आपल्याकडे सुरुवातीपासूनच नाग, साप यांच्याबद्दल खूपच भीती पाहायला मिळते. यांच्या चावण्यामुळे शरीरात विष पासून मृत्यू होतो. हीच एक मोठी भीती साप आणि नागाबद्दल लोकांच्या मनात असते. मात्र सगळेच साप आणि नाग विषारी असतात असे नाही. आज साप आणि नाग यांच्याबद्दल आपल्याकडे काहीही संकल्पना, विषय, समज, गैरसमज आदी काहीही असले तरी आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये साप आणि नाग यांना अनन्यसाधारण महत्व दिले आहे. किंबहुना यांना देवत्व प्रदान करण्यात आले आहे.
भगवान शंकरानी धारण केलेला नाग हा पूजनीय आहे. तसेच गणपती बाप्पाच्या पोटाला असलेला साप देखील पूजनीय आहे, साक्षात भगवान विष्णूची शय्या म्हणूनही नागाला स्थान आहे. त्यामुळेच आपल्याकडे नाग, किंवा साप यांना कधीही मारले जात नाही. त्यांना सुरक्षित ठिकाणी सोडले जाते. भारतामध्ये तर नाग आणि सापांची मंदिरं देखील पाहायला मिळतात. नागपंचमीच्या दिवशी अनंत म्हणजेच शेषनाग, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या ८ नागांची पूजा केली जाते.
याशिवाय याच नाग आणि सापांची पूजा करण्यासाठी एक सण देखील साजरा केला जातो. हा सण म्हणजे ‘नागपंचमी’. नागपंचमी आपण दरवर्षी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी साजरी करतो. ही नागपंचमी उद्या अर्थात ९ ऑगस्ट रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी नागोबाची यथासांग, मनोभावे पूजा करत त्याची सेवा केली जाते. जो कोणी या दिवशी नागदेवतेची पूजा करतो त्याची सापाबद्दलची भीती निघून जाते. कुंडलीतील कालसर्प दोष दूर करण्यासाठी नागदेवतेची पूजा केली जाते. नागपंचमीच्या दिवशी महादेवाची पूजा केली जाते.
भारत हा कृषिप्रधा देश आहे. आपल्याकडे अधिकतर लोकसंख्येच्या उपजीविकेचे साधन शेती आहे. त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी भारतात अनेक ठिकाणी शेतीच्या अवजारांची पूजा करण्याचीही प्रथा आहे. तर नागाला शेतकऱ्यांचा मित्र म्हणून देखील पाहिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा सण खूपच आवश्यक असतो. या दिवशी नागांची सुरक्षा करण्याचा संकल्प केला जातो.
नाग या प्राण्याबद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करण्यासाठी हा सण साजरा केला जाण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवतेची पूजा केली जाते. यादिवशी स्त्रिया शुचिर्भूत होऊन नागदेवताची पूजा करतात. वारुळाजवळ जात किंवा पाटावर हळद-चंदनाने नाग-नागीण आणि त्यांच्या पिल्लांची चित्रे काढून त्याला दुध, लाह्या, आघाडा, दुर्वा, फुलं वाहून त्यांची यथासांग पूजा केली जाते. नागदेवतेला या दिवशी नैवैद्य म्ह्णून दुध, साखर, उकड काढून केलेली पुरणाची दिंड दाखवली जाते. ही पूजा करताना ‘नमोsस्तु सर्पेभ्यो ये के च पृथ्वी मनु!’ ये अंतरिक्षे ये दिवि तेभ्य: सर्पेभ्यो नम:! हा मंत्रोच्चार करावा.
नागपंचमीसंदर्भात आपण एक गोष्ट ऐकतच मोठे झालेलो आहोत. ती म्हणजे या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवून काही भाजू नये. कोणाची हिंसा करू नये, जमीन खणू नये. खणू नये आदी अनेक गोष्टी करण्यास या दिवशी मनाई असते. आजही ही परंपरा अनेक ठिकाणी पाळली जाते. यासाठीच नागपंचमीला उकडीचे पदार्थ खाल्ले जातात.
