भाद्रपद महिन्याला सुरुवात झाली आणि आता आपण या महिन्यातला पहिला महत्वाचा सण ६ सप्टेंबरला साजरा करणार आहोत. हा सण आहे हरितालिका पूजा. सर्वच सुवासिनी स्त्रियांसाठी हा सण खूपच मोठा समजला जातो. यादिवशी शंकराची, पार्वती माता आणि त्यांच्या सखींसोबत पूजा केली जाते. हरितालिका व्रत केल्यास विवाहित महिलांच्या सर्व इच्छा पुर्ण होत त्यांच्या पतींला उत्तम आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. शिवाय संसारातील सारी विघ्ने दूर होतात. तर अविवाहित मुलींना योग्य जीवनसाथी मिळतो अशी मान्यता आहे.
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतियेला हरतालिकेचे व्रत महिला करतात. अनेक राज्यांमध्ये याला तीज असे देखील म्हटले जाते. हे व्रत भगवान शंकराला आणि माता पार्वतीला समर्पित आहे. हे व्रत करूनच माता पार्वतीने आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकरांना मिळवले होते. ६ सप्टेंबर रोजी साजरी होणारी हरितालिका पूजा ही मंदिरात किंवा अगदी घरी देखील केली जाते. आज काल हरितालिका पूजेसाठी मातीच्या मूर्ती देखील बाजारात उपलब्ध होतात. चला तर जाणून घेऊया या पूजेचा शुभ मुहूर्त,
साहित्य आणि पूजेची मांडणी याबद्दल.
शुक्रवार ६ सप्टेंबर २०२४ रोजी आपण हरितालिकेचे हे फलप्राप्ती देणारे व्रत करणार आहोत. हरितालिका वर करताना ते निर्जला करायचे असते असे सांगितले जाते. या व्रतामध्ये अन्न-पाणी न घेता हे व्रत करतात. पुराणानुसार हे व्रत देवी पार्वतीने भगवान शिवाला वर म्हणून प्राप्त करण्यासाठी केले होते. या दिवशी पूजेसोबतच व्रताची कथाही ऐकली जाते. मान्यतेनुसार, विवाहित महिला या दिवशी सोळा श्रृंगार करतात आणि भगवान शिव आणि देवी पार्वतीची विधिवत पूजा करतात.
हरितालिका पूजन मुहूर्त
यंदा हरतालिका व्रत ६ सप्टेंबर रोजी साजरे केले जाणार आहे. गुरुवार ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२:२२ वाजता तृतीया तिथी सुरू होणार असून, ६ सप्टेंबर रोजी पहाटे ३:१ वाजता समाप्त होईल. ६ सप्टेंबर रोजी सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार या दिवशी हे व्रत आणि उपवास केला जाईल. तर पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी ६.०१ ते ८.३२ पर्यंत असेल.
हरितालिका पूजा साहित्य
वाळू, बेल पत्र, शमी पत्र, आंब्याची पाने, पांढरी फुले, वस्त्र, तसेच सोळा झाडांची प्रत्येकी १६ पाने. यात बेल, आघाडा, मधुमालती, दूर्वा, चाफा, कण्हेर, बोर, रुई, तुळस, आंबा, डाळिंब, धोतरा, जाई, मरवा, बकुळ, अशोक (यात जे उपलब्ध होतील ती सर्व पाने घ्यावी नसतील तर अक्षता वाहाव्या ) पुजेसाठी फुले, तसेच सौभाग्याचे साहित्य म्हणजेच बांगड्या, काजळ, कुंकू, चंदन, तूप, तेल, कापूर, साखर, दुध, मध, दही म्हणजेच पंचामृत, चौरंग, रांगोळी, तांदूळ, पाण्याचा कलश, ताम्हण, पळी, पंचपात्र, तसराळ, आसन, निरांजन, शंख, घंटा, समई, कापूर आरती, हळदकुंकू, अष्टगंध, गुलाल, बुक्का, चंदन, अक्षता, उदबत्ती, कापूर, तुपाच्या आणि तेलाच्या वाती, अत्तरफाया, विड्याची पाने, सुपार्या, बदाम, खारका, नारळ, फळे, खडीसाखर, गूळखोबरे, पंचामृत, कापसाचे वस्त्र, कोरे वस्त्र, फणी,आरसा इत्यादी
हरितालिका पूजा विधी
हरितालिका पूजेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कोरे वस्त्रे परिधान करावे. सर्व सौभाग्यचे दागिने घालून साज शृंगार करावा. जिथे पूजा करायची आहे, तिथे झाडू मारावा. पाण्याने ती जागा स्वच्छ पुसावी किंवा सडा मारावा. रांगोळी काढावी. नंतर चौरंग ठेवावा. त्याखाली देखील रांगोळी काढावी. जिथे पूजा करायची तिथे आंब्याचे तोरण लावावे किंवा आंब्याच्या पानांची डहाळी लावली तरी चालेल.
