हिमाचल प्रदेश ही देवभूमी म्हणून ओळखळी जाते. या हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पौराणिक वारसा असलेली मंदिरे आहेत. तसेच या मंदिरांबाबत अनेक गुढ कथाही सांगितल्या जातात. असेच एक मंदिर हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्यात आहे. हे मंदिर जिथे आहे, त्या गावात कोणीही मासे खात नाही. या गावामध्ये मोठे तलाव आहे. त्या तलावातील माशांची देव म्हणून पूजा केली जाते. कांगडा जिल्ह्यातील या गावात वर्षानुवर्षे ही अनोखी परंपरा पाळली जाते. विशेष म्हणजे, याच गावात मच्छिंद्रनाथांनी तप केल्याचे सांगितले जाते. या गावात पुरातन असे मच्छिंद्रनाथ महादेवाचे मंदिरही आहे. याच मंदिराच्या समोर असलेल्या तलावातील माशांना भाविक पीठ खायला घालतात. यामुळे भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात, असे मानले जाते. हिमाचल प्रदेशमधील अत्यंत सुंदर अशा मुमता गावात हे मच्छिंद्रनाथ महादेवाचे मंदिर आहे. या गावामध्ये या मंदिराबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. या मंदिरात अवघ्या देशातून भाविक येतात. या मंदिराचे आणखी एक विशेष म्हणजे, येथे येणा-या प्रत्येक भाविकाची इच्छा पूर्ण होतेच. त्यानंतर हे भाविक तलावातील माशांना सोन्याचा दोरा अर्पण करतात. गेली अनेक वर्ष हे सोन्याचे दोरे माशांना देण्यात येतात. त्यामुळे या तलावातील पाणीही सोन्यासारखे चमकतांना दिसते. (Machindranath Mahadev Temple)

हिमाचल प्रदेशमधील कांगडा जिल्ह्याला स्थानिक कांग्रा या नावानेही ओळखले जाते. हा कांगडा जिल्हा मच्छिंद्रनाथांची तपोभूमी असल्याचे सांगितले जाते. मच्छिंद्रनाथांनी येथेच मोठे तप केले होते. या कांगडामध्ये मच्छिंद्रनाथ महादेवाचे प्राचीन आणि भव्य असे मंदिर आहे. हे मंदिर नागरोटा बागवानपासून सुमारे 2 किमी अंतरावर असलेल्या मुमता नावाच्या गावात आहे. स्थानिक या मंदिराला माछियाळ देवतेचे मंदिर म्हणून ओळखतात. त्यामागे या मंदिरात होत असलेली माशाची पूजा कारणीभूत आहे. स्थानिकांसाठी हे मंदिर श्रद्धेचे मोठे स्थान आहे. याशिवाय कांगडामध्ये येणारे पर्यटकही या मंदिराला आवर्जून भेट देतात. त्यामागे मंदिराचे स्थापत्यशास्त्र आणि मंदिराभोवती असलेल्या गुढ कथा आहेत. प्राचीन असलेल्या या मच्छिंद्रनाथ महादेव मंदिराची स्थापना कोणी केली याबाबत अनेक कथा स्थानिकांमध्ये आहे. कोणी हे मंदिर प्रत्यक्ष विष्णू भगवानानं स्थापन केल्याचे सांगतात. तर देवाची पूजा करण्यासाठी स्वतः भगवान विष्णू माशाच्या रुपात मंदिरासमोरील तलावात रहात असल्याचे सांगितले जाते. यामुळेच या मंदिरात येणारे भाविक येथील माशांचीही पूजा करतात. (Marathi News)
बाबा मच्छिंद्रनाथांनी या ठिकाणी तपश्चर्या केली होती, त्यामुळे ही भूमी पावन झालेली आहे. याच काळात भगवान विष्णूच्या मत्स्य अवताराची पूजा बाबा मच्छिंद्रनाथ म्हणून मच्छिंद्रनाथांनी केल्याचे सांगितले जाते. स्थानिक ही भूमी भगवान शंकर आणि भगवान विष्णू या दोघांच्या आशीर्वादानं पावन झालेली भूमी असल्याचे सांगतात. या मंदिराच्या जवळच जोगळ खड येथे नैसर्गिक माछियाल नावाचे तलाव आहे. या तलावाच्या एका बाजूला माँ संतोषीचे मंदिर आणि दुसऱ्या बाजूला मच्छिंद्र महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. या तलावातील माशांना मंगळवार आणि शनिवारी भाविक पीठ खायला देतात. ज्या भाविकांच्या इच्छा पूर्ण होतात, असे भाविक या माशांना सोन्याचा दोरा अर्पण करतात. त्यामुळे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीचाही आशीर्वाद मिळत असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. (Machindranath Mahadev Temple)
==============
हे देखील वाचा : War : पोस्ट शेअर करत रितेश आणि जिनेलिया यांनी केले भारतीय सैन्याचे कौतुक
INS Vikrant : म्हणून INS विक्रांत समोर पाकिस्तानची तंतरते !
==============
गेली हजारो वर्ष ही प्रथा या भागात पाळली जाते. या तलावाचा रंग सोनेरी दिसतो, मात्र येथील माशांना वाहण्यात येणारे सोन्याचे दोर काढण्यात येत नाहीत. तसेच येथील माशांनाही कोणीही पकडत नाहीत. असे केल्यास देवाची अवकृपा होत असल्याचे मानण्यात येते. मच्छिंद्र महादेवाचे दर्शन घेण्यासाठी भाविक ढोल वाजवून दर्शनास येतात. या महादेव मंदिराभोवती मोठी वनसंपदा आहे. मंदिराच्या जवळ माता शेरावलीचे मंदिर आणि भगवान श्री रामचंद्र आणि वीर हनुमान यांच्या मूर्ती देखील स्थापित आहेत. या मंदिरासोबतच 12 फूट उंचीची भगवान शंकराची मुर्तीही पूजण्यासाठी अनेक भाविक या गावात येतात. या सर्व भागाला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. त्यामुळे येथे येणा-या पर्यटकांची संख्याही अधिक आहे. (Marathi News)
सई बने
