भारताची आर्थिक तर महाराष्ट्राची राजधानी मुंबई महाराष्ट्राला सहजासहजी मिळालेली नाही. तर त्यासाठी १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. महाराष्ट्रीय माणसाला सर्वात मोठी भिती म्हणजे मुंबई केंद्रशासित होण्याची. महानगरपालिका निवडणूक आली की अशी आवई उठतेच. पण तसं होतचं असे नाही. पण तुम्हाला किती जणांना माहित आहे की मुंबई ही काही काळासाठी केंद्रशासित होती. त्यामुळे संयुक्त महाराष्ट्र लढा आणखी धारधार झाला. आणि केंद्राला एक पाऊल मागे टाकत मराठी भाषिकांचे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करावी लागली होती. कधी झाली होती मुंबई केंद्रशासित, तेव्हा महाराष्ट्र राज्याचे काय स्वरूप होते? जाणून घेऊयात. (Mumbai)
१ मे १९६० ला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. त्यासाठी १०५ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती. स्वातंत्र्यानंतर मराठी भाषिकांची संयुक्त महाराष्ट्राची मागणी जोर धरु लागली होती. १९५२ साली भाषिक आधारावर तेलुगू भाषिकांचे आंध्र प्रदेशही झाले होते. पण प्रश्न मुंबईचा आणि महाराष्ट्राचा होता. त्यामुळे राज्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ उभी राहिली. काँग्रेस सोडून इतर पक्षांनी संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली होती आणि निवडणुकीची तयारीही केली होती. (Mumbai)
विसाव्या शतकातील महाराष्ट्र या पुस्तकात य.दि. फडके यांनी संयुक्त महाराष्ट्रावर विस्तृत विवेचन केले आहे. विसाव्या शतकातील महाराष्ट्र खंड सातवा मधील रक्तरंजित जानेवारी १९५६ या प्रकरणात फडके यांनी म्हटले आहे की, १६ जानेवारीस मुंबई केंद्रशासित करण्याची नेहरुंनी आकाशवाणीच्या केंद्रावरून घोषणा केली. त्यामुळे आगीत तेल ओतल्यासारखे झाले. या निर्णयाच्या निषेधार्थ मुंबई शहरात संप, हरताळ, निदर्शने झाली. शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक नेत्यांना ताब्यात घेतलं गेलं. तर लाठीहल्ले करून अश्रुधूर वापरून आणि गोळीबार करून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा मोरारजी देसाईंनी प्रयत्न केला. गोळीबाराची चौकशी करण्याची मागणी फेटाळून नेहरुंनी मोराजींना पाठीशी घातलं. आपल्यावर अन्याय केला जात आहे ही सर्वसामान्य मराठीभाषकाची भावना अधिकच दृढ झाली. (Mumbai)
======
हे देखील वाचा : मुंबई रेल्वे स्थानकांच्या नावामागची कथा
======
मग प्रश्न उरतो की मुंबई किती काळासाठी केंद्रशासित होती? मुंबई केंद्रशासित केल्यामुळे जनक्षोभ उसळला होता. त्यामुळे केंद्र सरकारने यावर काही हालचाली करायला सुरुवात केली. संयुक्त महाराष्ट्र देण्याचा सरकारचा निर्णय नव्हता. तेव्हा केंद्र सरकारकडे एक उपाय होता तो म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातचे विशाल द्वैभाषिक करणे आणि त्याची राजधानी मुंबई करणे. फडकेंच्याच विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या आठव्या खंडात यात म्हटले आहे की ७ ऑगस्ट १९५६ ला गृहमंत्री वल्लभ पंत यांनी लोकसभेत विशाल द्वैभाषिक मुंबई राज्याच्या निर्मितीची उपसूचना मांडली. तेव्हा २४१ विरुद्ध ४० मतांनी हा ठराव पारित करण्यात आला. म्हणजेत जानेवारी ते ऑगस्ट असे आठ महिने मुंबई ही केंद्रशासित होती. पुढे १९५७ साली विधानसभेच्या निवडणुका लागल्या. त्यात काँग्रेसने कसेबसे यश मिळवले. खुद्द यशवंतराव चव्हाण यांचा पराभव होता होता राहिला. त्यामुळे केंद्राला संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करावी लागली. १ मे १९६० रोजी यशवंतराव चव्हाण यांनी संयुक्त महाराष्ट्राचे मंगल कलश राज्यात आणले. आणि मराठी भाषिकांचे एक स्वप्न पूर्ण झाले. (Mumbai)