Home » ‘ये दिल मांगे मोर’ म्हणत विक्रम बत्रांनी जिंकला कारगिल !

‘ये दिल मांगे मोर’ म्हणत विक्रम बत्रांनी जिंकला कारगिल !

by Team Gajawaja
0 comment
Vikram Batra
Share

‘या तिरंगा लहराकर आऊंगा या उस तिरंगे में लिपटकर आऊंगा, लेकिन आऊंगा जरूर’ एलओसी कारगिल चित्रपटातील हा डायलॉग तसा अनेकांना माहीत असेल. पण हे वाक्य एका शूर सैनिकाचं आहे, ज्याने कारगिलच्या युद्धात बलाढ्य पराक्रम गाजवला होता. 1999 सालीच पालमपुरमधल्या एका कॅफेमध्ये मित्राबरोबर कॉफी घेत असताना त्या वीराने काढलेले हे उद्गार ! अखेर त्याने शिखरावर तिरंगासुद्धा फडकावला आणि तो त्याच तिरंग्यातून लपेटूनच आपल्या घरी आला. त्या योद्धाचं नाव परमवीर चक्र कॅप्टन विक्रम बत्रा !

नुकताच एक चित्रपट आला होता, शेरशाह ! एका वीराची कथा अनेकदा प्रेमकथेभोवती गुरफटली जाते आणि त्याचं शौर्य झाकोळलं जातं. त्यामुळे हा चित्रपट जरी विक्रम बत्रा यांच्याबाबत होता, तरी त्यांचं परिश्रम आणि त्यांची रणनीती आणि त्यांचं योगदान मात्र हवं तसं लोकांपर्यंत पोहोचलं नाही. कारगिल विजय दिवसला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्ताने या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या वीरांच्या कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. (Vikram Batra)

9 सप्टेंबर 1974 ! बत्रा कुटुंबियांच्या घरी दोन जुळ्या मुलांचा जन्म झाला. यावेळी आई झालेल्या कमलकांता बत्रा यांनी ईश्वराला उद्देशून म्हटलं की, मी तुझ्याकडे एकच मुलगा मागितला होता, तू दोन का पाठवलेस ? पण त्यांना हे माहीत नव्हतं की हाच दूसरा मुलगा इतिहासात अमर होणार होता. दोघांची नावं विक्रम आणि विशाल बत्रा पण आई आवडीने दोघांना लव-कुश म्हणायची. लहानपणी दोघेही आईचा डोळा चुकवून शेजारीच असलेल्या निशा दीदीकडे टीव्ही बघायला जायचे. दर रविवारी सकाळी दहा वाजता दूरदर्शनवर लागणारी ‘परमवीर चक्र’ ही मालिका दोघांनाही खूप आवडायची. भविष्यात या दोघांपैकी एकाच्या हातात तेच परमवीर चक्र येणार होतं.

विक्रम तसा सतत लोकांची मदत करणारा होता, त्यामुळे त्याची मित्रमंडळी खूप ! तो नॅशनल लेवलचा टेबल टेनिस प्लेयर होता. एनसीसीचा बेस्ट कॅडेट. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सर्वगुणसंपन्न ! शाळा-कॉलेज पूर्ण झाल्यानंतर त्याला मर्चंट नेव्हीमध्ये नोकरीसुद्धा लागली होती. मात्र अचानक विक्रमने आपलं मन वळवलं आणि सैन्यदलात सामील होण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे सीडीएस परीक्षा आणि एसएसबी इंटरव्यु त्याने पहिल्याच अटेम्प्ट मध्ये पास केलं होतं. त्याच्या पासिंग आउट परेडमध्ये आर्मी युनिफॉर्ममध्ये आपल्या देखण्या मुलाला पाहून त्याच्या आईवडिलांचं उर भरून आलं होतं. लेफ्टनंट विक्रम बत्राची पहिली पोस्टिंग होती जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये ! (Vikram Batra)

दोन वर्ष चांगली अनुभवात निघाली. त्यानंतर कारगिल युद्धाचं सावट सर्वत्र पसरलं. युद्ध सुरू झालं आणि सर्व सैनिक तयार झाले. 18 ग्रेनेडिअर्सने टोलोलिंग शिखर जिंकल्यानंतर भारताकडे नवीन आव्हान होतं ते म्हणजे पॉइंट 5140 चं ! कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल वाय के जोशी यांनी ही कामगिरी जम्मू एंड काश्मीर रायफल्सच्या दोन नव्या लेफ्टनंट्सवर सोपवली, ते म्हणजे डेल्टा कंपनीचे लेफ्टनंट संजीव जामवाल आणि ब्राव्हो कंपनीचे लेफ्टनंट विक्रम बत्रा ! दोघांनी आपापल्या विजयाची खूण सांगितली, जामवाल यांची होती, ‘ओ या या या’ आणि बत्रा यांची होती, ‘ये दिल मांगे मोर’ !

