आज सगळीकडे मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने संक्रांतीचा सण साजरा होत आहे. १४ जानेवारीला दरवर्षी संक्रांतीचा सण संपूर्ण देशात साजरा होतो. (काही अपवादात्मक वर्षांमध्ये १३ किंवा १५ जानेवारीला संक्रांत येते.) जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जातो. (Makarsankranti)
संक्रांतीचा सण हा सगळीकडे तीन दिवस साजरा होतो. संक्रांतीच्या पहिल्या दिवशी भोगी साजरी केली जाते. यादिवशी भोगीची भाजी, खिचडी, वांग्याचे भरीत, भाकरी असे जेवण करून देवाला नैवैद्य दाखवतात. तर संक्रांतीच्या दिवशी गुळपोळी बनवली जाते. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रांत साजरी केली जाते. किंक्रांतला अनेक ठिकाणी कर असे देखील म्हटले जाते. (Kinkrant)
किंक्रांत हा दिवस अशुभ समजला जातो. पौष शुक्ल षष्ठीचा दिवस हा किक्रांत म्हणजेच करदिन मानला जातो. यादिवशी चांगले काम किंवा शुभ कार्य केले जात नाही, अशी मान्यता आहे. ज्याप्रमाणे मकर संक्रांतीच्या दिवशी देवी संक्रांतीने शंकासूराचा वध केला होता, त्याचप्रमाणे देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकर नावाच्या दैत्याला मारले होते; त्यामुळे हा दिवस किंक्रांत म्हणून पाळला जाऊ लागला. या दिवशी कोणतेही शुभ कार्य असल्याचे म्हटले जाते. (Top Marathi News)
या दिवशी भोगीला केलेली शिळी भाकरी खाल्ली जाते. अनेक ठिकाणी बेसनाचे तिखट धिरडे आणि कणिकेचे गोड धिरडे बनवण्याची परंपरा किंक्रांत या सणाच्या दिवशी आहे. याला कर उलटवणे असे देखील म्हटले जाते. या दिवशी स्त्रिया हळदी कुंकू करतात. संक्रातीपासून ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू करतात.
किंक्रांतीच्या दिवशी दक्षिण भारतात ‘मट्टू पोंगल’ म्हणून साजरा करतात. या दिवशी शेतकरी त्यांना शेतात मदत करणाऱ्या सर्व जनावरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. या दिवशी गाई – बैलांना सकाळी अंघोळ घालून त्यांच्या गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. त्यांच्या शिंगाना बेगड लावून त्यांना सजवले जाते. गुरांना दुपारी गोडधोड जेवण घालून दिवसभर त्यांना मोकळं सोडले जाते.
===============
हे देखील वाचा : America : कुठे आग, कुठे बर्फाचे वादळ अमेरिके त्राहिमाम
America Fire : अमेरिकेच्या जंगलांना भीषण आग ! लावली की लागली ?
===============
किंक्रांतीच्या दिवशी जनावरांना मोकळेपणाने फिरण्याची पूर्ण मुभा दिली जाते आणि त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे काम करवून घेतले जात नाही. संध्याकाळी त्यांची गावातून मिरवणूक काढतात. त्यानंतर नृत्यगायनाचा कार्यक्रमही केला जातो. जसा आपल्याकडे पोळा सण साजरा होतो, तशाच स्वरूपाचा दक्षिण भारतात किंक्रांतीचा दिवस साजरा केला जातो.
महाराष्ट्रात क्रिक्रांतीच्या दिवशी घरातून सकाळी केर काढण्याआधी महिलांनी वेणीफणी करावी. कारण मोकळ्या केसांनी किंक्रांतीला कामं करणे वर्ज्य मानले जाते. या दिवशी घरात कटकट करु नये. शिवाय दूरचा प्रवास टाळावा. देवाला या दिवशी गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. सोबतच क्रिक्रांतीला कुलदैवता आणि देवाची पूजा करुन नामस्मरण करावे. तर अनेक ठिकाणी आजच्या दिवशी घरासमोर शेणाचे गोळे करुन त्यांची पूजा केली जाते.