गेल्या काही वर्षाच चीननं आपल्या अंतराळ योजनांमध्ये वाढ केली आहे. चंद्रावर केलेली चीनची मोहीम यशस्वी ठरली आहे. चीनचे अंतराळस्थानकही नासाबरोबर स्पर्धा करत आहेत. मध्यंतरी चीन अंतराळ स्थानकामार्फत सर्व जगावर नजर ठेऊ इच्छितो अशी बातमी आली होती. आता याच चीनची पुढची योजना जाहीर झाली आहे. त्याचा ड्रॅगन प्लॅन, म्हणून उल्लेख करण्यात येत आहे. चीन चक्क पृथ्वी आणि चंद्र दरम्यान ‘सुपर हायवे’, तयार करणार आहे. या योजनेचा उल्लेख अंतराळात क्रांती असा करण्यात येत आहे.
अंतराळात भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करून अंतराळ प्रवास सुखकर होण्यासाठी चीनची ही योजना असल्याचे सांगण्यात येत आहे. यासाठी चीन ३० उपग्रह आणि ३ चंद्र ग्राउंड स्टेशनचे नेटवर्क तयार करण्याची योजना आखत आहे. हे नेटवर्क पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील वास्तविक-वेळ निरीक्षण आणि दळणवळण सक्षम करणार असल्याचा दावा चीनच्या संशोधकांनी केला आहे. या चीनच्या योजनेमुळे जगभरातील अंतराळ क्रांतीचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या सुपर हायवेमधून चीन आपल्या २० किंवा त्याहून अधिक अंतराळवीरांबरोबर एकाच वेळी ऑडिओ, प्रतिमा किंवा व्हिडिओद्वारे पृथ्वीवर संवाद साधण्याची सुविधा देणार आहे. (Super Highway To Moon)
चीनमधील शास्त्रज्ञांच्या या योजनेला ड्रॅगन प्लॅन असे नाव मिळाले आहे. पृथ्वी आणि चंद्र दरम्यान नेटवर्क पायाभूत सुविधा तयार करण्यासाठी एक रोडमॅप तयार करण्यात आला आहे. त्यातून अंतराळ प्रवास अधिक सुलभ होईल अशी अपेक्षा आहे. चायना अकादमी ऑफ स्पेस टेक्नॉलॉजी आणि बीजिंग इन्स्टिट्यूट ऑफ स्पेसक्राफ्ट सिस्टम इंजिनिअरिंगचे संशोधक या ड्रॅगन प्लॅनवर काम करत आहेत. चंद्रावर यान जातांना पहिला प्रश्न येतो तो अचूक स्थितीचा. अंतराळात प्रवास करतांना मिनिटाचा नाही तर सेकंदाचा हिशोब ठेवावा लागतो. एक सेकंदाचाही फरक झाल्यास अंतराळविरांच्या जिवाला धोका होऊ शकतो. शिवाय करोडो रुपये खर्च करुन चालू केलेली योजना नष्ट होऊ शकते. यात हे नेटवर्क, चंद्र आणि पृथ्वी दरम्यान अंतराळयान प्रवास करत असताना आणि चंद्राच्या पृष्ठभागावर ऑपरेशन करत असताना अचूक स्थिती, नेव्हिगेशन आणि वेळ सांगणार आहे. त्यामुळे भविष्यात अंतराळ प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे.
====================
हे देखील वाचा : स्पेस टुरिझममुळे आता पृथ्वी बाहेर ही फिरता येणार…
====================
चीनच्या Chang’e-5 मोहिमेचे मुख्य डिझायनर यांग मेंगफेई यांच्या नेतृत्वाखालील टीम या योजनेवर काम करत आहे. यांग मेंगफेई यांच्या म्हणण्यानुसार भविष्यात अंतराळ मोहीमात कमालीची वाढ होणार आहे. पृथ्वीवरील साधनांचा, खनिजांचा तुटवडा जाणवू लागल्यावर मानव त्यासाठी अंतराळातील ग्रहांवर अवलंबून रहाणार आहे. ही एकजागतिक स्पर्धाच असणार आहे. यातूनच नवीन जगाची सुरुवात होणार आहे. या नवीन जगात सुपर हायवेमधून मोठा दिलासा मिळणार आहे. (Super Highway To Moon)
हे एक मोठे नेटवर्क असेल. हे नेटवर्क पृथ्वी आणि चंद्राच्या मधल्या प्रदेशात ‘सिल्युनर स्पेस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हालचालींवर लक्ष ठेवणार आहे. सिस्लुनर स्पेस म्हणजे पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील प्रदेश. यामध्ये पृथ्वीभोवती असलेल्या उपग्रहांच्या कक्षा आणि चंद्राची कक्षा कुठे आहे याचा समावेश होतो. चीन भविष्यासाठी चंद्रावर स्पेस स्टेशन उभारण्याच्या तयारीत आहे. यासाठी चीनची नासाबरोबर स्पर्धा सुरु झाली आहे. जागतिक खगोल संशोधकांचा असा दावा आहे की चीन, अंतराळ आणि चंद्राच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात संशोधन करीत आहे.
सुपर हायवे ही योजना चीनच्या याच अंतराळ संशोधनाचा धोरणात्मक नियोजनाचा एक भाग आहे. २५ जून रोजी चीननं यासंदर्भात पुरावा दिला आहे. चीनच्या रोबोटिक Chang’e 6 या अंतराळयानाने दक्षिण ध्रुव – एटकेन बेसिन नावाच्या चंद्रावरील स्थानावरुन दगडाचे नमुने पृथ्वीवर पाठवले आहेत. याआधीच चीननं चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यासाठी चीनने रशिया, व्हेनेझुएला, दक्षिण आफ्रिका आणि इजिप्त या देशांबरोबर भागीदार केली आहे. लघुग्रह आणि चंद्रामधून खनिजे शोधण्याचा आणि काढण्याचा चीनचा हेतू आहे. यातून चीन आणि अमेरिकेमध्ये आंतरळावर वर्चस्व कोणाचे ही स्पर्धा सुरु होणार आहे. (Super Highway To Moon)
सई बने