हिंदू धर्मात अनंत चतुर्दशीला खूप महत्त्व आहे. या दिवशी गणेशाचे विसर्जन करण्यासोबतच अजून एक मोठे आणि महत्वाचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपांची पूजा करण्याची जुनी परंपरा आहे. यामुळेच या दिवसाला अनंत चतुर्दशी म्हणतात. याशिवाय बऱ्याच ठिकाणी या दिवसाला चौदस असेही म्हटले. या व्रतामध्ये भगवान विष्णूच्या शाश्वत रूपाची पूजा केली जाते.
या दिवशी अनंताची पूजा केल्यानंतर हातावर अनंत सूत्र बांधले जाते. हे सूत्र कापूस किंवा रेशमाचे बनलेले असतात आणि त्यांना चौदा गाठी असतात. हिंदू पंचांगानुसार, अनंत चतुर्दशी हा सण दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्दशीला साजरा केला जातो. या दिवशी गणपती विसर्जनही केले जाते. यासोबतच भगवान विष्णूच्या पूजेसाठीही ही तिथी अतिशय महत्वाची आणि खास मानली जाते. यावेळी १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीचे व्रत पाळण्यात येणार आहे. या व्रताची सुरुवात महाभारत काळात झाली असल्याची मान्यता आहे.
पौराणिक मान्यतेनुसार, सृष्टीच्या प्रारंभी अनंत परमात्म्याने तल, अतल, वितल, सुतल, तलातल, रसातळ, पाताळ, भू, भुवः, स्वः, जन, तप, सत्य, मह असे चौदा विश्व निर्माण केले होते. या जगांची देखभाल आणि संरक्षण करण्यासाठी, तो चौदा रूपांमध्ये प्रकट झाला, ज्यामुळे तो अनंत प्रकट झाला. म्हणून अनंत चतुर्दशी हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो. या दिवशी श्री विष्णु सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी विष्णु सहस्त्र नामावली वाचून भगवान विष्णूला १००१ तुळशी पत्र वाहून अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. कोणतेही संकट दूर होण्यासाठी आणि हरवलेले वैभव पुन्हा मिळण्यासाठी हे व्रत केले जाते. सतत चौदा वर्षे चौदा गाठी असलेला रेशमी दोरा अनंत मानून त्याची पूजा करतात. पांडवांना द्यूतात हरल्यावर १२ वर्षे वनवास व एक वर्ष अज्ञातवास भोगावा लागला. या आपत्तीतून सुटका व्हावी म्हणून अनंत व्रत करण्याचा भगवान श्रीकृष्णांनी उपदेश केला. अशी कथा आहे.
अनंताच्या पूजेचे व्रत सुख-शांती, ऐश्वर्य, सौ भाग्य, समृद्धी, स्थैर्य मिळण्यासाठी करावे असा समज आहे. कित्येक ठिकाणी पिढ्यान-पिढ्या हे व्रत केले जाते. अहंभाव सोडून परोपकाराने वागल्यास संपत्ती व सौभाग्य मिळते, असा संदेश अनंत पूजेच्या व्रतामधून दिला गेला आहे. या दिवशी भक्तिभावाने अनंताची पूजा करतात.
अनंत पूजा व्रत विधी
मध्यान्हकाळी स्नान करून, शुद्ध पाण्याने भरलेला कलश चौरंगावर मांडून त्यास दोन पंचे किंवा दोन छोटे रूमाल अथवा नविन कोणतेही वस्त्र गुंडाळतात. त्यावर दर्भाचा शेषनाग करून ठेवतात. कलशावरील पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शाळीग्राम मांडून षोडषोपचारे पूजा करतात. या पूजेत प्रामुख्याने यमुना, शेष आणि अनंताचा दोरक म्हणजे दो-याची पूजा असते.
यमुना हे मनावरील कामक्रोधांचा ताबा ठेवण्याचे प्रतीक आहे. शेष हे महासामर्थ्यशाली पण अहंकाररहित तत्त्वाचे प्रतीक आहे. तर अनंताचा दोरक हे संसारातील कालचक्राचे प्रतीक आहे. कालचक्राचे चौदा भाग दाखवण्यासाठी अनंताचा दोरकही चौदा धाग्यांचा असतो. तांबडा रेशमाचा दोरा समंत्रक १४ गाठी मारुन अनंताचा दोरक म्हणून पूजेत ठेवला जातो. या दोऱ्यास अनंत म्हणतात; त्याबरोबर अनंती देखील पूजेत ठेवली जाते. पूजा झाल्यावर तो अनंत दोरा घरातील पुरुषाने उजव्या हातात तर अनंती ही त्याच्या पत्नीने डाव्या हातात बांधावी.
