भाद्रपद महिना लागला की सगळ्यांना चाहूल लागते ती गणपती बाप्पाच्या आगमनाची. मात्र बाप्पांच्या आधी येणार पहिला आणि महत्वाचा सण म्हणजे हरतालिका. हिंदू धर्मात विवाहित महिलांसाठी हरतालिका व्रताचे विशेष महत्व आहे. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला हरितालिका व्रत साजरे केले जाते. काही भागात या व्रताला हरतालिका तीज असेही म्हटले जाते.
हरतालिकेच्या दिवशी विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. तर अविवाहित तरुणी मनासारखा आणि योग्य जोडीदार मिळावा यासाठी हे व्रत करतात. यादिवशी महिला आणि तरुणी रात्रभर जागरण करत झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ खेळतात. हरतालिका तृतीया फक्त महाराष्ट्रात नाही तर इतरही अनेक भागात साजरी केली जाते. नेपाळच्या टेकडी प्रदेशात, उत्तर भारताच्या बहुतांश भागात जसे की बिहार, झारखंड, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड, सिक्कीम आणि राजस्थानमध्ये साजरी केली जाते.
यावर्षी हरतालिका भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीया तिथी अर्थात ५ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजून २१ मिनिटांनी सुरू होणार असून ही तिथी ६ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून १ मिनिटापर्यंत असेल. उगवत्या सूर्याने पाहिलेल्या तिथीनुसार, शुक्रवारी, ६ सप्टेंबर २०२४ रोजी हे व्रत साजरे केले जाणार आहे.
हरतालिका व्रत अविवाहित आणि विवाहित स्त्रिया दोघेही ठेऊ शकतात. वट सावित्रीच्या व्रताप्रमाणेच हरतालिकेचे व्रत देखील निर्जल ठेवले जाते. पौराणिक मान्यतेनुसार माता पार्वती यांनी भगवान शिव यांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी हे व्रत केले होते. हे व्रत करताना माता पार्वती यांनी केवळ झाडाची पाने चाटून व्रत पूर्ण केले होते. हरतालिका व्रत केल्याने महिलांना वैवाहिक सुख मिळते अशीही मान्यता आहे. हे व्रत माता पार्वती यांच्यासोबत त्यांच्या सखींनी देखील केले होते. त्यामुळे या व्रतामध्ये त्यांच्या सखीची देखील पूजा केली जाते.
हरतालिका व्रत कसे करावे?
या दिवशी सकाळी मुली आणि सुवासिनींनी लवकर उठावे. सुवासिक तेल लावून स्नान करावे. स्नान केल्यानंतर स्वच्छ कोरे वस्त्र नेसावे. सुवासिनींचा संपूर्ण साज शृंगार करावा. त्यानंतर स्वच्छ अशा जागेवर स्वस्तिक काढून त्यावर चौरंग ठेवावे. या चौरंगासमोर रांगोळी काढावी. त्यानंतर चौरंगाला चारही बाजूंनी केळीच्या खांबांनी सुशोभित करावे. या चौरंगावर वाळू आणून पार्वती आणि सखीसह शिवलिंग स्थापित करावे. उजव्या बाजूस तांदळाच्या एका ढिगावरील सुपारीवर किंवा नारळावर गणपती मांडावा. समोर पाच विडे मांडून तेथे सुपारी, खारीक, बदाम, नाणे, फळ ठेवावे.
सर्वप्रथम स्वत:ला हळद कुंकु लावून देवासमोर विडे ठेवावे. अक्षता, हळद कुंकु वाहून मनोभावे नमस्कार करावा. घरातील वडीलधार्या मंडळींना नमस्कार करून नंतर पूजा प्रारंभ करावी. पूजा करण्यापूर्वी दिव्यांची पूजाही करावी. सर्वप्रथम गपपतीची आणि नंतर महादेव, सखी-पार्वतीची षोडशोपचारे पूजा करावी. पूजेसाठी घेतलेले साहित्य विधीपूर्वक देवाला अर्पित करावे.
शिवायै शिवरूपायै मंङगलायै महेश्वरी
शिवे सर्वार्थऽदे नित्यं शिवरूपे नमोऽस्तुते।
नमस्ते सर्वरूपिण्यै जगद्धात्र्यै नमो नम:
संसारभयसन्यस्तां पाहि मां सिंहवाहिनी। हा मंत्र म्हणत ही सर्व पूजा करावी.
