लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ! पानिपत युद्धाच्या या एकाच विदारक वर्णनाने अक्षरशः अनेकांच्या डोळ्यात पाणी येतं. १४ जानेवारी १७६१ साली पानिपतच्या रणभूमीने मराठ्यांचा रणसंग्राम पाहिला होता. असा रणसंग्राम की पुन्हा कोणत्याही परकीय आक्रमकाने भारतभूमीवर नजर वर करून बघण्याचीही हिंमत केली नाही. लाखो ज्ञात-अज्ञात मराठे धारातीर्थी पडले. पानिपतच्या युद्धानंतर एक पत्र थोरले नानासाहेब पेशवे यांच्याकडे गेलं होतं. सुरुवातीला सांगितल्या या त्याच पत्रातल्या ओळी… यामध्ये २७ मोहरा हरवल्या, असंही नमूद होतं. या २७ मोहरा म्हणजे २७ मराठे वीर जे पानिपतात पडले. या २७ पैकीच एक हिरा म्हणजे पेशवे बाजीरावपुत्र समशेर बहादूर ! पानिपत युद्धानंतर अनेक मराठ्यांची कत्तल केली गेली. अनेकांना कैदी बनवून अफगाणला नेण्यात आलं. जखमींना काही लोकांनी आश्रय दिला तर काही लोकं पानिपतच्या आसपासच स्थायिक झाले. बाजीरावांचे रक्त असलेल्या समशेर बहादूर यांनी रणांगण गाजवलं, या युद्धात ते जखमी झाले पण नंतर पुढे काय झालं याबाबत अनेकांना माहीत नाही. आज आपण याच बाजीरावपुत्र समशेर बहादूर यांच्या समाधीचा शोध कसा लागला याची माहिती जाणून घेणार आहोत. (PanipatShouryaDivas)
समशेर बहादूर यांची समाधी आज जर पाहायला गेलात तर कबर उजेडात आणण्याचं काम इतिहास संशोधक प्रवीण भोसले केलं होतं. पानिपत युद्धाच्या वेळी समशेर बहादूर प्रचंड जखमी होते. यानंतर त्यांना भरतपूर येते आणण्यात आलं आणि इथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मुळात अजूनपर्यंत त्यांची समाधी इतिहासापासून अज्ञातच होती. यानंतर प्रवीण भोसले यांनी ‘मराठ्यांची धारातीर्थे‘ हे पुस्तक लिहिलं आणि अनेक मराठा वीरांचे समाधीस्थळ छायाचित्रांसोबत प्रकाशात आले. पानिपतवीरांच्या समाधीस्थळांचा शोध घेत असताना २००६ साली ते भरतपूरला गेले होते. समशेर बहादूर यांची समाधी याच ठिकाणी असल्याची फक्त माहिती त्यांना मिळाली होती. (History)
पानिपत युद्धावेळी समशेर बहादूर आपल्या ३००० घोडेस्वार सैनिकांसह हुजुरातीच्या फौजेत सदाशिवराव भाऊ यांच्यासोबत होते. दुपारपर्यंत विजयी होत असणारे मराठा मावळे थोरल्या नानासाहेबांचे पुत्र विश्वासराव युद्धात पडल्यानंतर मागे सरायला लागले. त्यात सदाशिवराव भाऊ कुठेही दिसत नसल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास ढासळला. समशेर बहादूर मात्र अफगाण मारत सुटले होते. मात्र याचदरम्यान ते प्रचंड जखमी झाले आणि पराभवानंतरच्या पळापळीत त्यांना सुरजमल जाट यांच्या आश्रयास आणलं गेलं. सुरजमल यांनी समशेर बहादूर यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्य बोलावले. तसेच इतर मराठ्यांना घोंगड्या आणि प्रत्येक दोन रुपये दिले होते. जखमा जास्त असल्यामुळे समशेर बहादूर यांना वाचवण्यात यश आलं नाही आणि ते भरतपूर येथेच मरण पावले. जो वैद्य समशेर यांना वाचवेल त्याला समशेरांच्या वजनाइतके सोने बक्षीस द्यायचे सूरजमल यांनी जाहीर केलं होतं. कारण समशेर बहादूर हे प्रत्यक्ष थोरल्या बाजीराव पेशव्यांचे पुत्र होते. पण त्यांना वाचवता आलं नाही. (PanipatShouryaDivas)
