पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने २३ जणांची गोळ्या झाडून केल्याची बातमी आल्यापाठोपाठ आता या बलुच आर्मीनं १३० पाकिस्तानी सैनिकांनाही ठार केल्याचा दावा केल्यानं खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तानी सैनिकांकडून बलुचिस्तान प्रांतात अत्याचार होत आहेत. त्याविरोधात उभ्या राहिलेल्या बलुचिस्तान लिबरेशन आर्मीनं आता रक्तरंजित इतिहास लिहायला सुरुवात केली आहे. बलुच नागिरकांनी हाती शस्त्र घेत, आपला मोर्चा पाकिस्तानी लष्करावर वळवला आहे. त्यामुळे या भागात गृहयुद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बलुच आर्मीनं पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात ‘ऑपरेशन हेअरऑफ’ सुरु केले आहे. त्यातून बलुचिस्तानमधील १२ वेगवेगळ्या ठिकाणी हल्ले करण्यात आले. या सर्व ठिकाणी पाकिस्तानी लष्कराच्या छावण्या आणि पोलिस चौक्या होत्या. आता ही सर्व ठिकाणं उदधवस्त झाली असून पाकिस्तानी लष्कराचे वाईट दिवस सुरु झाल्याचा दावा बलुच आर्मीकडून करण्यात आला आहे. (Balochistan Liberation Army)
पाकिस्तानचा एक प्रांत असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक वर्षापासून पाकिस्तानी लष्कराच्या अत्याचाराविरोधात आवाज उठवण्यात येत आहे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत आहे. हा सर्व भाग नैसर्गिक साधनांनी संपन्न आहे. पण या भागातील खनिज संपत्तीवर हक्क गाजवणा-या पाकिस्ताननं या भागाचा कुठलाही विकास केलेला नाही. बलुचिस्तानचा हा भाग भौगोलिकदृष्ट्या ४४ टक्के आहे. मात्र विकासाच्या नावानं या भागात एकही कारखाना किंवा विद्यापीठ नाही. बलुच समाजातील नागरिकांची या भागात मोठ्या संख्येनं वस्ती आहे. त्यांनी आपल्याला पाकिस्तानपासून स्वतंत्र करावे अशी मागणी सुरुवातीपासून ठेवली होती. मात्र वायू, खनिजे आणि इतर नैसर्गिक संसाधनांच्या बाबतीत बलुचिस्तान हा संपन्न आहे. त्यामुळे पाकिस्तान हा भाग आपल्यापासून कधीही वेगळा करणार नाही, अशी खात्री बलुची समाजाला झाल्यामुळे या भागात पाकिस्तानविरोधी उद्रेक वाढू लागला. त्यातूनच बलुचिस्तान आर्मीची स्थापना झाली. (Balochistan Liberation Army)
या सर्वात चीनचा सहभागही आता आला आहे. चीन-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरचा बराचसा टप्पा याच बलुचिस्तानमधून जात आहे. चीननं या कामासाठी भरघोस आर्थिक मदत पाकिस्तानला दिली आहे. या मदतीतूनही बलुचिस्तानमध्ये विकास योजना राबवण्यात आल्या नाहीत. परिणामी बलुचिस्तान आर्मीनं चीनी मदतीचाही विरोध करत चीनी अभियंत्यांवरही आपला निशाणा ठेवला आहे. याशिवाय कॅनेडियन खाण कंपनी, बॅरिक गोल्डची बलुचिस्तानमधील रेको डिक नावाच्या खाणीत ५० टक्के भागीदारी आहे. तांबे आणि सोन्यासाठी जगातील सर्वात मोठ्या अविकसित ठिकाणांपैकी एक म्हणूनही या भागाचा उल्लेख होत आहे. या सर्वांचा फायदा पाकिस्तान घेत असला तरी बलुच लोकांची यात फक्त पिळवणूक होत आहे. खनिजखाणीत काम करतांना हजारो बलुच नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
अशा कामगारांची नोंदच नसल्यामुळे त्यांच्या घरच्यांना योग्य मोबदलाही देण्यात येत नाही. मुळात या भागात खनिज संशोधनासंदर्भात शिक्षण संस्था सुरु करण्याची मागणी आहे. मात्र त्या मागणीकडेही पाकिस्तान गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करित आहे. जे बलुच नागरिक या सर्वांला विरोध करतात, त्यांच्यावर पाकिस्तानी लष्कर अत्याचार करते. अनेक बलुच नागरिक बेपत्ता आहेत. ते पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, की त्यांचा मृत्यू झाला आहे, याची माहितीही त्यांच्या कुटुंबियांना नाही. बलुचिस्तानचा इतिहास अतिरेकी आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाने भरलेला आहे. याच सर्व असंतोषातून बलुचिस्तान लिबरेशन आर्मीची स्थापना २००० साली झाली. अर्थात त्यामागे स्वतंत्र बलुचिस्तान चळवळ आहे. २००४ पासून या आर्मीनं बलुचिस्तानला पाकिस्तानपासून वेगळे करण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध हिंसक संघर्ष सुरू केला. (Balochistan Liberation Army)
======
हे देखील वाचा : अजमेर बलात्कार प्रकरण !
======
त्या कारवाया पहाता २००६ मध्ये बलुचिस्तान लिबरेशन आर्मीला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले, त्यानंतर या गटाने सुरक्षा कर्मचाऱ्यांवर वारंवार हल्ले केले. यातून पाकिस्तानी लष्कर आणि बलुच आर्मीमधील संघर्ष वाढला. याच बलुच आर्मीचा नेता ब्रह्मदाघ खान बुगती याने बलुचिस्तानमध्ये राहणाऱ्या गैर-बलूचींना ठार मारण्याचे आवाहन केले आहे. त्यापासून पंजाबी रहिवाशांवर हल्ले सुरु झाले आहेत. आत्तापर्यंत यात ५०० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मात्र लष्करातील १०० हून अधिक जवानांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. या हल्ल्यानं बलुच आर्मीचा उत्साह वाढला आहे. तर पाकिस्तानी सरकारनं अशा दहशतवादी हल्ल्यांना सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. असे असले तरी या भागातील बलुच आर्मीचे वर्चस्व पहाता पाकिस्तान सरकारच्या हातून बलुचिस्तान भाग निसटला असल्याचे तज्ञांचे मत आहे. (Balochistan Liberation Army)
सई बने