हरतालिकेची पूजा केल्यावर धूप-दीप, नैवेद्य दाखवून पत्री वाहावी. हरतालिकेच्या पूजेत बेल, आघाडा , मधुमालती , दूर्वा , चाफा , कण्हेर , बोर , रुई , तुळस , आंबा , डाळिंब , धोतरा , जाई , मरवा , बकुळ, अशोकाची पाने पत्री म्हणून वाहावी. नंतर मनोभावे प्रार्थना करावी. त्यानंतर कथा वाचावी. कुमारिकांनी इच्छित वर मिळावा तर सुवासिनीने अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करावी. “गौरी मे प्रीयतां नित्यं अघनाशाय मंगला। सौभाग्यायास्तु ललिता भवानी सर्वसिद्धये ।।” या मंत्राचा जप करावा.
दिवसभर कडक उपवास करावा. शक्य नसल्यास फलाहार करावा. या दिवशी आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. याशिवाय अनेक ठिकाणी तिखट आणि मीठ देखील या दिवशी खात नाही. संध्याकाळी पुन्हा पूजेच्या ठिकाणी जाऊन आरती करावी. नंतर रात्रभर झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळत जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून, मध्यरात्री आरती करून बारानंतर रूईच्या पानावर दही घालून ते चाटावे. दुसर्या दिवशी उत्तरपूजा करून तयार केलेली लिंगे विसर्जित करावी.
हरितालिका कथा
एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर बसली होती. पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज सर्व व्रतात चांगलं असं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असलं तर मला सांगा. मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले हेही मला सांगा. तेव्हा शंकर म्हणाले, जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. ते तुला सांगतो. तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्यानं तू मला प्राप्त झालीस, ते व्रत ऐक.
हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं. ते पूर्वी तू कसं केलंस ते मी तुला आता सांगतो. तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस. चौसष्ट वर्षं तर झाडाची पिकली पानं खाऊन होतीस. थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दु:ख सहन केलीस. हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दु:ख झालं व अशी कन्या कोणाला द्यावी? अशी त्याला चिंता पडली. इतक्यात तिथं नारदमुनी आले. हिमालयानं त्यांची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं. तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहेत ती विष्णूला द्यावी, तो तिचा योग्य नवरा आहे. त्यांनीच मला तुजकडे मागणी करण्यास पाठविलं आहे म्हणून इथं मी आलो आहे. हिमालयाला मोठा आनंद झाला. त्यांने ही गोष्ट कबूल केली.
नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले. नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली, ती गोष्ट तुला रुचली नाही. तू रागावलीस असं पाहून तुझ्या सखीनं रागावण्याचं कारण विचारलं, तेव्हा तू सांगितलंस, महादेवावाचून मला दुसरा पती करायचा नाही, असा माझा निश्चय आहे, असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे, ह्याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं. तिथं गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली. जवळच एक गुहा आढळली. त्या गुहेत जाऊन तू उपास केलास. तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापिलस. त्याची पूजा केलीस. तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतिये चा होता. रात्री जागरण केलंस. त्या पुण्यानं इथलं माझं आसन हाललं. नंतर मी तिथं आलो, तुला दर्शन दिलं. आणि वर मागण्यास सांगितलं तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हावं, याशिवाय दुसरी इच्छा नाही! नंतर ती गोष्ट मी मान्य केली. मी गुप्त झालो.
======
हे देखील वाचा : गणपती अथर्वशीर्षाचे महत्व, फायदे आणि नियम
======
पुढे दुसर्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस. मैत्रिणीसह त्याचं पारणं केलंस. इतक्यात तुझा बाप तिथं आला: त्यांन तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं. मग तू सर्व हकीकत सांगितलीस. पुढं त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं. तुला घेऊन घरी गेला. मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली. अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली. याला हरतालिका व्रत असं म्हणतात. याचा विधी असा आहे.
ज्या ठिकाणी हे व्रत करावयाचं असेल, त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं. पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं. षोडशोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी. नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावं. या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो. साता जन्मांचं पातक नाहीसं होतं. राज्य मिळतं. स्त्रियांचं सौभाग्य वाढतं ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर सात जन्म वंध्या होतात. दळिद्रं येतं व पुत्रशोक होतो. कहाणी ऐकल्यावर सुवासिनींना यथाशक्ति वाण द्यावं. दुसरे दिवशी उत्तरपूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं. ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.