हिवाळा ऋतू सुरु झाला असून आता सगळीकडेच थंडी जाणवायला लागली आहे. संपूर्ण वर्षभरातील अतिशय चांगले महिने म्हणून हिवाळ्याचे चार महिने ओळखले जातात. हळूहळू सगळीकडेच थंडीचा तडाखा जाणवायला लागला आहे. थंडीचे दिवस हे शरीरासाठी आणि आरोग्यासाठी उत्तम समजले जातात. कारण या काळात खाल्लेल्या सर्व गोष्टी अंगी लागतात. त्यामुळेच हिवाळ्यात पौष्टिक आणि आरोग्यासाठी आवश्यक गोष्टी खाण्याकडे कल असतो.
लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या काळात पौष्टिक पदार्थ खाणे गरजेचे असते. या चार महिन्यात आपण जी ऊर्जा कमावतो ती वर्षभर टिकते असे सांगितले जाते. सोबतच या काळात खाल्लेल्या पदार्थाचे लाभ पुढील वर्षभरासाठी उपयोगी पडतात. हिवाळ्यात सर्रास प्रत्येक घरात केला जाणारा पदार्थ आणि खाल्ला जाणारा पदार्थ म्हणजे डिंकाचे लाडू. थंडीत डिंकाचे लाडू खाणे म्हणजे ‘शास्त्रच असते’. हे लाडू थंडीची चाहूल लागली की लगेच केले जातात. मुख्य म्हणजे संपूर्ण ऋतूमध्ये हे लाडू कुटुंबातील प्रत्येक जणं अगदी न चुकता खातो.
प्रत्येक घरानुसार, प्रत्येकाच्या पद्धतीनुसार हे डिंकाचे लाडू केले जातात. काही जणं या लाडूमध्ये मेथी टाकतात, काही मेथीशिवाय करतात, काही डिंकासोबत सुकामेवा टाकतात. मात्र डिंक हा सर्वच लाडवांमध्ये घालणे गरजेचे असते. पण हिवाळ्यात हे डिंकाचेच लाडू का खाल्ले जातात? या फायदे आहेत हे लाडू खाण्याचे चला जाणून घेऊया.
– डिंकामुळे शरीराला उब देखील मिळते. आणि हिवाळयात शरीराला उबची खूप गरज असते. तसेच ऊर्जा देखील मिळते.
– डिंक, गव्हाचं पीठ, तुप,खोबरं, गुळ आणि भरपुर सुका मेवा वापरून हे लाडू बनवले जातात. थंडीच्या दिवसांमध्ये शरीरात ऊर्जा आणि उष्णता निर्माण करण्याचं काम डिंक करतं. हे लाडू स्त्रीच्या गरोदरपणातही खायला दिले जातात. बाळ-बाळंतिणीसाठी डिंकाचे लाडू अतिशय उपयोगी असतात. यामुळे शरीराला मजबुती येते. बाळंतिणीला दूध येण्यासाठी हे लाडू दिले जातात.
– डिंकाचे लाडू हाडे मजबूत होण्यासाठी फायदेशीर ठरतात आणि हे लाडू खाल्ल्याने हाडे ठिसूळ होत नाहीत. कोमट दुधासोबत लाडू खाल्ल्याने हाडे आणि स्नायूंवर चांगला परिणाम होतो. याशिवाय डिंक लाडू मणक्यांसाठी देखील प्रभावी मानले जाते.
– डिंकात भरपुर पौष्टिक मूल्य असतात आणि ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात. डिंकाचे लाडू आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढते.
– डिंकात जास्त फॅट्स आणि कॅलरिज् असतात. त्यामुळे अशक्तपणा कमी होतो. डिंक लाडू शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करतात आणि हे लाडू खाल्ल्याने शरीराचा अशक्तपणा कायमचा जातो. म्हणून ज्या स्त्रियांना अशक्तपणाचा त्रास असेल अश्यांनी दररोज डिंक लाडू खावे.
– हिवाळ्याच्या हंगामात आपण डिंक लाडू खाल्ल्यास सांधेदुखी दुर होते. तसेच सांध्यातील स्नायू मजबूत होतात.
– डिंकचे लाडू बद्धकोष्ठता असलेल्या रूग्णांसाठी फायदेशीर ठरते आणि हे लाडू खाल्ल्याने बद्धकोष्ठता दूर होण्यास मदत होते. मात्र एक लक्षात ठेवा दोनपेक्षा जास्त लाडू सेवन केल्याने पोट खराब होऊ शकते. कारण जास्त खाल्ल्याने पचन करणे कठीण होते.
(टीप : ही माहिती केवळ वाचनासाठी आहे. कोणतेही उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.)