शनिग्रह (Saturn) हा सूर्यापासून सहावा ग्रह आहे आणि गुरूनंतर सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह आहे. या शनिग्रहाची धास्तीच अधिक आहे. अर्थात या ग्रहाचा धाकच तसाच आहे. पृथ्वीपेक्षा या ग्रहाची त्रिज्या सरासरी साडेनऊ पट आहे. शिवाय आपल्याकडे शनिची साडेसाती हा शब्द ऐकला की ही भल्याभल्यांना घाम फुटतो. धार्मिक ग्रंथात शनीला न्यायदेवताही म्हणतात. आपल्या चांगल्या वाईट कामांचा मोबदला हा शनिग्रह देतो असे मानले जाते. या शनिग्रहाबाबत शास्त्रज्ञांनाही अनेक उत्सुकता आहे. विशेषतः शनिभोवती असणा-या रिंगांबद्दल उत्सुकता आहे. शनिग्रहावरील वातावरण कसे असेल, हे शोधण्यासाठी वैज्ञानिकांचे प्रयत्न चालू आहेत. यामधूनच एक मोठी माहिती पुढे आली आहे. ती म्हणजे, शनीग्रहावर 100 वर्ष चालतील एवढ्या प्रचंड ताकदीचे वादळ उठले आहे. या वादळांनी या ग्रहावरील वातावरणात प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे. ठराविक वर्षाच्या कालखंडानंतर अशाच प्रकारचे महातुफान या शनीग्रहावर होत असल्याचा शोधही शास्त्रज्ञांनी लावला आहे.
शनि ग्रहाबाबत (Saturn) अमेरिकेतील नासा ही अंतराळ संस्था गेली अनेक वर्ष संशोधन करीत आहे. शिवाय भारत, चीन आणि जपान येथीलही अंतराळ संस्था या निळ्या रंगाच्या ग्रहाबाबत संशोधन करीत आहेत. त्यात आता जपानमधील एका संशोधकानं शनि ग्रहाबाबत एक धक्कादायक संशोधन सादर केले आहे. त्या अहवालानुसार शनि ग्रहावर दीर्घकाळ चालणारे वादळ होत आहे. हे वादळ थोडेथोडके काळ होईल असे नाही, तर जवळपास 100 वर्ष हे वादळ शनि ग्रहावर होणार आहे. रेडिओ उत्सर्जन आणि अमोनिया वायूच्या अभ्यासाद्वारे, तज्ञांनी शनि ग्रहावर येणा-या या महावादळाची भविष्यवाणी केली आहे. या वादळाचा खूप मोठा परिणाम शनिग्रहावर चालू असलेल्या संशोधनावर होणार आहे. जवळपास शंभर वर्ष चालणा-या या वादळांनी शनि ग्रहावर यान पाठवण्याच्या नासाच्या मोहिमेलाही फटका बसणार आहे.
यासंदर्भात संशोधन करणा-या शास्त्रज्ञांनी सांगितले आहे की, ग्रेट रेड स्पॉट म्हणून ओळखल्या जाणार्या सौर मंडळातील सर्वात मोठ्या 10,000 मैल-रुंद अँटीसायक्लोनने शेकडो वर्षांपासून गुरूच्या पृष्ठभागावर ढग साचले आहेत. शनिग्रहाच्या पृष्ठभागावरही अशाच स्वरुपाचे ढग असून वर्षानुवर्ष चालणा-या वादळाचा हा परिणाम असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. मिशिगन-अॅन आर्बर विद्यापीठात शनिग्रहावरील (Saturn) वादळांवर संशोधन चालू आहे.
या संशोधनात अनेक देशातील खगोलशास्त्रज्ञही सहभागी झाले आहेत. या खगोलशास्त्रज्ञांनी शनीच्या रेडिओ उत्सर्जनाचा अभ्यास केला. यात आश्चर्यकारक बदल आढळून आला आहे. वातावरणातील अमोनिया वायूच्या एकाग्रतेतील विसंगती आढळून आली आहे. त्यावरुन शास्त्रज्ञांनी शनि ग्रहाच्या उत्तर गोलार्धातील पूर्वी होऊन गेलेल्या अशाच मोठ्या वादळांचाही अभ्यास करुन हा निष्कर्ष दिला आहे. हजारो वर्षापूर्वी झालेल्या शनिग्रहावरील वादळांच्या खुणाही ग्रहावर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. त्यांच्या मते पर्जन्य आणि पुन: बाष्पीभवन प्रक्रियेद्वारे अमोनिया वाहून नेला जातो. त्याचा प्रभाव शेकडो वर्षे राहू शकतो. सायन्स अॅडव्हान्सेस या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की जरी शनि आणि गुरू हे दोन्ही हायड्रोजन वायूपासून बनलेले असले तरी दोन्ही ग्रहांमध्ये बरेच फरक आहेत. अंदाजे दर 20 ते 30 वर्षांनी शनीवर मेगास्टॉर्म्स होतात आणि ते पृथ्वीवरील वादळांसारखेच असतात. परंतु पृथ्वीवरील वादळांच्या विपरीत, शनीच्या वातावरणात जो मोठी वादळे येतात ती हायड्रोजन आणि हेलियमपासून बनलेली असतात. (Saturn)
=========
हे देखील वाचा : अंतराळात ही प्रयोगशाळा कोणाची
=========
शनिवर (Saturn) येणा-या या वादळांचा शनिग्रहावर होणा-या संशोधनात फार मोठी अडचण होणार आहे. पण या संदर्भात अधिक संशोधन करण्याची गरज असल्याचेही शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. कदाचित या वादळांमुळे होणा-या वातावरण बदलांचा फायदा संशोधऩास होऊ शकतो, असा आशावादही शास्त्रज्ञ व्यक्त करीत आहेत. पण भारतात या वादळांचा काय परिणाम होतो, हा मुख्य मुद्दा आहे. आपल्याकडे पत्रिकेमध्ये शनि ग्रहाची भूमिका प्रमुख असते. आता याच शनिग्रहावर महावादळ होणार आहे. तेही शंभर वर्ष चालेल असे. त्याचा परिणाम नक्की कोणावर आणि कसा होईल हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
सई बने