४ तासांत बांगलादेशमध्ये अंतरिम सरकार स्थापन करण्याचे आवाहन केले आहे. नाहिद ढाका विद्यापीठातील समाजशास्त्र विभागाचा विद्यार्थी असून मानवाधिकार रक्षक म्हणून त्याची ख्याती आहे. या निदर्शनाच्या माध्यमातून नाहिदने बांगलादेशातील सरकारी नोकऱ्यांमधील कोटा पद्धतीत सुधारणा करण्याची मागणी केली आहे. शेख हसीना यांच्या अवामी लीगच्या विरोधात नाहिद कायम आवाज उठवत आहे. यामुळे त्याला अनेकवेळा अटकही झाली आहे. (Bangladesh Agitation)

१९ जुलै २०२४ रोजी नाहिदचे साबुजबाग येथील घरातून २५ जणांनी अपहरण केले. त्याच्या डोळ्यावर पट्टी बांधली गेली आणि हातकड्या घातल्या गेल्या. यानंतर नाहिदला चौकशीच्या नावावर मारहाण करण्यात आली. अपहरणानंतर दोन दिवसांनी तो पूर्वाचलमधील एका पुलाखाली बेशुद्धावस्थेत आणि जखमी अवस्थेत सापडला होता. त्यानंतरही २६ जुलै रोजी त्याला जखमी अवस्थेतूनच अटक करण्यात आली. यावेळीही त्याला जबर मारहाण करण्यात आली. नाहिदने दावा केला की, आंदोलन संपवण्यासाठी त्याचे व्हिडिओही बनवण्यात आले होते.

मात्र, नाहिद इस्लाम अटकेतून त्यानी सुरु केलेले आंदोलन अधिकच हिंसक झाले. त्यानंतर येतो तो आसिफ महमूद. आसिफ हा ढाका विद्यापीठातील भाषा अभ्यासाचा विद्यार्थी आहे. जूनमध्ये सुरू झालेल्या आरक्षणाविरोधातील देशव्यापी आंदोलनात तो सहभागी झाला. त्यालाही नाहिदसोबत २६ जुलै रोजी पोलीसांनी ताब्यात घेऊन आंदोलन संपवण्यासाठी मारहाण केली होती. अबू बकर मजुमदार हा विद्यार्थीही आंदोलकांमध्ये आहे. अबू हा सुद्धा ढाका विद्यापीठातील भूगोल विभागाचा विद्यार्थी आहे. तो नागरी हक्क आणि मानवी हक्कांवरही काम करतो. (Bangladesh Agitation)

===================

हे देखील वाचा : जातीय दंगलींनी राजाचा देश बेजार !

====================

या तिघांनीही आंदोलनाची दिशा ठरवली. अनेकवेळा त्यांना पोलीसांनी अटक केली असून मारहाण केली आहे. या तिघांनाही अटक करुन इंजेक्शनच्या आधारे बेशुद्ध करण्यात आले होते. यानंतर आंदोलन मागे घेत असल्याचे व्हिडिओ शुट करण्यात आले. यासाठी या तिघांनाही जबर मारहाण करण्यात आली आहे. यादरम्यान या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांनाही त्यांना भेटण्यास मनाई करण्यात आली होती. १ ऑगस्ट रोजी या तिघांची पोलीसांच्या तावडीतून सुटका करण्यात आली. ३ ऑगस्ट रोजी असिफने फेसबुकवर पोस्ट करून विद्यार्थ्यांना घराबाहेर पडण्याचे आवाहन केले.

आता या तिघाही विद्यार्थ्यांच्या पुढाकारानं सुरु झालेल्या आंदोलनात देशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या देशाला सोडून अन्यत्र आश्रय घ्यावा लागला आहे. यानंतरही या विद्यार्थ्यांनी बांगलादेशाच्या पुढच्या राजकीय घडामोडीमध्ये आपला सहभाग मोठा असेल याची चुणूक दिली आहे. कारण लष्कराला देशाचा ताबा स्विकारु देणार नाही, लष्करी राजवट नको तर लोकशाही हवी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. या विद्यार्थ्यांनी बांगलादेशच्या उच्च न्यायालयाने आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर त्याचा विरोध केला होता. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या नातेवाईकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये दिलेल्या आरक्षणाला कडाडून विरोध केला. आता येथील पुढील चळवळींमध्ये या विद्यार्थ्यांची भूमिका महत्त्वाची रहाणार आहे. (Bangladesh Agitation)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.