दक्षिण भारतातील अनेक मंदिरे ही भारतीय वास्तुकलेसाठी जगप्रसिद्ध आहे. यापैकीच एका मंदिराला युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. हे मंदिर म्हणजे, चेन्नाकेशव मंदिर. भगवान विष्णुंचे हे मंदिर कर्नाटकातील बैलूर येथे आहे. भगवान चेन्नाकेशव हे भगवान विष्णूचे अवतार मानले जातात. रामायण आणि महाभारतातील अनेक चित्रे या मंदिरात पहायला मिळतात. मुख्य म्हणजे, फक्त छिन्नी आणि हातोड्याच्या सहाय्यानं या मंदिरात केलेली कलाकुसर पहातांना आश्चर्याचे अनेक धक्के बसतात. (Chennakeshava Temple)
चेन्नाकेशव मंदिर (Chennakeshava Temple) फक्त वास्तुकलेसाठी ओळखले जात नाही, तर तत्कालीन भारतीय समाज किती प्रगल्भ होता, याची साक्षही हे मंदिर बघतांना मिळते. कारण सूर्याची किरणे रोज कशा पद्धतीनं मंदिरात येतील, याची काळजी मंदिर उभारतांना घेण्यात आली आहे. 900 वर्षाहून अधिक जुन्या असलेल्या या मंदिराचा आकार ता-यासारखा आहे. मंदिरामध्ये अनेक देवदेवतांच्या मुर्ती आहेत. तसेच मंदिरात 48 खांब आहेत. यातील सर्वच ठिकाणी अप्रतिम अशी कलाकुसर आहे. मंदिराच्या गर्भगृहात असलेली भगवान विजय नारायण यांची मुर्ती काळ्या पाषाणापासून केलेली आहे. ही मुर्ती 3.7 मीटर उंच आहे. याशिवाय मंदिरात विष्णुच्या अवतारांच्या अन्यही मुर्ती आहेत. या सर्वच मुर्ती अतिशय सुंदर आहेत. त्यावरील कोरीव काम बघतांना आलेले भाविक वेळ विसरुन मुर्ती आणि मंदिराचे सौदर्य निरखत राहतात.
कर्नाटकातील चेन्नाकेशव मंदिर (Chennakeshava Temple) हे ता-याच्या आकारातील मंदिर म्हणजे, वास्तुकलेचा अजुबा आहे. हे मंदिर पूर्ण झाल्यावर होयसळ वंशानी बेलरु हे शहर वैकुंठ, म्हणजेच विष्णूचे निवासस्थान असल्याचे जाहीर केले. या मंदिराचे गर्भगृहही ता-याच्या आकारातले आहे, यातील आणखी एक वैशिष्ट म्हणजे, या गर्भगृहाच्या भिंतीवर जेव्हासूर्याची किरेण पडतात, तेव्हा भगवान विष्णुच्या 24 रूपांचे दर्शन भाविकांना होते, हा वास्तुशास्त्राचा चमत्कार बघण्यासाठी येथे मोठी गर्दी होते.
चेन्नाकेशव मंदिर (Chennakeshava Temple) जेथे आहे, ते बेलुरू हे प्राचीन काळात वेलपुरी, वेलूर आणि बेलापूर म्हणूनही ओळखले जात होते. यागाची नदीच्या काठावर वसलेले होयसाला साम्राज्याची राजधानी असलेले बैलुर हा एक संपन्न भूभाग होता. त्यामुळेच त्यावर चेन्नाकेशव मंदिर उभारण्यात आले, तेव्हा हाच संपन्नतेच वारसा मंदिरामध्ये दिसून आला. राजा विष्णुवर्धन याने चोला साम्राज्यावर विजय मिळवण्यासाठी भगवान विष्णुंची आराधाना केली. यासाठी त्यांनी हे चेन्नाकेशव मंदिर उभारले. इसवी सन 1104 मध्ये या मंदिराच्या उभारणीस सुरुवात झाली. तेरा वर्षांनी म्हणजे, 1117 मध्ये मंदिराचे काम पूर्ण झाले.