ती अंधारलेली रात्र होती. कमांडिंग ऑफिसर जोशी पॉइंट 5140 च्या खालीच बसले होते. डेल्टा आणि ब्राव्हो कंपन्यांना दोन वेगळ्या वाटांनी हा कठीण शिखर गाठायचा होता. दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. मात्र खालच्या बाजूच्या सैनिकांना याचा जास्त धोका होता. तो म्हणजे भारतीय सैनिकांना ! एवढ्यात लेफ्टनंट बत्रा यांचा रेडिओ सुरू झाला. यावर एक पाकिस्तानी सैनिक होता. तो म्हणाला, शेरशाह तुझ्या माणसांना खाली घेऊन जा, नाहीतर त्यांचे शव खाली जातील. त्यावर बत्रा यांनी बाणेदर उत्तर दिलं, तासभर थांब, मग बघू कोणाची माणसं जिवंत खाली जातात ते. (Vikram Batra)

गोळीबार जोमाने सुरू झाला. जामवाल आणि बत्रा दोघे आपल्या तुकडीसोबत पुढे सरकत होते. एवढ्यात कमांडिंग ऑफिसर जोशी यांचा रेडिओ सेट वाजला, त्यावर सिग्नल आला, ‘ओ या या या’ याचा अर्थ जामवाल यांनी त्यांना दिलेला भाग जिंकला होता. मात्र बत्रा यांचा कोणताही सिग्नल अजूनही आला नव्हता. गोळ्यांचे आवाज कानांवर सतत पडत होते. शिखरावर नक्की काय चाललंय, काहीच कळत नव्हत. एवढ्यात पहाटे साडे वाजता रेडिओ सिग्नल खणाणला, ‘ ये दिल मांगे मोर’ ! अखेर भारताने पॉइंट 5140 शिखर जिंकला होता. याठिकाणी भारताचा तिरंगा फडकला होता. बत्रा यांच्या नेतृत्वाचा हा पहिलाच विजय होता. विशेष म्हणजे या पूर्ण मोहिमेत भारताच्या एकाही जवानाला इजा झाली नव्हती.

या विजयानंतर विक्रम बत्रा यांनी आपल्या आई-वडिलांना आणि प्रेयसी डिंपल चिमालाही फोन लावला होता. पण ही त्यांचं अखेरचं संभाषण ठरलं. 5140 च्या विजयानंतर त्यांची बढती करण्यात आली आणि लेफ्टनंट विक्रम बत्रा झाले कॅप्टन विक्रम बत्रा ! आता पुढची मोहीम होती, ती म्हणजे पॉइंट 4875 शिखर जिंकून घेण्याची ! इथला वारा खूप बोचरा होता. त्यात थंडीसुद्धा. मात्र जे एंड के रायफल्सचे शूर सैनिक ‘दुर्गा माता की जय’ अशी घोषणा देत पुढे जातच होते. कॅप्टन बत्रा आपल्या पंचवीस जवानांच्या तुकडीसोबत पॉइंट कॅपचर करायला तयारच होते. मोठमोठ्या दगडांच्या मागे लपून छपून कसे-बसे ते शिखरावर पोहोचत होते. (Vikram Batra)

पाक सैनिकांची मशीनगन्सने हेवी फायरिंग सुरूच होती. पॉइंट 4875 अजूनही 70 मीटर दूर होतं. मोहीम अशी होती की, सर्व पाक सैनिकांचा सुपडा साफ करायचा आणि शिखर ताब्यात घ्यायचं. दुसऱ्याने तुकडीने शिखराच्या पायथ्याहून बोफोर्सचा मारा सुरू ठेवला होता. तो दिवस होता, 7 जुलै 1999 ! कर्नल जोशी पहाटे साडे पाच वाजता एकदा कॅप्टन बत्रा यांच्याशी रेडियोवर बोलले. शिखराच्या अरुंद घळीत पाक सैनिक दबा धरून बसले होते. त्यांचे सैनिक बेसावध होते, एवढ्यात धाडसाने बत्रा यांनी आपल्या तुकडीसोबत पाक सैनिकांवर हल्ला केला.