नंतर चौरंगाच्या चारी बाजुंना केळीचे खांब बांधावे. चौरंगावर वाळूने शिवलिंग तयार करावे. डावीकडे थोड्या अक्षता ठेऊन त्यावर गणपती म्हणून सुपारीची स्थापना करावी. नंतर चौरंगाच्या चारही बाजुंना माता पार्वती आणि त्यांच्या सखी वाळूने काढाव्या. आता पूजेला आरंभ करायचा. सर्वप्रथम श्रीगणेशाची पूजा करावी. त्यानंतर महादेव आणि सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी.
भगवान शिवासह माता पार्वतीला सर्व सौभाग्यद्रव्ये वाहावी. त्यानंतर पत्री आणि इतर पूजा देखील देवाला मनोभावे अर्पण करावी. शेवटी आरती करत हरितालिकेची कहाणी वाचावी. रात्री पुन्हा आरती करावी आणि जागरण करत भजनासह विविध खेळ खेळावे. दुसऱ्या दिवशी उत्तरपूजा करून संपूर्ण पूजा विसर्जित करावी. लक्षात ठेवा ही पूजा किंवा हे व्रत काहीही न खाता पिता करावे. शक्य नसल्यास फळं खावी.
हरितालिका पूजा करताना सौभाग्याच्या वस्तू पूजेत विसरू नये. या दिवशी उपवास करताना अन्न ग्रहण करू नका. निर्जळी उपवास करणे शक्य नसेल तर फक्त फळे खा. हरितालिकेचे व्रत करणाऱ्या महिलांनी या दिवशी काळा रंग टाळावा. काळ्या बांगड्या आणि कपडे घालणे टाळावे.
======
हे देखील वाचा : हरितालिका पूजेची संपूर्ण माहिती आणि कथा
======
हरितालिका आरती
जय देवी हरितालिके। सखी पार्वती अंबिके। आरती ओवाळीतें।
ज्ञानदीपकळिके।। धृ.।।
हरअर्धांगी वससी। जासी यज्ञा माहेरासी।
तेथें अपमान पावसी। यज्ञकुंडींत गुप्त होसी। जय. ।।1।।
रिघसी हिमाद्रीच्या पोटी। कन्या होसी तू गोमटी।
उग्र तपश्चर्या मोठी। आचरसी उठाउठी ।।जय. ।।2।।
तापपंचाग्निसाधनें। धूम्रपानें अधोवदनें।
केली बहु उपोषणें। शंभु भ्रताराकारणें। ।।जय.।।3।।
लीला दाखविसी दृष्टी। हें व्रत करिसी लोकांसाठी।
पुन्हां वरिसी धूर्जटी। मज रक्षावें संकटीं।। जय.।। 4।।
काय वर्ण तव गुण। अल्पमति नारायण।
मातें दाखवीं चरण। चुकवावें जन्म मरण। जय. देवी।।5।।