2 जुलै 2024 रोजी उत्तर प्रदेशच्या हाथरसमधील एक सत्संग कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सत्संग संपल्यानंतर भोले बाबा मंडपांच्या बाहेर पडला आणि सत्संग ऐकायला आलेल्या लोकांची गर्दी भोले बाबाच्या पाया खालची माती उचलण्यासाठी धावली. इतक्यातच प्रचंड गर्दी आणि चेंगराचेंगरी होऊन होत्याचं नव्हतं झालं. जवळपास 130 लोकांना या गर्दीमध्ये आपला जीव गमवावा लागला. यामध्ये महिला आणि लहान मुलं जास्त होती. ही दुर्घटना घडल्यानंतर पोलिसांनी आयोजकांवर गुन्हा दाखल केला, पण ज्या ढोंगी बाबासाठी इतक्या मोठ्या संख्येने लोकं जमली होती, तोच तिथून पसार झाला आणि आतापर्यंत त्याचा थांगपत्ता लागू शकला नाही. प्रश्न हाच पडतो की आता या शेकडो लोकांच्या मृत्यूची जबाबदारी हा बाबा घेणार आहे का? (Bhole Baba Hathras)
उत्तर प्रदेशच्या हाथरस जिल्ह्यातल्या सिकंदराबाद इथे या भोले बाबाच्या सत्संगासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यासाठी मोठ्या संख्येनं नागरिक किंवा त्या बाबाला मानणारे लोकं उपस्थित होते. दुपारी साडेतीनच्या दरम्यान हा सत्संग कार्यक्रम संपला आणि त्यानंतर हा भोले बाबा कार्यक्रम स्थळावरून बाहेर पडल्यानंतर त्याच्या गाडीजवळ लोक आले. भोले बाबाने ज्या ज्या ठिकाणी पाऊल ठेवलं, ती माती उचलण्यासाठी लोकांची झुंबड उडाली. या धावपळीत गर्दी वाढू लागली. त्यातच काही लोक खाली पडले आणि ढकलाढकलीला सुरुवात होऊन प्रचंड चेंगराचेंगरी झाली. बाहेर जाण्याच्या मार्गच नसल्यामुळे आणि श्वास कोंडल्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. (Bhole Baba Hathras)
आयोजकांनी या कार्यक्रमात जवळपास ८० हजार लोकांना येण्याची परवानगी मागितली होती. पण या कार्यक्रमात संपूर्ण राज्यातून तब्बल अडीच लाख लोकं आली होती. परवानगीच्या अटींचं पालन न केल्यामुळे एका बाजूला रोडवरची वाहतूक ठप्प झालीच होती. त्यातच दुसरीकडे ही दुर्दैवी घटना घडली. मुळात आयोजकांनी यापूर्वी आयोजित केलेल्या कार्यक्रमांसाठीसुद्धा लाखो लोकं जमले होते, पण हे त्यांनी पोलिसांपासून लपवलं. या भोले बाबाच्या कार्यक्रमाला अनेक राजकीय नेतेसुद्धा उपस्थित असतात. इतकच काय उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवसुद्धा या बाबासोबत स्टेजवर दिसून आले आहेत.
आता पाहूया की हा भोले बाबा नेमका आहे तरी कोण ?
58 वर्षांच्या या भोले बाबा बनून फिरणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे सूरज पाल सिंग याशिवाय नारायण साकार विश्व हरी असं एक नाव हा वापरतो. 40 वर्षांपूर्वी हा बाबा उत्तर प्रदेश पोलीसमध्ये हवालदार म्हणून भरती झाला होता. 10 वर्ष पोलिसांत नोकरी केल्यानंतर त्याने ही नोकरी सोडली. त्याचं शेवटचं पोस्टिंग आग्रामध्ये होतं. यानंतर त्याने धार्मिक प्रवचन द्यायला सुरुवात केली आणि ९० च्या दशकात हाथरसमधील त्याच्या मालकीच्या जमिनीवर मोठा आश्रम बांधला आणि तिथे अशा धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करायला सुरुवात केली. (Bhole Baba Hathras)
====================
हे देखील वाचा : भुशी डॅमचे सौदर्य मोहक तेवढेच घातकही
====================
आसपासच्या गावांप्रमाणेच इतर राज्यांमधूनही त्यांच्या आश्रमात मोठ्या संख्येनं लोक येऊ लागले. यानंतर त्याला भोले बाबा म्हणून प्रसिद्धी मिळाली. या बाबाच्या सत्संगला ‘मानव मंगल मिलन सद्भावना समागम’ म्हणतात. या भोले बाबाचं लग्न झालं असून त्याला मूलबाळ नाही. त्याच्या भक्तांनी त्याच्या पत्नीलाही ‘माताश्री’ असं नाव दिलं आहे. याच बाबाच्या आणि त्याच्या संस्थेच्या हलगर्जीपणामुळे इतक्या लोकांना आपला जीव गमवावा लागला. आणि दुर्दैव म्हणजे या कठीण काळातच आपल्या भाविकांसाठी हा बाबा उपस्थित नाही. तो तिथून पसार झाला. आणि पोलीस अजूनही त्याचा शोध घेऊ शकले नाहीत. (Bhole Baba Hathras)
यावर लोकांनी आतातरी गांभीर्याने विचार करायला हवा. भारतात सध्या अशा अनेक पाखंडी बाबांच्या आश्रमांमध्ये प्रचंड गर्दी असते. केवळ रामकथा, कृष्णकथा, शास्त्र, पुराण यांची खोटी माहिती देणाऱ्या बाबांपेक्षा आपण स्वत पुढाकार घेऊन आपल्या धर्माचा, संस्कृतीचा खरा अभ्यास केला, तर असे नाहक बळीदेखील जाणार नाहीत, गोरगरिबांची कोणी फसवणूकदेखील करणार नाही आणि हाथरससारख्या घटनादेखील घडणार नाहीत.