“इक ओंकार सतनाम, करक परखु निरभऊ| निरबैर, अकाल मूरति, अजूनी सैभं गुर प्रसादि” शीख गुरु नानकजी यांनी समाजाला दिलेला हा सगळ्यात महत्त्वाचा संदेश आहे. याचा अर्थ असा आहे की, ईश्वर हा एकच आहे आणि त्याचे वास्तव्य संपूर्ण चराचरात आहे. हाच ईश्वर आपले सर्वस्व आहे. त्यामुळे आपण प्रत्येकांशी प्रेमपूर्वक वागले पाहिजे.
भारताला सर्व धर्मियांचा देश समजला जातो. आपल्या देश सर्वच धर्मांचे लोकं गुण्या गोविंदाने राहतात. यातलाच एक महत्वाचा धर्म म्हणजे ‘शीख’ धर्म. आज याच शीख लोकांचा महत्वाचा सण गुरुनानक जयंती साजरी केली जात आहे. कार्तिक महिन्यातील पौर्णिमा तिथीला गुरुनानक जयंती साजरी केली जाते. यावर्षी हा सण १५ नोव्हेंबरला शुक्रवारी साजरा केला जात आहे. यंदा गुरू नानक यांची ५५५ वी जयंती साजरी केली जात आहे.
गुरू नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरू आहेत. नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानमधील लाहौर जवळ तळवंडी येथे १५ एप्रिल १४६९ रोजी एका हिंदू कुटुंबात झाला. या गावाला आता ननकाना साहिब असे म्हटले जाते. देशभर गुरू नानक यांचा जन्म दिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. शीख धर्मासाठी गुरु नानक जयंती हा मोठा सण आहे. गुरु नानक जयंती हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गुरु नानक देव यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र दिवे लावले जातात.
मानवतावादावर दृढ श्रद्धा असलेले, जात-धर्म यापलीकडे जाऊन एकतेची शिकवण आणि ‘कलि महि राम नाम सारु’चा उपदेश गुरू नानकदेव यांनी संपूर्ण जगाला दिला. आजचा दिवस शिख समुदायाकडून गुरू पर्व किंवा प्रकाश पर्व म्हणूनही साजरा केला जातो. या दिवशी शीख समुदायाचे लोक गुरुद्वारामध्ये जातात, सेवा करतात आणि लंगरच्या स्वरूपात गुरूंच्या नावाने प्रसाद खातात.
नानक यांनी फारसी, अरबी आणि संस्कृत भाषांवर प्रभुत्व मिळवले होते. त्यांच्या शिकवणीमध्ये देव, सत्य आणि सेवा या गोष्टींवर जोर दिला गेला. गुरु नानक देव हे शीख धर्माचे पहिले गुरु होते. नानकजींचा जन्म झाला ते जन्मस्थान आता पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील नानकाना साहिबमध्ये आहे. आता हे ठिकाण नानक देव म्हणून ओळखले जाते. येथे देश-विदेशातील लोक प्रसिद्ध गुरुद्वारा ननकाना साहिबला भेट देण्यासाठी येतात. असे म्हणतात की हा गुरुद्वारा ‘ननकाना साहिब’ शीख साम्राज्याचे राजा महाराजा रणजित सिंग यांनी बांधला होता.
गुरू नानक देवजी मूर्तीपूजेला निरर्थक मानत होते आणि ते नेहमी रूढी आणि कर्मकांडाच्या विरोधात होते. यामुळेच गुरू नानकजींनी शीख समाजाचा पाया घातला असे म्हटले जाते. शीख समाजाचे पहिले गुरू नानक देव जी यांची पूजा याच खास कारणासाठी केली जाते. गुरु नानक देव यांना त्यांचे भक्त नानक देव, बाबा नानक आणि नानक शाह असे देखील म्हणतात. नानकजींचा मृत्यू २२ सप्टेंबर १५३९ रोजी झाला. त्यांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी त्यांचे शिष्य भाई लहना यांना उत्तराधिकारी बनवले, जे नंतर गुरु अंगद देव म्हणून ओळखले जाऊ लागले.
गुरू नानक हे संसारामध्ये असताना त्यांनी वयाच्या ३० व्या वर्षी अध्यात्म यात्रेला निघाले. देव हा एक आहे आणि त्याच्या दारात कोणताही भेदभाव नसतो. देवासाठी सगळे समान असतात आणि त्याच्यासाठी कोणी स्पृश्य, अस्पृश्य नसतो यावर त्यांचा ठाम विश्वास होता, म्हणूनच त्यांनी शीख धर्माची स्थापना केली आणि ते शिखांचे पहिले गुरू बनले.
सर्वसामान्यांमध्ये देव, धर्माबाबत जागृती निर्माण करण्यासोबतच त्यांनी शीख धर्माची शिकवण दिली गुरू नानक यांनी आयुष्यभर हिंदू व मुस्लिम धर्मियांना एकतेचा संदेश दिला. लडाख आणि तिबेट प्रदेशात त्यांना नानक लामा असेही म्हणतात. भारताव्यतिरिक्त गुरू नानक देव यांनी अफगाणिस्तान, इराण आणि अरब देशांमध्येही प्रचार केला. गुरू नानक यांनी रचलेल्या कविता नंतर शिखांचा पवित्र ग्रंथ ‘गुरू ग्रंथ साहिब’मध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.