आपल्या देशात किंवा जिथे जिथे भारतीय राहतात त्या सर्वांच्या घरात कॉटेसे का असेना पण देवघर असतेच. आपली सर्वांची देवावर खूप श्रद्धा असल्याने आणि नेहमीच देवाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता यावी या हेतूने घरात देवघर ठेवतो. आपल्या हिंदू लोकांमध्ये देव पूजेला फार महत्व आहे. अनेक लोकं सकाळी देव पूजा झाल्याशिवाय पाणी देखील पीत नाही. जुन्या पिढीच्या लोकांमध्ये तर या सवयी अतिशय सामान्य वाटतात.
आज प्रत्येक घरात देव घर असते. अनेक लोकांच्या देवघरामध्ये अतिशय कमी आणि मोजकेच देव असतात तर काही लोकांच्या देवघरामध्ये लहान मोठे अनेक देव पाहायला मिळतात. मात्र आपल्या वास्तुशास्त्रामध्ये देवघरात कोणते देव असावे आणि कोणते असू नये याबद्दल माहिती दिली आहे. देव घरात देव कमी किंवा मोजके असले तरी चालेल मात्र ते महत्वाचे पाहिजे. जेणेकरून या घरात असलेल्या देवांचा आशीर्वाद आपल्याला सतत लाभेल आणि जीवनात सकारात्मकता येईल. चला जाणून घेऊया देवघरात कोणते देव ठेवावे आणि कोणते ठेऊ नये याबद्दल वास्तुशास्त्र काय सांगते.
– घरात ज्या ठिकाणी देवघर असते ती जागा पवित्र मानली जाते. त्यामुळे पूजेच्या ठिकाणी नेहमी स्वच्छता राहील याची काळजी घ्यायला पाहिजे. तसेच पूजेच्या ठिकाणी किंवा देव्हाऱ्याच्या ठिकाणी शांतात असावी. शास्त्रांनुसार, ज्या घरात स्वच्छता आणि शांतमय वातावरण आहे तिथे सकारात्मक शक्तीचा वास असतो.
– पूजेच्या ठिकाणी थोडी जरी अव्यवस्था असली तर त्याचा नकारात्मक परिणाम त्या घरावर पडतो. त्यामुळे अशुभ वाटतील अशुभ संकेत देतील अशा कोणत्याच वस्तू देवघरात ठेवू नये. वास्तू शास्त्रानुसार, घरात देवघराचे स्थान नेहमी ईशान्य दिशेला म्हणजेच उत्तर-पूर्व दिशेला असलं पाहिजे. या दिशेत देव्हारा असल्यास किंवा पूजेचं ठिकाण असल्यास घरातील सदस्यांवर सकारात्मक ऊर्जेचा प्रभाव पडतो. तसेच ही ऊर्जा कायम घरातील सदस्यांसोबत राहते.
– आपण बघतो बऱ्याच घरांमध्ये गणपतीच्या विविध प्रकारच्या आकर्षक मोठ्या मूर्ती ठेवतात, ज्यामध्ये गणराय खाटेवर पडून वाद्य वाजवत आहेत किंवा वाचत असतात. पण चुकूनही अशा मूर्ती घरात आणू नयेत. देवाची प्रतिमा शो-पीस म्हणून वापरणे अशुभ मानले जाते.
– लक्ष्मीची मूर्ती कधीही उभी असू नये. असे सांगितले जाते की लक्ष्मी चंचल आहे आणि ती बसलेल्या स्थितीत असेल तरच तिचे पाय तुमच्या घरात टिकतील आणि संपन्नता नांदेल.
– देवाची कोणती मूर्ती ठेवावी आणि किती संख्येत असावी, याबाबत देखील काही नियम आहेत. घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग असू नये. भगवान विष्णूच्या रूपातील शालिग्रामचा फक्त छोटा तुकडा घरात ठेवावा. शनिदेव, भैरवबाबा, नटराज आदी देवांच्या मूर्ती घरात ठेवणे अत्यंत अशुभ मानले जाते. शनीदेवाची मूर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये. शनीदेवाची पूजा नेहमी शनी मंदिरात जाऊन केली पाहिजे कारण शनीदेवाची पूजा करताना काही नियम पाळावे लागतात. याशिवाय एकाच देवाच्या दोन मुर्ती घरातील देव्हाऱ्यात ठेवू नये.
– देवतांच्या मूर्ती खूप मोठ्या नसाव्यात. मूर्ती ६ इंचांपेक्षा मोठी नसावी. यामागील शास्त्र असे आहे की मोठ्या मूर्तीला पाणी अर्पण करणे किंवा आंघोळ करणे, स्वच्छता करणे खूप कठीण आहे आणि त्यामुळे अनेकदा मोठ्या मूर्ती देखील अस्वच्छ राहतात.
– देव्हाऱ्यात एकाच देवाचे दोन फोटो ठेवू नये. विशेषत: गणपतीच्या तीन प्रतिमा देव्हाऱ्यात असू नयेत. असे असल्यास घरातील शूभ कार्यात अडचणी येतात.
– घरात ज्या ठिकाणी देव्हारा आहे त्याच्या वरच्या मजल्यावर त्याच ठिकाणी शौचालय असता कामा नये. तसेच पूजेच्या आजूबाजूलादेखील शौचालय असता कामा नये.
– वास्तू शास्त्रानुसार, स्वयंपाकघरात देव्हारा असणे योग्य मानले जात नाही. तसं असल्यास कितीही पूजा-अर्चा केली तरी त्याचे फळ मिळत नाही.
(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आम्ही दावा करत नाही कोणतेही उपाय करताना त्यातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)