अनंत चतुर्दशीची कथा
प्राचीन काळी एक तपस्वी ब्राह्मण राहत होता. त्याचे नाव सुमंत आणि पत्नीचे नाव दिक्षा होते. त्या दोघांना सुशीला नावाची पुण्यवान मुलगी होती. सुशीला लहान असतानाच तिची आई दीक्षा मरण पावली. काही काळानंतर सुशीलाचे वडील सुमंत यांनी कर्कशा नावाच्या महिलेशी लग्न केले. काही दिवसांनंतर सुशीलाचा विवाह ब्राह्मण कौंदिन्य ऋषीशीही झाला.
सुशीलाच्या निरोपाच्या वेळी तिची सावत्र आई कर्कशा हिने काही विटा आणि दगड बांधून जावई कौंदिन्याला दिले त्यामुळे कौंदिन्याला कर्कशाचे हे वागणे खूप वाईट वाटले. दुःखाने तो आपल्या पत्नीसह निघून गेला. वाटेत रात्र झाली म्हणून तो एका नदीकाठी थांबला आणि संध्याकाळी भगवंताचे नामस्मरण करू लागला. त्याचवेळी सुशीलाला अनेक स्त्रिया कोणत्या ना कोणत्या देवतेची पूजा करताना दिसल्या.
सुशीलाने त्या स्त्रियांना पूजेबद्दल विचारले तेव्हा त्यांनी तिला भगवान अनंतांची पूजा आणि त्याचे महत्त्व सांगितले. सुशीलानेही त्याच वेळी व्रत केले आणि 14 गाठींचा धागा बांधून कौंदिन्याकडे आली. कौंदिन्याने सुशीलाला त्या धाग्याबद्दल विचारले तेव्हा सुशीलाने त्याला सर्व प्रकार सांगितला. कौंदिन्याने हे सर्व स्वीकारण्यास नकार दिला आणि तिच्या हातावर बांधलेला अनंत धागा काढून आगीत टाकला.
यानंतर त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि तो दुःखी राहू लागला. खूप दिवस उलटल्यानंतर कौदिन्याने सुशीलाला या गरिबीचे कारण विचारले तेव्हा तिने भगवान अनंतांचा धागा जाळल्याची आठवण करून दिली. हे ऐकून कौंडिन्य अनंत सूत्र घेण्यासाठी वनाकडे निघाला. अनेक दिवस जंगलात शोधाशोध करूनही जेव्हा त्याला अनंत सूत्र सापडले नाही तेव्हा तो निराशेने जमिनीवर कोसळला.
त्यानंतर तेथे भगवान विष्णू प्रकट झाले आणि कौंदिन्याला उद्देशून म्हणाले. हे कौदिन्या तू माझा तिरस्कार केला होता म्हणूनच तुला खूप त्रास सहन करावा लागला. आता तुला पश्चात्ताप झाला आहे, म्हणून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता घरी जाऊन अनंत चतुर्दशीचे व्रत कर. 14 वर्षे उपवास केल्यावर तुझे दुःख दूर होईल आणि तू धनवान होशील. त्यानंतर कौंदिन्याने अनंत चतुर्दशीचे व्रत केले आणि त्याची सर्व संकटातून सुटका झाली.
महाभारत काळापासून सुरुवात
महाभारताच्या कथेनुसार, कौरवांनी कपटाने पांडवांचा जुगारात पराभव केला, तेव्हा पांडवांना आपले राज्य सोडून वनवासात जावे लागले. या काळात पांडवांचे खूप हाल झाले. एके दिवशी भगवान श्रीकृष्ण पांडवांना भेटण्यासाठी वनात आले. भगवान श्रीकृष्णाला पाहून युधिष्ठिर म्हणाले, हे मधुसूदन, या दुःखातून बाहेर पडून राज्य परत मिळवण्याचा उपाय सांग.
======
हे देखील वाचा : “पॅडी का रडला?” विशाखा सुभेदारची ‘ती’ पोस्ट व्हायरल
======
श्रीकृष्ण म्हणाले, हे युधिष्ठिर! अनंत भगवानांचे व्रत पद्धतशीरपणे पाळावे, यामुळे तुमचे सर्व संकट दूर होतील आणि तुमचे हरवलेले राज्य तुम्हाला परत मिळेल. यावर युधिष्ठिराने विचारले, अनंत देव कोण आहे? त्याला उत्तर देताना श्रीकृष्ण म्हणाले की हे भगवान विष्णूचे रूप आहे. चातुर्मासात भगवान विष्णू शेषनागाच्या शय्येवर चिरनिद्रात असतात.
श्रीकृष्णाच्या आज्ञेवरून युधिष्ठिराने आपल्या परिवारासह अनंत उपवास केला, त्यामुळे महाभारताच्या युद्धात पांडवांचा विजय झाला आणि त्यांनी दीर्घकाळ राज्य केले. अनंत भगवंताची आराधना करून त्याचे सर्व संकट संपले.