आजच्या आधुनिक काळातील जीवनशैलीमुळे माणसांना सतत विविध आजार होताना दिसतात. आजकाल तर आपण पाहिले तर सर्रास लोकं रात्री उशिरा जेवतात आणि जेवण झाले की, लगेच झोपतात. शिवाय जेवणाच्या वेळा पाळत नाही. बाहेरचे भरपूर खातात, तेलकट तिखट खातात त्यामुळे पोटाशी संबंधित आजार त्यांना हमखास होतात.
पोटाशी संबंधित सगळ्यांना होणार अतिशय सामान्य आजार म्हणजे ॲसिडिटी. ॲसिडिटी झाली की लगेच आपण इनो घेतो किंवा थंड दूध पितो. मात्र कधी कधी हे उपाय देखील लाभदायक ठरत नाही. मग काय करावे डॉक्टरकडे जाण्यासाठी अनेक लोकं कंटाळा करतात. तेव्हा या दोन उपायांव्यतिरिक्त देखील काही उपाय ॲसिडिटीसाठी करता येतील ते कोणते जाणून घेऊया.
आपल्या पोटात हायड्रोक्लोरिक ॲसिडचा स्त्राव होतो, जो अन्न पचवण्याचे आणि ते तोडण्याचे काम करतो. एखाद्या व्यक्तीला जेव्हा ॲसिडिटीचा त्रास होतो तेव्हा शरीरात अपचन, छातीत जळजळ होणे, अन्ननलिकेत वेदना होणे, पोटात अल्सर आणि जळजळ आदी त्रास होऊ लागतात. ही ॲसिडिटी खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, ताणतणाव, धूम्रपान, मद्यपान, व्यायामाचा अभाव, खराब जीवनशैली, जास्त प्रमाणात मांसाहार, अति तेलकट, तिखट पदार्थ खाणे आदी कारणांमुळे ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. या ॲसिडिटीवर उपाय पाहूया.
- ॲसिडिटी झाल्यावर तुळशीच्या पानांचे सेवन करू शकता. त्यामुळे पोटाची जळजळ कमी होण्यास मदत होईल. तुळशीची पाने पाण्यात उकळा. नंतर हे पाणी चहासारखे प्या.
- ॲसिडिटीचा त्रास सतत होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या सोबतच कोमट पाण्याचे सेवन करू शकता. हे ॲसिड रिफ्लेक्सची लक्षणे कमी करण्यास मदत करते. सकाळी रिकाम्या पोटी एक ग्लास कोमट पाणी घेऊ शकता.
- गुळाचे सेवन केल्याने तुमचे आतडे निरोगी राहून ॲसिडिटीचा त्रास कमी होण्यास मदत होते. भूक न लागण्याची समस्या दूर होण्यास मदत होते. हिवाळ्यात गुळाचे सेवन केल्याने तुमचे शरीर उबदार राहण्यास मदत होते. तसेच तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढवते.
- ताकामध्ये चांगले बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक ॲसिड असते. हे ॲसिडटीच्या लक्षणांपासून त्वरित आराम देण्यास मदत करते. हे एक उत्कृष्ट प्रोबायोटिक आहे. ताकाच्या सेवनामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहते. म्हणूनच रोज नियमितपणे ताक पिणे फायदेशीर ठरते.
- बडीशेप ही माऊथ फ्रेशनर म्हणूनही वापरली जाते. सोबतच ॲसिडिटीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही बडीशेपही खाऊ शकता. यामुळे गॅस, अपचन आणि पोट फुगण्याच्या समस्येपासून आराम मिळतो. पाण्यात थोडी बडीशेप उकळा. पाणी कोमट झाल्यावर ते गाळून सेवन करा.
- जेवणाच्या वेळा जपत, काही तासांनी थोडे थोडे खावे.
- आहारामध्ये जास्त तिखट, मसालेदार, तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि जेवताना हळूहळू आणि प्रत्येक घास चावून खा. घाईगडबडीने जेवल्यास अपचन, अॅसिडिटी असे त्रास होतात.
- रात्री उशिरापर्यंत जगू नये. किमान साडेसहा ते सात तास झोप घेणे आवश्यक असते. रात्रीचे जेवण लवकर करावे. आणि जेवणानंतर ३ तासांनी झोपावे.
======
हे देखील वाचा : पोटावरील चरबी कमी करतील हे 5 Detox Water
======
- धूम्रपान, तंबाखूसेवन, मद्यप्राशन आदी व्यसने, आणि चहा-कॉफी, कोला आदी पेये यांचे सेवन करणे टाळावे.
- मानसिक ताण, काळजी यामुळे अॅसिडिटी वाढते, त्याकरिता या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्यासाठी मेडीटेशन, रीलॅक्सेशन टेक्निक्स करावे.
- सतत अॅसिडिटी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासण्या कराव्यात आणि उपचार करावेत.