दगडी चाळ २ चा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि पुन्हा अरुण गवळी (Arun Gawli) चर्चेत आला. मुंबईतल्या डॉन्सपैकी जिवंत आणि मुंबईत राहणारा अरुण गवळी कदाचित एकमेव डॉन असावा. त्याचे समकालीन डॉन काही पोलिसांच्या गोळीने मृत्यूमुखी पडले आहेत, तर काही देशाबाहेर पळून गेले आहेत. छोटा राजन आणि अबू सालेम सध्या तुरुंगाची हवा खात आहेत. पोलीस आणि दाऊदपासून वाचलेला अरुण गवळी सध्या जिवंत आहे आणि सुखरुप आहे. असे असले तरी दाऊदपासून वाचण्यासाठी अरुण गवळीने तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडेंकडे सुरक्षेसाठी अर्ज केला होता.
एन्काऊंटर स्पेशालिस्ट
आज जितकी मुंबई शांत वाटते तितकी शांत ती ८० आणि विशेषतः ९०च्या दशकात नव्हती. मुंबईत टोळीयुद्ध सुरू होते आणि पोलिसांकडून या गुडांचा खात्मा केला जात होता. एखादा गुंड टोळीयुद्धात किंवा पोलिसांच्या गोळीने मरत होता. हे एन्काऊंटर करण्यात आघाडीवर होते पोलीस अधिकरी विजय साळसकर, दया नायक, प्रदीप शर्मा, रवींद्र आंग्रे, प्रफुल भोसले आणि संजय कदम.
विजय साळसकर विरूध्द अरुण गवळी (Arun Gawli)
दाऊदपासून सुटका मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकार अरुण गवळीच्या मागे लागली होती. अरुण गवळी एन्काऊंटरपासून वाचण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत होता. सरकारचा ससेमिरा कायमचा संपवण्यासाठी अरुण गवळीने थेट राजकारणात एंट्री घेतली होती आणि आमदारही झाला होता. विजय साळसकर आपल्या जिवावर उठले आहेत असे गवळीने एका पत्रकार परिषदेत म्हटले होते. विजय साळसकर यांच्यापासून आपल्याला भिती वाटते म्हणून आपल्याला संरक्षण हवे असेही गवळीने म्हटले होते.
गवळी आमदार झाला होता तरी साळसकर यांनी गवळीचा पिच्छा सोडला नव्हता. साळसकर म्हणाले होते, “गवळी भलेही आमदार झाला असेल पण माझ्यासाठी तो आधीचा मुंबईचा डॉनच आहे. त्याच्या हालचालींवर मी बारीक लक्ष ठेवून आहे. कुठल्याही गुन्हेगारी घटनेत त्यांचा किंवा त्याचा टोळीचा सहभाग असल्याचे माझ्या लक्षात आले, तर कुठलीही भीडभाड न बाळगता मी दगडी चाळीवर धाड टाकेन. उद्या त्याला अटक जरी करावी लागली तरी मी त्यासाठी मागेपुढे पाहणार नाही.
आता गवळी आमदार झाला आहे आणि त्याला अटक करण्यासाठी विशिष्ट प्रक्रिया पार पाडावी लागेल. यासाठी मी माझ्या वरिष्ठांची नक्की परवानगी घेईन. गवळीला यापूर्वी अनेक वेळेला पोलीस सुरक्षा नाकारली आहे. तेव्हा त्याच्या साथीदारांना मीच टिपून ठार मारले आहे. गवळी आणि त्याचे साथीदार मला घाबरून आहेत. गवळी जर खरंच बदलला असेल आणि त्याने आता कुठलाही गुन्हा केला नसेल, तर त्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. आम्ही निर्दोष माणासांना लक्ष्य करत नाही.” (Lesser known Fact about Arun Gawli)
=====
हे देखील वाचा – विलासरावांच्या फिल्डींगमुळे राणे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत
=====
मुंडेंच्या टेबलावर अरुण गवळीचा अर्ज
दाऊद आपल्या विरोधकांना शोधून शोधून मारत होता. तेव्हा गवळीला कुणीतरी राज्य सरकारकडून सुरक्षा घे, असा सल्ला दिला होता. १९९५ साली राज्यात युतीचे सरकार होते. शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले होते, तर गोपीनाथ मुंडे गृहमंत्री झाले होते. राज्यात शिवसेना मोठी होती आणि भाजप छोट्या भावाच्या भूमिकेत होता. मिळालेल्या सल्ल्यानुसार गवळीने राज्य सरकारकडे सुरक्षेसाठी अर्ज केला होता, परंतु मुंडे यांनी गवळीचा अर्ज केराच्या टोपलीत फेकला होता. हुसैन झैदी यांनी आपल्या भायखळा ते बँकाँक या पुस्तकात हा किस्सा सांगितला आहे.
गृहमंत्री गोपीनाथ मुंडे, उपमुख्यमंत्रीदेखील होते. मुंडे भाजपचे नेते होते आणि अतिशय शिस्तीने, कठोरपणे आपल्या खात्यांचा कारभार चालवत असत. सेना-भाजप युतीमध्ये सेनेला वरिष्ठ स्थान दिले जात असले तरी, पक्षाच्या राष्टीय प्रतिमेची जबाबदारी आपल्यावर आहे, अशी मुंडे यांची धारणा होती. सेनेला राजकारणातील व्यापक मुद्द्यांचे योग्य आकलन झालेले नाही असेही त्यांचे मत होते. (Lesser known Fact about Arun Gawli)
मुंडे यांनी गवळीचा अर्ज बघताक्षणी तो केराच्या टोपलीत फेकून दिला. तसंच त्या अर्जाची शिफारस करणाऱ्यांची व त्यांच्यापर्यंत पाठवणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची त्यांनी खरडपट्टीही काढली. अशी अचाट मागणी करणारा अर्ज इतक्या खात्यांमधून शिफारस होऊन पढे येतोच कसा? तो सरुवातीलाच फेटाळला का गेला नाही? याचे त्यांनी स्पष्टीकरण मागितले. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत अगदी पक्षाच्या सर्वोच्च नेत्याने सांगितले तरी सरकारी संरक्षण द्यायचे नाही या भूमिकेवर मुंडे ठाम होते असे या पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. (Arun Gawli)
संदर्भ:
Byculla to Bangkok – Mumbai’s Maharashtrian Mobsters
Times of India Date 19 October 2004