आपल्या भारत देशावर इंग्रजांनी दीडशे वर्ष राज्य केले. या दीडशे वर्षाच्या काळात खूप मोठा इतिहास घडून गेला. अनेकांनी इंग्रजांपासून भारत स्वतंत्र करण्यासाठी बलिदान दिले. तर कित्येकांनी स्वातंत्र्यासाठी अनेकांचे बलिदान घेतले.
आज आपण देशासाठी हसत फासावर चढलेल्या सख्ख्या तीन भावंडांची ऐतिहासिक गोष्ट पाहणार आहोत. हे तीन भाऊ म्हणजे टिळकांच्या विचारांनी प्रेरित झालेले आणि शिवरायांना आदर्श मानणारे पुण्यातील चापेकर बंधू.
आज याच तीन भावंडांपैकी सर्वात मोठे असणारे दामोदर चापेकर (Damodar Hari Chapekar) यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त हा खास लेख. चला तर मग जाणून घेऊयात चापेकर बंधूंचा इतिहास.
दामोदर चापेकर यांचा जन्म दि. २४ जुन १८६९ मध्ये चिंचवड येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. तसे पहायला गेले तर चापेकर कुटुंब मुळचे कोकणातले होते. पण नंतर ते चिंचवड येथे स्थायिक झाले. दामोदर चापेकर यांच्या वडिलांचे नाव हरिभाऊ चापेकर असे होते. त्यांना दोन मुली व तीन मुलगे अशी अपत्ये होती. मुलांमध्ये सर्वांत मोठा दामोदर होता.
दामोदर चापेकरांनी त्याकाळात इंग्रजी शाळेत शिकण्याचा सरकारचा हट्ट असताना त्यांनी मराठी भाषेमधून शिक्षण घेतले. त्यांना पहिल्यापासूनच इंग्रज, त्यांची भाषा आणि त्यांच्या इंग्रजी शाळा याची प्रचंड चीड होती.
चाफेकरांच्या घरी दररोज सकाळी टिळकांचा ‘केसरी’ पेपर येत असे. त्यामुळे दामोदर चापेकरांवर नकळतपणे टिळकांच्या जहाल विचारांचा प्रभाव पडला होता. तसेच दामोदर चापेकर यांनी आपले आराध्य दैवत हे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानले होते. त्यामुळे त्यांनी महाराजांवर अनेक पोवाडे केले.
एकदा ते आई वडिलांसह बैलगाडीमधून काशी यात्रेला गेले होते. तेव्हा त्यांनी देशातील खरी परिस्थिती पहिली. तेव्हा देशाची किती दयनीय अवस्था आहे हे त्यांच्या लक्षात आले. आपला देश यातून मुक्त झालाच पाहिजे. त्यासाठी आपण काहीतरी करायला हवे असे ते कायम म्हणायचे.
याचवेळी त्यांनी शाहू महाराज, चित्तोड चे महाराजा, नेपाळ नरेषांकडे सैन्यातभर्ती होण्यासाठी प्रयत्न केले. पण सैन्यातील अधिकाऱ्यावर पण ब्रिटिशांचा प्रभाव असल्याने त्यांना सैन्यात जाता आले नाही.
याच काळात लहुजी वस्ताद साळवे यांनी चापेकर बंधूंना (Chapekar brothers) प्रेरणा दिली. पुढे वासुदेव चापेकर, दामोदर चापेकर आणि बाळकृष्ण चापेकर या तीन चापेकर बंधूनी मिळून पुण्यातील पर्वती येथे स्वतः ची चापेकर क्लब नावाची संस्था उभारली. त्यात ३०० युवकांना पिस्तुल चालविणे, मल्ल, धनुर्विद्या, गलोर चालवणे असे प्रशिक्षण दिले. ब्रिटिशांनी आणलेल्या संमती वयाच्या विधेयकास चापेकर बंधूंनचा तीव्र विरोध होता. देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी ते प्रयत्न करत होते.