त्यांचा अंत्यसंस्कार मुस्लिम पध्दतीप्रमाणे करण्याची व्यवस्था सूरजमल यांनी केली होती. मात्र त्यांची समाधी किंवा कबर कुठे आहे, हे अजूनही अनेकांना माहीत नव्हतं. आता जर मुस्लिम पद्धतीने त्यांचे अंत्यसंस्कार झालेच असतील, तर नक्कीच त्यांची कबर असू शकते. त्यामुळे इतिहास संशोधक प्रवीण भोसले यांनी भरतपूरमधील मशीदींच्या मौलानांकडे मदत घेतली. यावेळी इथल्या जामा मशीदच्या मुख्य मौलानाला भेटल्यावर ते भोसले यांना म्हणाले की, “आप हिंदू होते हूए भी एक मुसलमान की कबर क्यूं तलाश कर रहे है?” त्यानंतर भोसले यांनी मौलाना यांना समशेर बहादूर कोण होते आणि त्याच्या मृत्यूची सगळी माहिती सांगितली. यावर ते म्हणाले की, “भरतपूरमे मथुरा गेटके पास एक छोटी और पुरानी मस्जीद है जिसका नाम समशेर बहादूर मस्जीद है। लेकिन आप जिस मराठा सरदार समशेर बहादूर की बात कर रहे हो उसका कोई ताल्लुक उस मस्जीदसे मेरी जानकारीमे तो नही है।” (PanipatShouryaDivas)
भोसले यांना कळलं की ही नक्कीच समशेर बहादूर यांची कबर असू शकते. ते जामा मशीदमधून निघाले आणि थेट मथुरा गेटजवळ पोहोचले. तिथे माहिती काढल्यावर ते एका छोट्या मशिदीजवळ आले. त्या मशिदीच्या बोर्डावर लिहिलं होतं .’समशेर बहादूर मस्जीद. तामीर १७६१’… त्या १७६१ या आकड्यावरूनच भोसले यांना कळलं की हीच जागा शोधण्यासाठी मी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि ती शेवटी मिळाली. त्यांनी बाहेरच्या फुलवाल्याकडून हार घेतला आणि जाऊन कबरीचं दर्शन घेतलं. याच ठिकाणी रणमार्तंड थोरले बाजीराव यांचा पराक्रमी पुत्र चीरविश्रांती घेत होता. भोसले सांगतात की, समशेर बहादूर यांचा देह या कबरीखाली आहे या वास्तवाने मी थरारुन गेलो होतो. कबरीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी तिथल्या मुजावरांची म्हणजे कबरीची देखभाल करणाऱ्यांची भेट घेतली आणि आधी त्यांनी सहज विचारलं की ही कबर कोणाची आहे? (History)
यावर मुजावरांनी त्यांना सांगितलं की, ‘समशेर बहादूर हे भरतपूरमधील एक दैवी शक्ती प्राप्त झालेले अवलिया होते. त्यांनी अनेकांच्या अडचणी चमत्काराने सोडवल्या होत्या. १७६१ साली त्यांनी याठिकाणी देह ठेवला. आजही त्यांना कुणी नवस केला तर ते भक्तांना पावतात’, यावर भोसले काहीच बोलले नाहीत पण खरा समशेर बहादूर कोण हे सांगायला त्यांनी सुरुवात केली. ते म्हणाले की, हे समशेर बहादूर कुणी अवलिया नसून पेशवे बाजीरावांचे पुत्र आहेत… एवढ्यातच मुजावरांनी त्यांना थांबवलं आणि इतर मुस्लीम लोकांना बोलावून घेतलं. यानंतर मुजावर म्हणाले ” अब आपके पास जो जानकारी है, वो हम सबको एकसाथ पूरी बताईये। समशेर बहादूर बाजीरावके बेटे थे ये आज हम पहली बार सुन रहे है। ये क्या हकीकत है? आधी भोसले यांनी विचारलं की, तुम्हाला १७६१ ही तारीख कुठून कळली, जी बोर्डावर होती. यावर ते म्हणाले की मशिदीची डागडुजी करताना एका शिलालेख सापडला होता, त्यावर ही तारीख होती. यानंतर पानिपतच्या लढाईची सगळी हकीकत त्यांनी सांगितली. (History)
पानिपतची लढाई १४ जानेवारी १७६१ ला झाली होती. जखमी झालेले समशेर बहादूर भरतपूरमधे आले व काही दिवसातच इथेच त्यांचं निधन झालं. सूरजमल जाटांनी त्यांच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था इस्लामच्या रिवाजाप्रमाणे केली होती. हे कबर बांधण्याइतके महत्वाचे सरदार नक्कीच होते कारण ते पेशवे बाजीरावांचे पुत्र होते. त्यामुळे तुम्ही ज्यांना अवलिया मानता ते अवलिया नसून मराठ्यांचे मोठे सरदार समशेर बहादूर आहेत. आणि शिलालेखाचा पुरावा हेच सांगतोय की ही त्याच समशेर बहादूरांची कबर आहे. ‘तामीर १७६१ समशेर बहादूर मशीद’ म्हणजे १७६१ मधे बांधलेली आणि उर्दूमध्ये तामीरचा अर्थ बांधलेली असा होतो. प्रवीण भोसले यांनी सांगितलेली सविस्तर माहिती त्यांना पटली आणि समशेर बहादूर यांची माहिती त्यांनी कागदावर लिहून दिली, जेणेकरून इथे येणाऱ्यांना हे सर्व आवर्जून सांगितलं जावं. (PanipatShouryaDivas)