नाग पंचमीच्या दोन कथा आहेत.
कथा १
एकदा एक शेतकरी जमीन नांगरत असताना त्याच्या नांगराचा फाळ नागाच्या बिळात घुसला. त्यामुळे त्या बिळातील नागाची पिल्ले चिरडून मेली. बाहेरून आलेल्या नागिणीला आपली पिल्ले मेल्याचे पाहून खूप राग आला. त्या रागाच्या भरात तिने त्या शेतकऱ्याला त्याच्या बायकोमुलांसह दंश करून मारले. त्या शेतकऱ्याची एक लग्न झालेली मुलगी होती. शेवटी तिलादेखील दंश करून मारण्यासाठी नागीण तिच्या गावी तिच्या घरी पोहोचली. त्यावेळी ती मुलगी पाटावर चंदनगंधाने काढलेल्या नागाच्या चित्राची पूजा करण्यात दंग होती. मनोभावे पूजा करून तिने दूधलाह्यांचा नैवेद्य पूजलेल्या चित्रातील नागाला दाखविला. तिची ती भक्ती पाहून नागिणीचा राग शांत झाला. ती स्वतः ते दूध प्यायली. तिने त्या मुलीवर प्रसन्न होऊन तिच्या आईवडिलांना आणि भावंडांना पुन्हा जिवंत केले.
कथा २
ऐका नागोबा देवा, तुमची कहाणी, एक नगर होते. तिथे एक ब्राह्मण होता. त्या ब्राह्मणाला पाच सात सुना होता. चातुर्मासात श्रावणमास आला आहे. नागपंचमीचा दिवस आहे. कोणी आपल्या आजोळी, कोणी पंजोळी, कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या आहेत. सर्वांत धाकटी सून होती. तिच्या माहेरचे कोणीच नव्हते. तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देव आहे असं समजून नागोबा देव मला माहेराहून न्यायला येईल. असं म्हणू लागली.
शेषभगवानास तिची दया आली. त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला. ब्राह्मण विचारात पडला. हा इतके दिवस कुठं लपून राहिला व आताच कोठून आला. पुढं त्यानं मुलीला विचारले तिनंही हाच माझा मामा असे सांगितले. ब्राह्मणाने तिची रवानगी कली. त्या वेषधारी मामानं वारूळात नेले. खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायकामुलांना ताकीद दिली की, हिला कोणी चावू नका!
एके दिवशी नागाची नागीण बाळंत होऊ लागली. तेव्हा तिला हातात दिवा धरायला सांगितला. पुढं ती व्याली. तिची पिलं वळवळ करी लागली. ही मुलगी भिऊन गेली. हातातला दिवा खाली पडला. पोरांची शेपटं भाजली. नागीण रागावली. सर्व हकीकत नवर्याला सांगितली. तो म्हणाला, तिला लौकरच सासरी पोचवू. पुढं ती पूर्ववत् आनंदानं वागू लागली. ऐके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली. आपण मनुष्यदेह धारण करून, तिला सासरी पावती केली.
नागाची पोरं मोठी झाली. आपल्या आईपाशी चौकशी केली, आमची शेपटं कशान तुटली? तिनं मुलीची गोष्ट सांगितली. त्यांना फार राग आला. हिचा सूड घ्यावा म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्रं काढली, त्यांची पूजा केली, जवळ नागाणे, लाह्या, दूध वगैरे ठेवलं. उकडीचा नैवेद्य दाखवला. हा सर्व प्रकार नागांची पिलं पहात आहेत. सरतेशेवटी तिनं देवाची प्रार्थना केली, जय नागोबा देवा, जिथं माझे भाऊ लांडोबा, पुंडोबा असतील तिथं खुशाल असोत, असं म्हणून नमस्कार केला. इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला. मनात हिच्याविषयी दया आली. पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली, दूध, पाणी ठेवतात त्यात पहाटेस एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले. दुसर्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला. तर जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हां आम्हां होवो. ही साठा उत्तराची कहाणी, पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.