याच काळात देशात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. त्या काळी सरकारने केलेली उपाययोजना व्याधीच्या दृष्टीने योग्य होती. पण लोकांच्या भावना लाथाडून केल्यामुळे लोक संतप्त बनले. रूग्णालयात जाणं म्हणजे मरण असे लोकांना वाटू लागले आणि ते रोग लपवू लागले.
त्यामुळे इंग्रजांचे शोधपथक पुण्यातील घराघरांतून धुमाकूळ घालू लागले. देवघरातील देवावर थुंकण्यापर्यंत त्यांची मजल गेली. लोकांच्या देवधर्माच्या भावनांना लाथाडणे, मुलीबाळींना घराबाहेर ओढणे आणि पुरुषवर्गाला अनेकप्रकारे अपमानित करणे याचा उच्छाद मांडला गेला होता.
याचवेळी ब्रिटिश अधिकारी रँड हा पुण्यातील महिलांना तपासण्याच्या बहाण्याने स्त्रियांवर अत्याचार करत होता. अत्याचाराचा बदला आणि स्वातंत्र्याची धडपड यामुळे चापेकर बंधूंनी रँड ला मारण्याचा कट रचला.
सरकारने व्हिक्टोरिया राणीचा हीरकमहोत्सव मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरवले. या दिवशीच रॅंडचा वध करायचा निश्चय दामोदरपतांनी केला. २२ जून १८९७ रोजी राणीच्या हीरकमहोत्सवा निमित्त गणेशखिंडीत मेजवानी देण्यात आली होती.
कार्यक्रमातून परतत असताना रँडचा चापेकर बंधूंकडून “गोंदया आला रे आला” या सांकेतिक भाषेत एकमेकांना इशारे देऊन गोळ्या घालून वध करण्यात आला. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या ब्रिटिश अधिकाऱ्याला देखील मारण्यात आले. नंतर चापेकर बंधू आपल्या चिंचवडच्या राहत्या वाड्यात आले. त्यांनी रँड ला मारण्यासाठी वापरलेली शस्त्रे चापेकर वाड्यात असलेल्या विहिरीत टाकून दिली होती. पुढे ते चिंचवडमधील चापेकर वाड्यात सहा महिने राहिले.
तिकडे रँडला गोळ्या झाडल्या, पण रँड पूर्णपणे मेला नव्हता. रॅंड हा काही काळ कोमात राहिला व नंतर ३ जुलै १८९७ रोजी तो मरण पावला.
नंतर रँड प्रकरणी हत्या करणाऱ्यांची नावे इंग्रज सरकारला कळवणाऱ्यास २०,००० रू. चे बक्षीस देण्यात येईल असे इंग्रज सरकारने जाहीर केले होते. त्यामुळे पैश्याच्या लोभापायी गणेश द्रविड व रामचंद्र द्रविड या दोघा बंधूंनी इंग्रज सरकारला चापेकर बंधूंची नावे कळवली.
त्यानंतर दामोदर चापेकरांना मुंबईत अटक झाली व १८ एप्रिल १८९८ रोजी त्यास येरवडा जेलमध्ये फासावर चढवण्यात आले. त्यापाठोपाठ वासुदेव चापेकरांना ८ मे १८९९ व बाळकृष्ण चापेकरांना १६ मे १८९९ रोजी फासावर चढवण्यात आले. अशारितीने तिन्ही चापेकर बंधू देशासाठी शहीद झाले.
रँडच्या वधाच्या वेळी दामोदरपंतांचे वय अवघे २७ वर्षे होते. तर बाळकृष्ण यांचे वय २४ वर्षे आणि वासुदेवरावांचे वय १८ वर्षे होते. म्हणजे ऐन तारुण्यात चापेकर बंधू देशहितासाठी फासावर चढले होते. आजही त्यांचे हे बलिदान त्याकाळात अनेकांनी केलेल्या त्यागाची जाणीव करून देते.
– निवास उद्धव गायकवाड
टीप : या लेखातील माहिती आणि मते ही सर्वस्वी लेखकाची आहेत. क फॅक्टस टीम याची पुष्टी करत नाही. तसेच लेखकाच्या मतांशी आम्ही सहमत असूच असेही नाही.