Home » सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी

सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी

by Jyotsna Kulkarni
0 comment
Shri Manudevi
Share

आज नवरात्रीची तिसरी माळ. देवी चंद्राघंटेची आज पूजा करून तिचा आशीर्वाद घेतला जातो. नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये आपण आदिशक्तीच्या नऊ रूपांची पूजा करतो आणि त्यांचे स्मरण करत नवरात्री साजरी करतो. या नऊ दिवसांमध्ये आपण महाराष्ट्रातील देवीच्या विविध रूपांची माहिती घेत आहोत. अतिशय प्रसिद्ध, जाज्वल अशी अनेक मंदिरे आपल्या राज्यात आहेत. यातलेच एक मोठे, लोकप्रिय आणि प्रसिद्ध मंदिर म्हणजे सातपुडा निवासिनी मनुदेवी.

मनुदेवी मंदिर हे महाराष्ट्रातील सातपुडा पर्वतरांगाच्या निसर्गरम्य परिसरात वसलेले शेकडो वर्ष जुने देवीचे मोठे मंदिर आहे. हे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील आडगाव गावाजवळ आहे. मनुदेवी ही खान्देशातील असंख्य लोकांची कुलस्वामिनी देखील आहे. आज नवरात्राच्या निमित्ताने जाणून घेऊया मनुदेवीच्या इतिहासाबद्दल आणि तिच्या या रूपाबद्दल.

जळगाव जिल्ह्यातील बऱ्हाणपूर – अंकलेश्वर राष्ट्रीय महामार्गावरील चिंचोली (ता. यावल) गावापासून उत्तरेला सातपुडा पर्वताच्या रांगेत १२ किलोमीटरवर खान्देश निवासिनी आणि सर्वांचे कुलदैवत असणाऱ्या मनुदेवी मातेचे हेमाडपंथी मंदिर आहे.

सातपुडा पर्वतरांगांतील घनदाट जंगलात मनुदेवीचे अतिशय आकर्षक आणि हेमाडपंथी शैलीतील सुरेख मंदिर आहे. शेकडो वर्षांपूर्वी राजा ईश्वरसेन राजा या भागात राज्य करीत असताना त्याने मंदिराची बांधणी केल्याचे उल्लेख इतिहासात सापडतात. ईश्वरसेनने देवीच्या मूर्तीची स्थापना मार्केंडय ऋषींच्या हस्ते वैदिक पद्धतीने केली असल्याची आख्यायिका देखील प्रसिद्ध आहे.

Shri Manudevi

मंदिराची स्थापना प्राचीन काळापासून करण्यात आली असून, महामार्गावर असलेल्या चिंचोली गावापासून तीन कि.मी.अंतरावर उत्तरेला आडगाव कासारखेडा आणि तेथून साधारणतः पाच ते सहा कि.मी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले मानापुरी या आदिवासी गावापासून मनुदेवीचे मंदिर जवळपास चार ते पाच कि.मी अंतरावर आहे, म्हणजे सहा कि.मी.संपूर्ण सातपुड्याच्या जंगलातूनच प्रवास करावा लागतो.

मनुदेवी मंदिराकडे जाताना वाटेत हनुमानाचे छोटेखानी मंदिर आहे. मनुदेवी मातेचे दर्शन घेण्याआधी भाविक प्रथम येथे मस्तक टेकवून पुढे ‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌‌प्रवास करतात. या मंदिराचा सभामंडप ८६ बाय ५० फूट आकाराचा आहे तर गाभारा २२ बाय १४ फूट इतका भव्य आहे. मंदिराभोवती तेरा फूट उंचीच्या आणि दोन किलोमीटर लांबीच्या विटा अतिशय वैशिष्ट्य़पूर्ण पद्धतीने रचलेल्या आहेत. बुरुजांचे काही भाग ढासळलेले असले, तरी सध्या अस्तित्वात असलेल्या अवशेषांवरून पूर्वीच्या बांधकामाची रचना अथवा मजबुतीविषयी अंदाज करता येतो.

या मनुदेवीच्या मंदिर परिसरात पोहचल्यावर जवळपास शंभर सव्वाशे पायऱ्या चढून मंदिरात जावे लागते. /मंदिराच्या समोरच सुमारे १०० फूट उंचावरून नयनरम्य धबधबा कोसळतो. वर्षातले सुमारे ७/८ महिने हा धबधबा कोसळत असतो. त्याच्या पाण्यातूनच खाली एक छोटा तलाव देखील तयार झालेला दिसतो. यातूनच देवीच्या दर्शनाला जावे लागते.