यानंतर भोसले यांनी मुजावरांना विचारलं की, ‘आजपर्यंत ही समशेर बहादूरांची कबर आहे म्हणून त्यांचे वंशज किंवा इतर कुणी इथे आले होते का ?” यावर मुजावर म्हणाले, “नाही. कारण ही माहिती आम्हाला तुमच्याकडूनच प्रथम मिळाली. आणि तुम्ही म्हणता तसे कुणीही आजवर इथे आलेलं नाही. मुळात समशेर बहादूर यांची आठवी पिढी अजूनही असून सध्या शादाब अली बहादूर हे बांद्याचे नवाब आहेत. शेवटी पानिपतच्या युद्धात मैदान गाजवणाऱ्या मराठा योद्धाची समाधी किंवा कबर सापडली. प्रवीण भोसले यांच्या २००६ सालच्या भेटीपर्यंत कुणालाही ही कबर समशेर बहादूर यांची आहे, याची माहितीसुद्धा नव्हती. त्यामुळे त्यांनी आपल्या ‘मराठ्यांची धारातीर्थे’ या पुस्तकात कबरीच्या फोटोसोबत संपूर्ण माहिती सर्वप्रथम प्रकाशित केली. मराठा साम्राज्याच्या एका मोठ्या सरदाराची माहिती उजेडात आली आणि याचं संपूर्ण श्रेय प्रवीण भोसले यांनाच जातं. (History)
=====================
हे देखील वाचा : Kinkrant संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असणाऱ्या क्रिक्रांतबद्दलची माहिती
=====================
आता थोडं समशेर बहादूर यांच्याबद्दल जाणून घेऊया. समशेर यांचा जन्म मस्तानी यांच्या पोटी पुण्यात झाला. बाजीराव आणि मस्तानी यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा सांभाळ नानासाहेबांनी केला. वयात आल्यावर आणि शस्त्र व शास्त्र यात निपुण झाल्यावर त्यांना पेशवे कुटुंबात सरदारकी मिळाली. बांदा हे त्यांच्या जहागीरीतलं मुख्य गाव होत, जिथे आजही त्यांचे वंशज राहतात. १७५१ साली हैद्राबादच्या निजामाविरुद्धच्या लढाईत ते लढले. यानंतर १७५३ सालच्या रघुनाथरावांच्या पहिल्या उत्तर भारतातील मोहिमेत ते सामील होते. १७५६ साली रूपनगरच्या किल्ल्याच्या वेढ्यात समशेरबहादूर सामील होते. तिथल्या बहादुरसिंगाला शरण आणून कोटा मराठ्यांनी काबीज केलं. १७५६ च्या दिल्ली मोहिमेत समशेर बहादूरांनी मराठा फौजेसह लढून जाटांनी बळकावलेला ग्वाल्हेर किल्ला जिंकण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली. अशा अनेक मोहिमांमध्ये त्यांनी पराक्रम गाजवला होता. समशेर बहादूर हे दोन्ही धर्म मानत होते. त्यांच्या पत्रावर ते स्वहस्ते ‘पांडुरंगा’ असं लिहित होते. तसेच “श्री बल्लाळ चरणी तत्पर, समशेर बाहादर निरंतर” ही त्यांची मुद्रा होती. त्यांचा विवाह लक्षधीर दलपतराय यांची कन्या राजकुवर उर्फ मेहेरबाई यांच्याशी झाला होता. यांनतर त्यांना एक पुत्र झाला ज्याचं नाव कृष्ण सिंग उर्फ अली बहादूर होतं. १७६१ साली मरण पावलेल्या पडलेल्या वीराची समाधी २००६ साली प्रकाशात आली. विचार करा, अशा कितीतरी वीरांच्या समाधी अजूनही इतिहासात आणि मातीत दडून बसल्या असतील. (PanipatShouryaDivas)
पानिपतच्या युद्धात धारातीर्थी पडलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात वीरांना नमन !