मात्र एवढ्यात कॅप्टन बत्रा यांना एक गोळी लागली. यासोबतच त्यांच्या एका साथीदारालाही गोळी लागली. पण ते थांबले नाहीत आणि पुढे जातच राहिले. गोळ्या वेगाने सर्वत्र पडत होत्या. एवढ्यात ते एका ठिकाणी थांबले, मात्र आपल्या साथीदाराला वाचवणं हे त्यांचं कर्तव्य होतं. त्यामुळे त्यांनी tया जखमी सैनिकाला वाचवण्यासाठी पुढाकार घेण्याचं ठरवलं. त्यांच्यासोबत रघुनाथ सिंग आणि नवीन नागप्पा हे सैनिकसुद्धा होते. एवढ्यात नवीन नागप्पा यांनी त्या जखमी सैनिकाला आणण्याचा निर्णय घेतला. मात्र कॅप्टन बत्रा यांनी त्यांना म्हटलं, तुम्हाला मुलंबाळ आहेत, कुटुंब आहे. मी तर अविवाहित आहे. मी पुढे जाऊन डोक्याच्या बाजूने धरतो. (Vikram Batra)

एवढ्यात ते पुढे गेले, तशी एक गोळी त्यांच्या छातीत घुसली. मात्र त्यांनी जखमी सैनिकाला परत आणून स्वत जखमी अवस्थेत शत्रूसोबत दोन हात करण्यासाठी पुढाकार घेतला. कित्येक शत्रू सैनिकांना यमसदनी धाडणारा, शत्रूचे बँकर्स उडवणारा, आपल्या साथीदारांसाठी जीव पणाला लावणारा शूर जवान कॅप्टन विक्रम बत्रा आता स्वत मृत्यूच्या दरात उभा होता. एवढ्यातच गोळ्यांचा मारा झाला आणि या महावीराच्या शरीरात कित्येक गोळ्या घुसल्या. आपल्या सोबत असलेल्या जवानांच्या डोळ्यांदेखत कॅप्टन विक्रम बत्रा पडले. भारतमातेचा पुत्र कायमचा आपल्या आईच्या कुशीत निजला.

आपल्या कमांडरला आलेल्या वीरमरणामुळे सैनिक अजून त्वेषाने लढायला लागले. आणि भारताने अखेर पॉइंट 4875 वर तिरंगा फडकवला. पण कॅप्टन बत्रा यांना या देशाने कायमचं गमावलं. भारताने कारगिलचं युद्ध जिंकलं. पाकिस्तानचा चौथ्यांदा पराभव झाला. कॅप्टन विक्रम बत्रा या वीराने आपले शब्द खरे करून दाखवले. शिखरावर तिरंगासुद्धा फडकावला आणि त्याच तिरंग्यात लपेटुन ते आपल्या घरी परतले. तत्कालीन लष्करप्रमुख वेदप्रकाश मलिक एकदा त्यांच्या आई-वडिलांना म्हणाले होते की, जर कॅप्टन बत्रा कारगिलमध्ये धारातीर्थी पडले नसते, तर एक दिवस नक्कीच ते माझ्या लष्करप्रमुखाच्या खुर्चीवर बसले असते. (Vikram Batra)

==================

हे देखील वाचा: तिबेटच्या हिमनद्या भारतासाठी धोकादायक…

==================

असा होता हा भारत मातेचा महान योद्धा ! त्यांच्या हौतात्म्यांनंतर भारत सरकारने त्यांचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्राने गौरव केला. हा सन्मान मिळवणारे ते 21 वे भारतीय सैनिक ठरले. आजही पालमपुरमध्ये त्यांचं घर आहे. कॅप्टन बत्रा आठवणी, त्यांचे फोटो, त्यांचे अवॉर्ड, मेडल्स सर्वच त्यांच्या आई-वडिलांना जपून ठेवल्या आहेत. 25 वर्ष झाली पण आजही त्या अवघ्या 25 वर्षांच्या पोराने गाजवलेल्या शौर्याच्या कथा देशाच्या कानाकोपऱ्यात सांगितल्या जातात. त्यांचं ‘ये दिल मांगे मोर’ हे घोषवाक्य युवा पिढीला सैन्यात भरती होण्यासाठी नेहमीच प्रवृत्त करत राहील.


Share

Related Articles

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.