Home » America : आगीची वाढती दाहकता !

America : आगीची वाढती दाहकता !

by Team Gajawaja
0 comment
America
Share

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील आग विझवण्यासाठी सरकारची हतबलता आता समोर येऊ लागली आहे. सूपर पॉवर अमेरिकेला या नव्या वर्षात आगीनं जमिनीवर आणले आहे. लॉस एंजेलिसमधील या आगीला इतिहासातील सर्वात विनाशकारी आग असे म्हटले जात आहे. कारण 18 लाख नागरिकांना हा सर्व परिसर सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या भागातील हवामान अधिक बिघडत चालले असून त्यामुळे आग अधिक प्रज्वलीत होणार आहे. जोरदार वाऱ्यामुळे आग पसरण्याचा धोका वाढला आहे. त्याउलट अमेरिकेचे प्रशासन हतबल ठरत असून त्यांनी चक्क कॅनडा आणि मैक्सिको या देशांकडून मदत मागितली आहे. ही भीषण आग विझवण्यासाठी 9 राज्यांमधील 1500 अग्निशमन इंजिन, 84 विमाने आणि 14 हजाराहून अधिक कर्मचारी 24 तास काम करत आहेत. (America)

आता त्यात मैक्सिकोमधील अग्निशामक कर्मचा-यांचीही भर पडली आहे. शिवाय कॅलिफोर्नियातील जेलमधील कैदीही या आगीला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. मात्र या सर्व प्रयत्नांना अद्याप यश मिळाले नसून आग पुढच्या काही दिवसात अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. लॉस एंजलिसमधील आगीमुळे अमेरिकेला कॅनडा आणि मैक्सिकोसारख्या देशांकडे मदत मागावी लागली आहे. जोरदार वा-यांमुळे ही आग आता संपूर्ण लॉस एंजिलिसला वेढा घालून परिस्थिती अधिक दाहक झाली आहे. अमेरिकेतील सर्व यंत्रणा आग विझवण्यात कमी पडली आहे. आगीमुळे अनेक सामाजिक परिणाम येथील जनमानसावर होत आहेत. मुख्य म्हणजे, लॉंस एंजेलिस हा प्रदूषणमुक्त भाग होता. मात्र कॅलिफोर्नियाच्या जंगलात आग लागल्यापासून या भागात मोठ्या प्रमाणात धूर पसरला आहे. (International News)

येथील हवेचा दर्जा खालावला आहे. त्याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होणार आहे. त्यातही या भागातील नागरिक हे श्रीमंत म्हणून ओळखले जात होते. आता त्यापैकी अनेक नागरिकांना आपली घरे सोडावी लागत आहेत. हे नागरिक तात्पुरते सरकारी निवासस्थानांमध्ये रहात आहेत, मात्र आपल्या भविष्याचा प्रश्न त्यांना पडला आहे. अशा नागरिकांमध्ये मानसिक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या तात्पुरत्या निवारा घरांमध्ये त्यांना ठेवण्यात आले आहे, तेथील अधिका-यांना ते सतत आपल्या घरांबाबत प्रश्न विचारत आहेत. या नागरिकांना आता औषधोपचार देण्यात येत आहेत. बदलत्या हवामानापुढे अमेरिकेचे प्रशासन अपयशी ठरले आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते असा इशारा दिल्यानं या भागात रहात असलेल्या नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले आहे. (America)

जिथे आग पोहचली नाही, त्या भागात अतिरिक्त पाण्याचे टँकर आणि मोठ्या संख्येने अग्निशमन दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्या आहेत. त्यांच्या आवाजानंही आपल्याला भीती वाटत असल्याचे येथील नागरिक सांगत आहेत. या आगीत अद्याप 26 नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती पुढे आली असली तरी, अनेकजण बेपत्ताही आहेत. या बेपत्ता असलेल्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी अनेक नागरिक आग लागलेल्या भागात जाण्याचा आग्रह करत आहेत. मात्र या भागात तुटलेल्या गॅस लाईन्स, विद्युत पुरवठा करणा-या लाईन्स, शिवाय आगीनं कमकुवत झालेल्या इमारतींचा अधिक धोका निर्माण झाला आहे. यातूनही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या सर्वांपासून नागरिकांना दूर ठेवण्याचे आव्हानही येथील प्रशासनासमोर आहे. कॅलिफोर्नियामध्ये ईटन, हर्स्ट आणि पॅलिसेड्स येथील सुमारे 38,549 एकर जमिनीवर आगीचे राज्य आहे. पॅरिसपेक्षाही हे क्षेत्र मोठे असल्याची माहिती आहे. (International News)

=====================

हे देखील वाचा : Kinkrant संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या क्रिक्रांतबद्दलची माहिती

Israel : आता अखंड इस्रायल !

=====================

या भागातील एकही घर आणि इमारत आगीपासून वाचलेली नाही. तसेच अन्य बांधकामांचाही यात समावेश आहे. त्यामुळे आगीनं नुकसान झालेल्या आणि जळलेल्या या इमारतींचा ढिगारा साफ करण्यासाठीच फक्त सहा महिन्याचा कालावधी लागणार आहे. नंतर या भागावर बांधकाम करता येणार आहे. तोपर्यंत येथे रहात असलेल्या नागरिकांना कुठे सहारा द्यायचा हा प्रश्न प्रशासनासमोर आहे. अमेरिकेच्या इतिहासातील आर्थिक नुकसानीच्या बाबतीतही ही आग सर्वात महागडी ठरली आहे. आत्तापर्यंत किमान 150 अब्ज डॉलर्स म्हणजेच सुमारे 13 लाख कोटी रुपये नुकसान झाल्याचा अंदाज आहे. आग अद्यापही विझवण्यात यश आलेले नाही, तर ती अधिकच वाढली आहे. त्यामुळे या नुकसानीच्या आकड्यात आणि मृतांच्या आकड्यातही आणखी भर पडण्याची शक्यता आहे. (America)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.