सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी या लहानशा खेड्यात १९२३ च्या ३ सप्टेंबरला शेतकरी कुटुंबात पुत्ररत्न जन्मले. साबळे घरात सूर्य उगवला आणि शाहिरी प्रकाश पडला! गायकीचा वारसा शाहिरांना आई वडिलांकडून मिळाला. बासरीशी खेळता-खेळता लहानपणीच बासरी वादनाची आवड लागली. गावच्या भजनी मंडळात ते गात असत. प्राथमिक शिक्षण पसरणी येथे घेऊन पुढील शिक्षणासाठी ते त्यांच्या मामाकडे – अमळनेर या गावी गेले. तेथे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी शाळा सोडली. त्यानंतर ते साने गुरुजींच्या सहवासात राहू लागले!
साने गुरुजींसोबत स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊ लागले.. साने गुरुजींकडून प्रखर राष्ट्रवाद आणि निर्व्याज देशभक्तीचे बाळकडू त्यांनी आत्मसात केले. याच काळात त्यांनी ‘जागृती शाहीर मंडळाची’ सुरुवात केली. 1942 साली शाहीर शंकरराव निकम यांच्याकडून त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. स्वातंत्र्य चळवळ, हैदराबाद मुक्तिसंग्राम, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि गोवा मुक्ती आंदोलन या माध्यमातून राजकीय आणि सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करणारा शाहिरांचा डफ कडाडत राहिला!
कालांतराने त्यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमानं शाहीरांचं आयुष्यच बदलून गेलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील लोकांच्या कला एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची सुरुवात या कार्यक्रमाने केली. शाहीरांसोबतच लोककला जपणाऱ्या कलाकारांना देखील महत्वाचे स्थान मिळाले. महाराष्ट्रातील लावणी नृत्य, बाल्या नृत्य, कोळी नृत्य, गोंधळी नृत्य, मंगळागौर, वाघ्या, मुरळी, वासुदेव, धनगर असे विविध नृत्यप्रकार त्यांनी कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले! महाराष्ट्राच्या विविधांगी संस्कृती आणि कलांचे दर्शन घडवणारा हा कार्यक्रम तुफान गाजला.
आपली कला पुढील पिढीला शिकवता यावी, यासाठी त्यांनी ‘शाहीर साबळे प्रतिष्ठान’ची स्थापना केली! संगीत दिग्दर्शक मुलगा देवदत्त, नृत्यदिग्दर्शिका कन्या चारुशीला, यशोधरा असं हे साबळे कुटुंब महाराष्ट्राच्या लोकधारेत सामावून गेलं होतं. शाहीर साबळे यांनी अंगिकारलेला कौटुंबिक गायकी आणि शाहिरी वारसा जपण्याचे काम त्यांची पुढील पिढी तितक्याच जोमाने करत आहे. हा शाहिरी वारसा त्यांचे नातू, प्रख्यात सिने-नाट्य दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही मनःपूर्वक जोपासला.
मुक्त नाट्याचे आद्यप्रवर्तक लोकशाहीर कृष्णराव साबळे तथा शाहीर साबळे यांचे २० मार्च २०१५ रोजी वृद्धापकाळाने मुंबईत निधन झाले आणि अवघ्या लोककलाकारांवर दुःखाची शोककळा पसरली. महाराष्ट्राची लोककला जगाच्या कानाकोपर्यात पोहोचवणाऱ्या या महान कलावंताच्या रुपाने महाराष्ट्राचा बुलंद आवाज हरपला, अशा प्रतिक्रिया देखील व्यक्त झाल्या.
काळाच्या पडद्याआड गेलेल्या या शाहिराला आदरांजली वाहताना दोनच ओळी ओठांवर येतात.. ‘आडवा डोंगर, तयाला माझा नमस्कार!’