आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या सामान्य जनतेला पैशाअभावी चांगले उपचार मिळत नाही. यामुळे अनेक लोकांना आपल्या प्राणांना देखील मुकावे लागते. मात्र आता भारत सरकारने आरोग्य उपचार मोफत मिळावेत यासाठी केंद्र शासनाकडून ‘आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ राबविली आहे. देशातील कोट्यवधी लोकं या योजनेत सहभागी झाले आहेत आणि अजूनही होत आहे. या योजनेतून लाभार्थ्याला 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार दिले जात आहे.
भारत सरकारने 2018 सालापासून या योजनेला सुरूवात झाली. या योजनेला सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. नुकताच या योजनेचा विस्तार करण्यात आला. आता ७० वर्षांहून जास्त वय असलेल्या वृद्धांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
या योजनेअंतर्गत देशातील २९ हजारांहून जास्त रुग्णालयांमध्ये कॅशलेस व पेपरलेस आरोग्य सुविधांचा लाभ नागरिक घेऊ शकतात. ३० जून २०२४ पर्यंत या योजनेचा लाभ ३४.७ कोटी लोकांनी घेतला आहे. नुकत्याच झालेल्या कॅबिनेट बैठकीत ७० वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. यामुळे सहा कोटी ज्येष्ठ नागरिकांना फायदा होईल.
आज लेखातून जाणून घेऊया जाणून घेऊया- आयुष्यमान योजनेचा लाभ कोण घेवू शकते, लाभार्थ्यांची पात्रता कशी निश्चित होते, यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा, आयुष्यमान योजनेचे गोल्डन कार्ड म्हणजे नक्की काय, ते कसे मिळवायचे.
आयुष्मान भारत योजनेसाठी पात्रता
आयुष्मान भारत योजनेसाठी कच्चे घर असणारी लोकं, ग्रामीण भागात राहणारे लोकं, तृतीयपंथी, दारिद्र्यरेषेखालील लोकं, भूमिहीन लोकं, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकं तसेच कमी उत्पन्न गटातील लोकं अर्ज करू शकतात आहेत. यासोबतच जे लोकं असंघटित क्षेत्रात काम करतात, मजुरी करून उदरनिर्वाह करतात ते सर्व या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
जर तुम्हाला तुमच्या संपूर्ण कुटुंबाचे हे आयुष्मान भारत कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे असलेले ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र आणि इतर कोणतेही सरकारी ओळखपत्र घेऊन कॉमन सर्व्हिस सेंटर किंवा UTI-ITSL या केंद्रावर जावे तिथे तुमची सर्व कागदपत्रे तपासली जातील. त्यानंतर तुम्हाला सांगितले जाईल की तुम्ही या योजनेसाठी पात्र आहेत की नाही. आणि जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला आयुष्मान कार्ड बनवून मिळेल.
असा करा ऑनलाईन अर्ज (वेबसाईटद्वारे)
१) सर्वात आधी mera.pmjay.gov.in या अधिकृत वेबसाईटवर लॉग इन करा.
२) त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक आणि स्क्रिनवर दिलेला कॅप्चा कोड टाका.
३) तुमच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तो स्क्रिनवर दिलेल्या रकान्यांमध्ये भरा.
४) आता तुमच्या स्क्रीनवर एक नवीन पेज ओपन होईल.
५) तिथे तुम्ही ज्या राज्यातून अर्ज करत आहात त्या राज्याचा पर्याय निवडा.
६) मग तुमची पात्रता तपासण्यासाठी मोबाईल क्रमांक, नाव, रेशन कार्ड नंबर किंवा RSBY URN नंबर टाका.
७) जर तुमचं नाव तुम्हाला समोर ओपन असलेल्या पेजच्या उजव्या बाजूला दिसत असेल, तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात.
८) तुम्ही Family Number टॅबवर क्लिक करून योजनेसंदर्भातील तपशील देखील तपासू शकता.
९) याशिवाय, तुम्ही जवळच्या जनसेवा केंद्राला भेट देऊन तुमची पात्रता तपासू शकता.
ऑनलाइन आयुष्मान असे काढा? (मोबाइल अँप द्वारे)
१) गुगल प्ले स्टोअरवरून ‘आयुष्मान’ ॲप डाउनलोड करा.
२) ॲप डाउनलोड मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा.
३) तुमची पात्रता तपासा.
४) पात्र असाल तर आधार ई-केवायसी करा.
५) फोटो अपलोड करा आणि कार्ड डाउनलोड करा
टोल फ्री क्रमांक 14555 वर करता येणार कॉल
आयुष्मान कार्डशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी तुम्ही टोल फ्री क्रमांक 14555 वर कॉल करू शकता. हे कार्ड बनवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. कोणत्या हॉस्पिटलमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे त्याची सर्व माहिती मिळेल. सध्या दिल्ली, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये आयुष्मान योजना नाही. या राज्य सरकारांनी ही योजना लागू केलेली नाही.
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत उपचार होणारे आजार
या योजनेंतर्गत करोना, कॅन्सर, किडनीचे आजार, हृदयविकार, डेंग्यू, चिकनगुनिया, मलेरिया, डायलिसिस, गुडघे आणि हिप रिप्लेसमेंट, वंध्यत्व, मोतीबिंदू अशा गंभीर आजारांवर मोफत उपचार केले जातात.
एका कुटुंबातील किती लोकांचे आयुष्मान कार्ड काढता येतात?
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत एकाच कुटुंबातील किती लोकांचे कार्ड काढता येतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबातील सदस्य संख्येबाबत कोणतीही मर्यादा नाही. जे या योजनेसाठी पात्र आहेत, ते आयुष्मान कार्ड काढू शकतात.