Home » नागचंदेश्वराचे महात्म्य !

नागचंदेश्वराचे महात्म्य !

by Team Gajawaja
0 comment
Temple of Nagchandreshwar in Ujjain
Share

हिंदू धर्मात सर्वात पवित्र महिना म्हणून श्रावण महिना मानला जातो. याच श्रावण महिन्यात अनेक सण आणि उत्सव येतात. त्यापैकी पहिला येणारा सण म्हणजे नागपंचमी. हिंदू धर्मात शतकानुशतके सापांची पूजा करण्यात येते. भारतात सापांची अनेक मंदिरे आहेत. त्यापैकी उज्जैनमधील नागचंद्रेश्वराचे मंदिर हे अतिप्राचिन आहे. उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या या मंदिराबाबत अनेक गुढकथा आहेत. या नागचंद्रेश्वर मंदिराची खास गोष्ट म्हणजे हे मंदिर वर्षातून फक्त नागपंचमीला दर्शनासाठी उघडले जाते. यावर्षी नागपंचमी ९ ऑगस्टला असल्यामुळे नागचंद्रेश्वराचे दरवाजे ८ ऑगस्टच्या रात्री १२ वाजता उघडले जातील. ९ ऑगस्टच्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत या मंदिरातील महादेवाचे आणि नागराज तक्षकाचे दर्शन घेता येईल. वर्षातून एकदा नागपंचमीला मंदिराचे दरवाजे २४ तास उघडले जातात. यामुळेच या मंदिराला बघण्यासाठी आणि नागदेवतेचे दर्शन घेण्यासाठी २४ तासापासून भाविक रांग लावतात. या मंदिरात प्रत्यक्ष नागराज तक्षक रहात असल्याचे सांगितले जाते. वर्षातून फक्त एकदाच उघडणा-या नागचंद्रेश्वर मंदिराबाबत अनेक गुढ कथाही आहेत. (Temple of Nagchandreshwar in Ujjain)

प्रत्यक्ष नागराज तक्षक रहात असललेल्या नागचंद्रेश्वर मंदिरात ११व्या शतकातील अतिशय दुर्मिळ आणि अप्रतिम मूर्ती आहे. संपूर्ण जगात हे एकमेव मंदिर आहे, ज्यामध्ये भगवान विष्णूऐवजी भगवान शंकर नागाच्या पलंगावर विराजमान आहेत. मंदिरात स्थापित केलेल्या प्राचीन मूर्तीमध्ये भगवान गणेश आणि माता पार्वती यांच्यासह दहा तोंडी नाग पलंगावर विराजमान आहेत. शिवशंभूंच्या गळ्यात आणि हाताला भुजंग गुंडाळले आहे. या मूर्तीमध्ये भगवान शिव त्यांचे दोन पुत्र गणेश आणि कार्तिक त्यांच्यासोबत विराजमान आहेत. मूर्तीच्या वरच्या बाजूला सूर्य आणि चंद्र देखील आहेत. भगवान शंकराचे सर्व कुटुंब या मुर्तीमध्ये असून फक्त नागपंचमीच्या दिवशी या शिवपरिवाराचे दर्शन एकत्रीतरित्या भक्तांना घेता येते. ही प्राचीन मुर्ती नेपाळहून उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात आणल्याचे सांगितले जाते. (Temple of Nagchandreshwar in Ujjain)

उज्जैनच्या प्रसिद्ध महाकाल मंदिराच्या तिस-या मजल्यावर असलेल्या या नागचंद्रेश्वर मंदिराबाबत अनेक कथा सांगितल्या जातात. येथे प्रत्यक्ष सर्पराज तक्षकाचा वावर असल्याची भावना भक्तांची आहे. शिवशंकराला प्रसन्न करण्यासाठी सर्प राजा तक्षक याने कठोर तपश्चर्या केली होती. भगवान शंकर तक्षकावर प्रसन्न झाले. त्यांनी राजा तक्षक याला अमरत्वाचे वरदान दिले. तेव्हापासून तक्षक राजा भगवान शंकरासह राहू लागला. भगवान शंकराच्या सेवेत व्यस्त असलेल्या राजा तक्षकाला कोणताही त्रास होऊ नये, म्हणून त्याचे दर्शन फक्त एकदाच घेण्याची परंपरा चालू झाली. राजा तक्षकाच्या सन्मानार्थ वर्षाचे उर्वरित दिवस नागचंद्रेश्वराचे मंदिर बंद असते. या मंदिरात राजा तक्षकाचे दर्शन घेतल्यावर व्यक्ती कोणत्याही प्रकारच्या सर्प दोषापासून मुक्त होते, असे मानण्यात येते. (Temple of Nagchandreshwar in Ujjain)

==================

हे देखील वाचा : बहिण भावंडाचे भुरेश्वर महादेव मंदिर

================

त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी उघडणाऱ्या या मंदिराबाहेर भाविकांची मंदिर उघडण्याआधीच २४ तास रांग लागलेली असते. नागचंद्रेश्वराच्या मंदिराला प्राचीन वारसा आहे. हे मंदिर परमार राजा भोज याने १०५० च्या सुमारास बांधले होते. यानंतर सिंधिया घराण्याचे महाराज राणोजी सिंधिया यांनी १७३२ मध्ये महाकाल मंदिराचा जीर्णोद्धार केला, तेव्हा या मंदिराचाही जीर्णोद्धार झाला. नागचंद्रेश्वर मंदिराची पूजा आणि व्यवस्था महानिर्वाणी आखाड्यातील संन्यासी करतात. नागपंचमीच्या दिवशी नागचंद्रेश्वर मंदिराचे दरवाजे मध्यरात्री १२ वाजता उघडतील आणि परंपरेनुसार पंचायती महानिर्वाणी आखाड्याचे महंत प्रथम दर्शन करतील.

त्यानंतर नागचंद्रेश्वर महादेवाची पूजा करण्यात येईल. पूजेनंतर मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात येतील. २४ तासांच्या अखंड दर्शनानंतर रात्री १२.३० वाजता मंदिराचे दरवाजे एक वर्षासाठी पुन्हा बंद करण्यात येतील. यावेळीही महानिर्वाण आखाड्याचे महंत भगवान नागचंद्रेश्वर महादेवाची पूजा करतात, आरती होते. त्यानंतर या प्राचीन मंदिराचे दरवाजे मंत्रघोषात बंद करण्यात येतात. नागचंदेश्वराचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक उज्जैनला येतात. या लाखो भाविकांना नागचंद्रेश्वर महादेवाचे दर्शन घेता यावे म्हणून मंदिर समितीने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. महाकाल लोक कॉरिडॉरच्या निर्मितीनंतर या मंदिरात येणा-या भाविकांची संख्या वाढली आहे. (Temple of Nagchandreshwar in Ujjain)

सई बने


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.