या धबधब्यावरून कोसळणारे शुभ्र पाणी व मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत भाविकांचे अंगावर पडणारे तुषार भाविकांची विशेष लक्षवेधी सातपुड्याच्या कुशीत श्री मनुदेवीचे वास्तव्य असल्याने सुमारे तीन किलोमीटर घनदाट जंगल नागमोडी वळणाचा रस्ता आणि सात वेळा ओलांडावी लागणारी नदी पर्यटकांचे लक्ष वेधून घेते.

या तिर्थक्षेत्राविषयी अनेक दंतकथा, लोककथा, तोंडी इतिहास आहे. देवी भागवत पुराणात असा उल्लेख आहे की ब्रम्हा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांवर एक मोठे संकट आले असता, राक्षसांपासून सुटका करण्यासाठी या तिन्ही देवतांना गुप्त ठिकाणी म्हणजे सातपुडयाच्या खोल दरीत गुहेत येऊन थांबावे लागले. ते गुप्त ठिकाण म्हणजे श्री मनुदेवीचे मंदिर होय.

या लपलेल्या गुहेत सर्व देवांनी एक मनाने विचार करीत त्यांच्या श्वासाने आणि उच्छवासाने एक तेज प्रकट झाले. तीव्र तेजस्वी प्रकाशाची ज्योत निर्माण झाली, तो सर्व शक्तीमान प्रकाशाचे देवता मनाचे सामर्थ्य असलेली श्री मनुदेवी प्रकट झाली. तीच मनुदेवी देवांजवळ प्रकट झाल्याने, कोणत्या हेतूने आपण आला आहात, त्यावेळी ब्रम्हा विष्णु महेशांनी देवीस विनंती केली की, हे आदिशक्ती, सर्वमान शक्ती श्री मनुदेवी आमच्यावर फार मोठे संकट कोसळलेले आहे.

महिषासुर राक्षसाने पॄथ्वीवर सर्वत्र धुमाकूळ घातला असून, सामान्य लोकांवर अत्याचार सुरु केल्याने आम्ही त्रस्त झाले आहोत. म्हणून त्याचा वध करण्यासाठी तू उग्र रूप धारण करुन त्याचा नि:पात करत त्यास नष्ट करावे आणि सर्व जीव सॄष्टीला भय मुक्त करावे. ही सर्व शक्तीची प्रार्थना एकून श्रीमनुदेवीने या त्रिदेवांना अभयवचन दिले की, मी लवकरच श्री सप्तश्रॄंग देवीचा अवतार घेऊन, त्या महिषासुर राक्षसाचा वध करेल.

========

हे देखील वाचा : नवरात्राची तिसरी माळ – चंद्रघंटा देवी

========

या अभिवचनानुसार श्रीमनुदेवी ही महिषासुराचा वध करण्यासाठी रणांगणात उतरली. तिने, तापी काठावर वसलेले शिरागड येथे युध्द केले. म्हणून त्या ठिकाणी श्रीमनुदेवीचे स्वरूप शिरागडची अष्टभुजा देवी म्हणून आजही विराजमान आहे. तेथून श्रीमनुदेवीने नांद्रा ( बाजारा ) येथे युध्द केले तेथे ही अष्टभुजादेवीचे मंदिर आहे. नांद्रा येथील पाटणा या ठिकाणी देवीने करत असलेल्या घनघोर युद्धामुळे ठाकली आणि देवीने तेथे विश्रांती घेतलेली आहे. म्हणून श्री पाटणा देवी येथे श्री श्रीमनुदेवीचे स्वरुप अष्टभुजा देवीच्या सुंदर स्वरुपात प्रकट झालेली असून जागॄत देवस्थान समजले जाते.

तेथूनच श्री मनुदेवीने महिषासुर राक्षसाचा वध करताना दुर्गम अशा सप्तश्रॄंग पर्वतात नेले. या ठिकाणी श्री सप्तश्रॄंग देवीने उग्र स्वरूप धारण करून त्या महाभयंकर राक्षस असणाऱ्या महिषासुराचा ७ वर्षे घनघोर युध्द करून वध केला. अशी ऐकिवात येणारी कथा आहे. याच मनुदेवीची मालेगाव जवळील नंदाळे येथे देखील एक मंदिर आहे. देवी स्वतः एका भक्ताच्या इच्छेखातर इथे आल्याचे सांगितले जाते. तर नाशिक जवळील आडगाव भागात देखील स्वयंभू मनुदेवीचे प्रशस्त मंदिर आहे.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.