दिवाळीचा सण तोंडावर आला आहे. घरातील साफसफाई अंतिम टप्यात आली असून, दुसरीकडे दिवाळीसाठी घराची सजावट देखील चालू आहे. आकाशकंदील, रांगोळी, दिव्याच्या माळी, पणत्या आदी सर्वच गोष्टी खरेदी करून घरात आल्या असतील. मात्र यासोबतच दिवाळी एका गोष्टींशिवाय कायम अपूर्ण असते, ती गोष्ट म्हणजे फराळ. दिवाळी म्हटले की, सर्वात आधी डोळ्यासमोर यतो तो चमचमीत फराळ. चिवडा, चकली, लाडू, करंजी आदी सर्वच गोष्टी पाहून सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते.
पूर्वीच्या काळी आपली आजी सर्व फराळ अगदी मोठ्या प्रमाणावर घरीच बनवायची. सर्वच गोष्टी पदार्थ ती अंदाजाने बनवायची तरीही तिचे पदार्थ उत्कृष्ट आणि उत्तम बनायचे. आज फराळ घरी तयार होणे कमी झाले असले तरी, आरोग्याच्या दृष्टीने जवळपास सर्वच स्त्रिया कमी प्रमाणात का असेना फराळ घरीच बनवण्यास प्राधान्य देतात.
फराळ बनवतात अनेकदा आपला अंदाज चुकतो आणि पदार्थ फास्ट. कमी प्रमाणात करताना देखील अनेकदा चुका होतात. फराळ बनवणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. मात्र कठीणही नाही. योग्य टिप्स आणि अंदाज घेऊन केले तर नक्कीच फराळ चांगला बनतो. आज यूटुबवर सर्वच आपल्याला सहज उपलब्ध आहेत. मात्र तरीही आपल्या चुका होत असतील तर हा लेख तुमच्यासाठी आहे. या लेखातून आपण प्रत्येक पदार्थासाठी काही सोप्या ट्रिक्स आणि टिप्स जाणून घेणार आहोत. ज्याचा वापर करून तुम्ही नक्कीच तुमच्या दिवाळीच्या फराळाच्या पदार्थांच्या चवी वाढवू शकतात आणि तो पदार्थ उत्तम बनवू शकतात.
करंज्या
१. करंजा तळताना अनेकदा त्या तेलात फुटतात. यामुळे त्यातील सारण तेलात पसरते आणि सर्व तेल खराब होतं. असे होऊ नये म्हणून करज्यांच्या कडांना कापसाच्या बोळ्याने दूध लावावे.
२. शक्य असल्यास करंजी करताना मोहन चांगल्या तुपाचे घालावे. तूप नसेल तर तेलही चालते. मोहन थंड झाल्यावर पीठाला चांगले मळून घ्यावे.
३. करंजीसाठी भिजवलेले पीठ शेवटपर्यंत मऊ राहावे यासाठी ते सुती कपड ओला करुन त्यात गुंडाळून ठेवा.
लाडू
१. रवा लाडूसाठी रवा भाजल्यानंतर उतरवून त्यावर चार चमचे दूध शिंपडावे, यामुळे रवा छान फुलतो आणि रव्याला छान चवही येते.
२. रवा लाडू चविष्ट होण्यासाठी पाक झाल्यावर त्यात ड्रायफ्रूट मिक्स पावडर मिक्स करावा आणि त्यात रवा घालावा. त्यामुळे लाडू मऊ होतो.
३. बेसनाचे लाडू चांगले होण्यासाठी बेसन चांगले भाजून घ्या, त्यावर एका वाटीला एक चमचा दूध शिंपडावे, यामुळे लाडू चविष्ट होतात.
४. बेसनाच्या लाडूसाठी बेसन भाजून घेतल्यानंतर ते कोमट झाल्यानंतर एका वाटीला एक चमचा या प्रमाणात मिल्क पावडर घालावी ज्यामुळे लाडूला चांगली चव येते.
५. बेसनाच्या लाडूसाठी तूपाचे प्रमाण योग्य असावे अन्यथा लाडू खूप सैल नाहीतर जास्त कडक होतात.
चकली
१. चकलीसाठी तुम्ही कोणताही तांदूळ घेऊ शकता. पण ज्या तांदळाचा भात चिकट होतो किंवा जे तांदूळ नवीन आहेत असे तांदूळ घेऊ नका.
