दिवाळीत फटाके, दिवे, फराळ, रांगोळी, सफाई, खरेदी आदी सर्वच गोष्टींसोबत अभ्यंग स्नानाला देखील खूप महत्त्व देण्यात आले आहे. दिवाळीमध्ये नरक चतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी यमराज आणि भगवान श्रीकृष्णाची खास पूजा केली जाते. सोबतच सुख, समृद्धी आणि अकाली मृत्यूपासून रक्षणासाठी प्रार्थना केली जाते. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याचे खूप महत्त्व आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी उठून उटणे, सुवासिक तेल आणि साबण लावून या दिवशी अंघोळ केली जाते.
या स्नानाला पहिली अंघोळ देखील म्हटले जाते. या दिवशी पहाटेच दिवे लावून फटाके फोडून नरक चतुर्दशी साजरी केली जाते. आपण सर्वच ही पहिली अंघोळ नेहमी करतो. मात्र तुम्हाला माहित आहे हा या अभ्यंगस्नानाचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. हे स्नान करण्यामागे पौराणिक आणि वैज्ञानिक देखील अनेक कारणं आहेत. चला जाणून घेऊया नरक चतुर्दशीला केल्या जाणाऱ्या अभ्यंग स्नानाचे आपल्या शरीरासाठी असणारे फायदे.
अभ्यंगस्नानाचे महत्त्व
अभ्यंगस्नान हे दिवाळीतल्या चार दिवसांपैकी नरक चतुर्दशीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाला आणि बलिप्रतिपदेला केलं जातं. हे स्नान शक्यतो ब्राम्ह मुहूर्तावर म्हणजेच सकाळी लवकर उठून साडेचार पासून ते सकाळी ६ .३ ० च्या दरम्यान केले जाते. या दरम्यानच्या कालावधीमध्ये वातावरणात वात हा जास्त प्रमाणात असतो. आपल्या शरीरात देखील वाताचे प्रमाण जास्त असते. अशा वेळेस अभ्यंगस्नान केल्याने शरीराला जास्त फायदे होतात.
अभ्यंगस्नान पद्धत
शास्त्रानुसार, नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी अंगाला मुलतानी माती लावून स्नान करण्याच्या प्रक्रियेला अभ्यंगस्नान म्हणतात. ज्यामध्ये हळद, चंदन, दही, बेसन, तिळाचे तेल, औषधी वनस्पती इत्यादी मिसळून पेस्ट तयार केली जाते, ज्याद्वारे संपूर्ण शरीराची मालिश केली जाते. अंगावर उटणे लावून अंघोळ केली जाते. या उटणामुळे त्वचेचा पोत सुधारण्यास देखील मदत होते.
अभ्यंगस्नानाचे फायदे काय?
– नरक चतुर्दशीच्या दिवशी आंघोळ करण्यापूर्वी तिळाच्या तेलाने शरीराची मालिश केली जाते. दिवाळी हिवाळ्यात येते आणि तिळाच्या तेलाने मसाज केल्याने शरीर उबदार होते. यामुळे तुमच्या शरीरातील पित्ताची पातळीही कमी होते.
– चेहऱ्यावर आणि शरीरावर उटणे लावल्याने शरीराची त्वचा तजेलदार होते. चेहऱ्यावर तेज येते. यासोबतच मसाज केल्याने स्नायू बलवान होतात. उटणे लावून स्नान केल्याने हिवाळ्यात कोरडी पडत असलेली त्वचा देखील मऊ होते.
– शरीराची कांती तजेलदार व्हावी, स्नायू बलवान आणि पुष्ट व्हावेत यासाठी हे स्नान केले जाते. आरोग्याची वाढ होणे हा याचा प्रमुख हेतू मानला जातो. अभ्यंगस्नान हे केवळ दिवाळीच्या दिवशी करू नये तर त्या दिवसापासून सुरुवात करून ते वर्षभर रोज करावे असे आयुर्वेदातील तज्ज्ञ सांगतात.
– उटणं हे आयुर्वेदिक घटकांपासून बनवले जाते. त्यामुळं त्वचेवर त्याचा काहीच दुष्परिणाम होत नाही. नैसर्गिक घटक असल्यामुळं त्वचेचा पोतही सुधारतो.
– अभ्यंगस्नानाच्यावेळी उटणं लावायच्या आधी तिळाच्या तेलाने मॉलिश करावी. कारण तिळाचे तेल हे हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त असते तसंच त्यामुळे त्वचादेखील मऊ राहते.
========
हे देखील वाचा : जाणून घ्या नरक चतुर्दशी आणि अभ्यंगस्नानाचा इतिहास
========
– अभ्यंगस्नान करताना अंगाला लावायचे तेल प्रांतानुसार आणि तेथील स्थानिक हवामानानुसार बदलते. महाराष्ट्रात तिळाचे तेल, केरळात खोबरेल तेल तर उत्तर भारतात मोहरीचे तेल अंगाला लावून अभ्यंग केले जाते.
– थंड हवामानामुळं त्वचा कोरडी पडते अशावेळी उटण्याने अंघोळ केल्यास त्वचा मऊ आणि उजळते. गरज असल्यास उटण्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या, केशर किंवा संत्र्याच्या सालीची पावडरदेखील टाकू शकता.
-तुमच्या त्वचेच्या पोतनुसार तुम्ही उटण्याचा वापर करु शकता. त्वचा तेलकट असेल तर त्यात कच्चे दूध आणि पाणी टाकू शकता. त्वचा कोरडी असेल तर उटण्यात दूधासोबतच मध वापरा त्यामुळं त्वचा मऊ होईल.
(टीप : वरील सर्व बाबी एक माहिती म्हणून आम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून गाजावाजा कोणताही दावा करत नाही.)