Home » पायलट व्हायचं आहे अशी करा तयारी

पायलट व्हायचं आहे अशी करा तयारी

by Team Gajawaja
0 comment
pilot
Share

विमान चालवण्याचे म्हणजेच पायलट बनण्याचे स्वप्न कित्येक तरुण-तरुणी बघत असतात. भलेमोठे विमान हवेत उडवायचे म्हणजे मोठी कला आहे. यासाठी काही वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यासाठी शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपावे लागते. आवश्यक अशा वैद्यकीय चाचण्या पार पाडाव्या लागतात.  शैक्षणिक पात्रताही महत्त्वाची असते. मात्र याची माहिती अनेक तरुण-तरुणींना नसते. ज्यांना पायलट म्हणून आपली कारकीर्द घडवायची इच्छा आहे त्यांनी पायलट होण्यासाठी नक्की काय करावं लागतं हे समजून घेणं आवश्यक आहे. त्याबद्दलच माहिती घेऊया (Pilot)

दोन वर्षाचा कोरोनाचा काळ वगळता हवाई क्षेत्रात काम म्हणजे सुगीचे दिवस असतात. आता तर या क्षेत्राला सोनेरी दिवस आले आहेत. कारण पर्यटन क्षेत्राचाही मोठ्या प्रमाणात विकास होतोय, त्यासोबत हवाई कंपन्यांची संख्या वाढतेय आणि या सर्वात वैमानिकांची मागणी वाढली आहे. येत्या काही वर्षांत भारतात हजाराहून अधिक पूर्णपणे प्रशिक्षित पायलटची आवश्यकता भासणार आहे. 

पायलट म्हणून काम करताना प्रथम खाजगी पायलट परवाना म्हणजेच पीपीएल किंवा कमर्शियल वैमानिक परवाना म्हणजे सीपीएल मिळवावा लागतो. त्यासाठी शैक्षणिक आणि वैद्यकीय अटी असतात.  वैमानिक होण्याचे स्वप्न बघणाऱ्या बहुतांश तरुण एनडीएमध्ये प्रवेश घेण्यास उत्सुक असतात. कारण भारतीय संरक्षण दलात जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न अनेक तरुण बघत असतात. त्यासाठी बारावी सायन्सची परीक्षा ही मुख्य अट असते. स्पर्धात्मक प्रवेश परीक्षा पास झालेल्या तरुणांना खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण अकॅडेमी येथे 3 वर्षां चे प्रशिक्षण दिले जाते. त्यानंतर हे युवक वायुसेनेत दाखल होतात. (Pilot)

याशिवाय खाजगी क्षेत्रातही तरुणांना संधी आहे. भारतात 30 पेक्षाही अधिक फ्लाइट स्कूल आहेत.  याशिवाय परदेशातीला प्रशिक्षण संस्थांमध्येही प्रवेश घेता येतो.  

भारतात पायलट होण्यासाठी प्रशिक्षण घ्यायचे असले तर, किमान वयोमर्यादा 17 वर्षे इतकी आहे.  विद्यार्थ्याला 12 वी मध्ये गणिक आणि भौतिकशास्त्र या विषयात कमीतकमी 50 टक्के गुण असणं आवश्यक आहे. भारतात पायलटना सेवानिवृत्तीचे वय 67 वर्षे आहे.  त्यातही विविध प्रकार आहेत.  त्यामुळे पायलट म्हणून काम करताना असे अनेक पर्याय उत्तम प्रशिक्षित वैमानिकांसाठी उपलब्ध असतात. (Pilot)

====

 हे देखील वाचा – वाचा टायटॅनिक पेक्षा जास्त प्राणहानी सोसलेल्या महाराष्ट्रातील रामदास बोटीचा इतिहास..

====

पायलट प्रशिक्षणासाठी पाच टप्पे महत्त्वाचे असतात.  त्यातला पहिला म्हणजे आवश्यक परवाना.  यासोबत  इन्स्ट्रुमेंट रेटिंग गरजेचे असते. म्हणजेच तुम्ही कोणत्याही हवामान स्थितीत फक्त उपकरांच्या आधारे विमान उडवू शकता, याचे रेटींग.  ज्या फ्लाइट स्कूलमध्ये प्रशिक्षण होते, त्या स्कूल हे इन्स्ट्रुमेंट रेटिंग देतात. यानुसार पायलटचा दर्जा ठरतो. विमान वाहतूक पायलट परवानाही गरजेचा असतो. एखाद्या फ्लाइट स्कूलच्या या सर्व प्रशिक्षणाचा कालावधी साधारण तीन वर्षाचा असतो आणि यासाठी अंदाजे 35 ते 40 लाखांपर्यंत फी आकारणी केली जाते.  

भारतासोबत अमेरिका, इंडोनेशिया,  फिलीपिन्स, सिंगापूर येथेही पायलट प्रशिक्षणाचे अभ्यासक्रम चालवण्यात येतात. येथे भारतापेक्षा कमी खर्च येतो. मात्र हे प्रशिक्षण झाल्यावर भारतातला परवाना मिळवण्यासाठी काही अन्य परीक्षा देण्याची गरज भासते.  (Pilot)

पायलट होण्यासाठी विज्ञान विषयात 12 वी पूर्ण केल्याची प्रमुख अट असली तरी काही प्रशिक्षण संस्थांमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जातो. मात्र या सर्व प्रशिक्षण संस्थांना भारतीय नागरी विमान वाहतूक महासंचालनाचा परवाना प्राप्त आहे किंवा नाही याची खात्री करणे गरजेचे आहे. काही प्रशिक्षण संस्थांमध्ये कोणत्याही विषयात बॅचलर पदवीची अट आहे.   

12 वी  नंतर पायलट प्रशिक्षण अभ्यासक्रमांसाठी भारतात इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकादमी, बॉम्बे फ्लाइंग क्लब, राजीव गांधी अकादमी ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी, मध्य प्रदेश फ्लाइंग क्लब,राष्ट्रीय उड्डाण प्रशिक्षण संस्था या संस्थांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये पायलटच्या परव्यानासाठी एक गोष्ट सामायिक आहे, ती म्हणजे, व्यावसायिक पायलटच्या परवान्यासाठी 250 तास उड्डाणाची आवश्यकता, तर एअरलाइन पायलट साठी 1,500 तास उड्डाण वेळ गरजेची असते. यातून नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाने मान्य केलेले परवाने भावी पायलटना देण्यात येतात. त्यामध्ये खाजगी पायलट परवाना (PPL), कमर्शियल पायलट लायसन्स (CPL), विमान वाहतूक पायलट परवाना (ATP), मल्टी-क्रू पायलट लायसन्स (MPL), कमर्शियल मल्टी-इंजिन जमीन (CMEL), प्रमाणित फ्लाइट इंस्ट्रक्टर (CFL) असे परवाने मिळालेले पायलट विविध विमान वाहतूक सेवेसमध्ये सामिल होतात. अलिकडे स्थानिक पातळीवरही विमानतळांची संख्या वाढवण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार भविष्यात पायलट होणाऱ्या युवक-युवतींची संख्या वाढणार आहे.(Pilot)

– सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.