२. चकली बनवण्यासाठी तुम्ही जे काही साहित्य घ्याल ते व्यवस्थित भाजलेलंच असावं. मंच आचेवर पदार्थ भाजून घ्या. अन्यथा भाजणी परफेक्ट बनत नाही आणि लगेच नरम पडते. भाजणीमध्ये थोडा साबुदाणा देखील मिक्स करा.
३. चकलीची भाजणी दळून आणताना त्याआधी तांदूळ किंवा ज्वारी दळायला लावा, जेणेकरून भाजणी बिघडणार नाही.
४.चकली तेलात घातल्यानंतर गॅस मंद किंवा जास्त उच्च आचेवर न ठेवता मध्यम आचेवर ठेवा. मंद आचेवर ठेवल्यानं चकली कच्ची राहते तर उच्च आचेमुळे चकली जास्त करपू शकते म्हणून मध्यम आचेवर ठेवा.
५. चकलीच्या पिठात योग्य प्रमाणात मोहन अवश्य घाला.
अनारसा
१. चवदार आणि जाळीदार अनारसे तयार करण्यासाठी तांदूळ 2-3 दिवस भिजवत ठेवा. तांदूळ भिजवताना दर 24 तासांनी याचे पाणी बदलत रहा
२. अनारसे विरघळत असतील तर पिठात रवा घालून पीठ परत भिजवून रात्रभर बाहेर ठेवा व दुसऱ्यादिवशी अनारसे करा. याचबरोबर, पीठ पातळ झाल तर तांदळाचे पीठ मिक्स करा व पीठ पुन्हा दोन दिवस भिजत ठेवा मग अनारसे बनवा.
३. अनारसा पीठ खूप दिवस टिकून राहते. त्यामुळे तळताना जर अनारसे फेसाळले तर पीठ तसेच ठेवून काही दिवसांनी तळावे.
४. कधी कधी पीठ उष्णतेने सैलसर झाले तर पीठ फ्रिज मध्ये ठेवावे. अनारसे बनवताना थोडेसे तांदळाचे पीठ टाकून मळून अनारसे लगेच करून घ्यावेत. अनारसे व्यवस्थित होतात.
चिवडा
१. चिवड्यासाठी आपण जे पोहे वापरतो ते पोहे मऊ पडू नयेत असे वाटत असेल तर त्याला जेव्हा ऊन पडते तेव्हा. चांगल्या कडक उन्हात ठेवावे.
२. घरात जर ऊन येत नसेल तर मायक्रोव्हेवमध्ये किंवा कढईमध्ये हे पोहे चांगले परतून गरम करुन घ्या. त्यामुळे तुमचा चिवडा शेवटपर्यंत कुरकुरीत राहील.
३. चिवड्यात घालायची कोथिंबीर, मिरच्या, कढीपत्ता हे सगळं पुसून कोरडे करुन घ्या.
४. चिवडा झाल्यावर पूर्ण गार झाल्याशिवाय गरम गरम डब्यात भरून ठेऊ नका.
५. हळद फोडणी उतरवून शेवटी घालावी म्हणजे रंग काळा होणार नाही.
६. पातळ पोह्यांचा चिवडा बनवत असाल तर जेव्हा आपण जेव्हा पोहे भाजून घेत असतो, तेव्हा चिमूटभर मीठ टाका. यामुळे पोह्यांचा आकार लहान होत नाही आणि पोहे जास्त वेळ कुरकुरीत राहतात.
========
हे देखील वाचा : या दिवाळीत नक्की करून बघा ‘हे’ विविध प्रकारचे लाडू
========
शेव
१. पीठ भिजवताना त्यात गोळे होणार नाहीत, याची काळजी घ्या.
२. पीठ थोडंसं घट्ट भिजवा आणि २ ते ३ मिनिटे चांगलं मळून घ्या. जेणेकरून शेव कोरडी पडणार नाही आणि अगदी कुरकुरीत होईल.
३. तेल फार गरम नको मध्यम गरम असावे . शेव घालताना गॅस मोठा व घालून झाली की गॅस मध्यम करावा.
४. शेव पाडताना बाहेरून आत पडावी. कढईच्या मध्ये जास्त हिट लागते त्यामुळे तिथे शेवट शेव पाडावी.
५. फार लालसर शेव तळू नये, तिला नंतर रंग चढतो.
६. ओवा वाटलेले पाणी गाळून घेणे मस्ट आहे. बारीक जाळीत न गाळलेला ओवा अडकून शेव तळणीत पडणार नाही म्हणून.