Home » जलपत्नी – महाराष्ट्रातील या गावात होतोय चक्क पाण्यासाठी विवाह! 

जलपत्नी – महाराष्ट्रातील या गावात होतोय चक्क पाण्यासाठी विवाह! 

by Team Gajawaja
0 comment
जलपत्नी
Share

मार्च महिना चालू झालं की कडक उन्हासोबत झळ बसू लागते ती पाणी टंचाईची. भारतामध्ये पाणी टंचाईची समस्या आजही पूर्वीइतकीच गंभीर आहे. सध्या भारतामध्ये जगातील गोड्या पाण्याच्या संसाधनांपैकी केवळ ४ टक्के पाणी आहे.  

आपल्या प्रमुख नद्यांमध्ये प्रचंड प्रदूषण ही अजून एक गंभीर गोष्ट आहे. आपल्याकडील जवळपास ७० टक्के जलस्रोत प्रदूषित आहेत केंद्रीय भूजल मंडळाच्या आकडेवारीनुसार भारतामधील ७०० पैकी २५६ जिल्ह्यांमध्ये भूजल पातळी ‘गंभीर’ किंवा ‘अतिशोषित’ या प्रकारामध्ये नोंदवली गेली आहे. 

भारत हा अजूनही विकसनशील देश मानला जातो. दुर्गम भागांमध्ये पाणी टंचाई हा मुद्दा इतका गंभीर आहे की कळशीभर पाण्यासाठीही कित्येक किलोमीटरची पायपीट करावी लागते. शहरामध्ये घराघरात आतनी जवळपास प्रत्येक खोलीत पाण्याचा नळ असतो. काही तास जरी पाणी गेलं तरी लोकांची चिडचिड होते. परंतु, ज्या दुर्गम भागांमध्ये पाणी दृष्टीसही पडत नाही तिथल्या लोकांची अवस्था काय होत असेल?

भारतातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे राज्य असणाऱ्या महाराष्ट्रातही पाणी टंचाईची समस्या अत्यंत भीषण आहे. सरकारी आकडेवाडीनुसार महाराष्ट्रातील जवळपास  १९०००  हून अधिक गावे पाणीटंचाईच्या समस्येला तोंड देत आहेत. एकंदरीतच पाणीटंचाईच्या समस्येवर उपाययोजना करताना केंद्र आणि राज्य सरकारने काहीतरी ठोस पावले उचलायची नितांत गरज आहे. 

आता या गोष्टीवर कदाचित कोणाचा विश्वास बसणार नाही. पण महाराष्ट्रातील मुंबईपासून १५० किमी अंतरावर असणाऱ्या ‘डेंगनमल’ नावाच्या छोट्याशा आणि दुष्काळी गावात निव्वळ पाण्याच्या समस्येमुळे बहुपत्नीत्वाची प्रथा निर्माण झाली आहे. या व्यवस्थेला गावात ‘पाणीपत्नी’ अथवा ‘जलपत्नी’ असे संबोधले जाते. आणि गंमत म्हणजे गावात अशी लग्न करण्यास परवानगी देण्यात येते. इथल्या पंचाना देखील ही गोष्ट मान्य आहे.

‘जलपत्नी’ ही बहुतांश वेळा एकतर विधवा किंवा अत्यंत गरीब कुटुंबातील स्त्री असते जिच्या लग्नासाठी व हुंड्यासाठी खर्च करणं कुटुंबाला परवडत नाही. जलपत्नी बनून का होईन या  स्त्रियांना वैवाहिक दर्जा मिळतो आणि समाजात सन्मान प्राप्त होतो. त्यामुळे त्या ही जलपत्नी बनायला आनंदाने तयार होतात. धक्कादायक वाटत असली तरी ही गोष्ट खरी आहे. 

====

हे देखील वाचा: ‘पाणीवली बाई’ म्हणून सर्वांना परिचित असलेल्या ‘या’ महिलेने थेट इंदिरा गांधींशी पंगा घेतला होता

====

काही संघटना या प्रथेविरद्ध आंदोलन वगैरे उभारू शकतात. परंतु, आजतागायत असं झालं नाही या मागील कारण म्हणजे या संपूर्ण गावात पाण्याचे केवळ दोनच स्रोत उपलब्ध आहेत. गावापासून ६ किमी अंतरावर असणाऱ्या केवळ दोन विहिरी या संपूर्ण गावाच्या पाण्याचा स्रोत आहेत.  

आपल्या समाजात विशेषतः खेडेगावांमध्ये घरात पाणी भरण्याचं काम कुटुंबातील स्त्री करत असते. या गावात विहिरीतून पाणी काढून ते घरी आणण्याकरिता सहा किलोमीटर दूर जावे लागते. म्हणजे जवळपास अर्धा दिवस. जर स्त्रीचा अर्धा दिवस काही कळश्या पाणी आणण्यातच जात असेल, तर ती घरातील बाकीची कामे कधी करणार? शिवाय तिचं गरोदरपण, आजारपण इ. प्रसंगांमध्ये पाणी कोण आणणार? 

थोडक्यात एकटी स्त्री एवढे काम करू शकत नसल्याने गावातील लोकांनी दोन लग्न करायला सुरवात केली. आणि घरात गृहलक्ष्मी सोबत जलपत्नी नांदू लागली. 

====

हे देखील वाचा: Vishaka Guidelines: नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला ‘विशाखा मार्गदर्शक तत्वे’ माहिती असायलाच हवी

====

दुसरी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जलपत्नी या केवळ कुटुंबामध्ये पाणी आणायचे काम करतात. त्यांना पत्नीचे कोणतेही अधिकार दिले जात नाहीत. त्यांना  स्वतःच्या पतीसोबत शारीरक संबंध ठेवता येत नाहीत की कुटुंबामध्ये सुनेचे अधिकारही मिळत नाहीत. 

ही गोष्ट समाज म्हणून कदाचित आपल्याला खटकत असेल. अर्थात आपल्या हातात काही नाही हे जरी कितीही खरं असले तरीही आपण किमान पाण्याचा वापर करताना काळजी तर घेऊ शकतो ना?

मानसी जोशी 


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.