राजा विष्णुवर्धन हा युद्धकलेसोबत स्थापत्यशास्त्राचा अभ्यासक होता. याशिवाय त्याचा ग्रहनक्षत्राचाही अभ्यास होता. त्यामुळेच भगवान विष्णुचे हे मंदिर त्यांना ता-याच्या आकारात उभारले. या मंदिराला स्थानिक भाषेत विजयनारायण मंदिर असेही म्हटले जाते. राजा विष्णुवर्धन यांनी सुरु केलेल्या या मंदिराला पुढे त्याच्या नातवंडांनी अधिक परिपूर्ण केले. मंदिर उभारतांना अनेक वेळा राजपरिवाला युद्धांचा सामना करावा लागला. त्याचा फटका मंदिराच्या उभारणीलाही बसला. मात्र मंदिर जेव्हा पूर्ण झाले, तेव्हा ते भारतातील सर्वोच्च भव्य मंदिर म्हणून प्रसिद्ध झाले.
ता-याच्या आकारातील या मंदिराची गोपुरेही भव्य आहेत. मंदिराच्या समोरच्या प्रवेशद्वारावर एक विशाल गोपुरा आणि भगवान विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाचे, भव्य शिल्प आहे. संपूर्ण मंदिर जसे कलाकृतींनी सजवण्यात आले आहे, तसेच मंदिराचे छतही वेगवेगळ्या कलाकृतींनी सजवण्यात आले आहे. मंदिर पूर्णतः दगडाचे आहे. या दगडामध्ये केलेल्या कलाकृती जिवंत वाटाव्यात इतक्या अप्रतिम आहेत. 178 फूट लांब आणि 156 फूट रुंद असलेल्या मंदिरात 48 खांब आहेत. या मंदिरात असलेली देवी सरस्वतीची मुर्तीही एकमेव मुर्ती समजली जाते. कारण एरवी देवी सरस्वती, हातात विणा असलेली असते. मात्र मंदिरात देवी सरस्वती नृत्याच्या मुद्रेत आहे. या मूर्तीच्या डोक्यावर पाणी टाकल्यास ते नाकातून डावीकडे वाहत जाऊन डाव्या हाताच्या तळहातावर पडते. मंदिरातील असलेल्या प्रत्येक मुर्तीमध्ये असेच वैशिष्ट लपवलेले आहे.
मंदिरातील या वैशिष्ट्यांचा आणि समृद्धीचा फटकाही मंदिराला बसला आहे. या मंदिराची किर्ती, वैभव पाहून अलाउद्दीन खिलजीचा सेनापती मलिक काफूर याने बैलूरवर आक्रमण केले आणि शहर लुटून नेले. पण त्यानंतरही मंदिर आहे, त्याच वैभवात काही वर्षानी आले. या सर्वांचा मंदिराच्या संकुलात सापडलेल्या शिलालेखात उल्लेख आहे. एकूण 118 शिलालेख आठणून आले आहेत. त्यामध्ये मंदिराच्या उभारणीपासून ते त्यावर झालेल्या आक्रमणाचा वृतांत लिहून ठेवण्यात आला आहे. (Chennakeshava Temple)
============
हे देखील वाचा : रामलल्लाच्या दागिन्यांवर दुर्मिळ हिरे माणिक
===========
चेन्नाकेशव मंदिरात (Chennakeshava Temple) अनेक छोटी मंदिरे आहेत. त्यापैकी 70 फूट उंचीचे वीरनारायण मंदिर एखाद्या विमानाच्या आकाराचे आहे. त्यावरील कलाकृतीही अप्रतिम आहेत. या सर्व मंदिराच्या बांधकामासाठी क्लोरीटिक शिस्ट नावाचा मऊ दगड वापरण्यात आला आहे. हा दगड काही काळ अगदी साबणासारखा असतो. मात्र काळानुसार तो कठिण होत जातो. याची योग्य माहिती जाणूनच या दगडाचा वापर मंदिरात करण्यात आला आहे. चेन्नाकेशव मंदिरात असे अनेक वास्तुशास्त्राचे नमुने आहेत. भारतीय पर्यटकांसोबत परदेशी पर्यटकही या मंदिराला बघण्यासाठी आणि भारतीय वास्तुकलेचे प्रगत रुप पहाण्यासाठी मंदिरात गर्दी करताता.
सई बने.