हिंदू धर्मामध्ये युगांना खूप महत्त्व आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग, कलियुग अशी विभागणी करण्यात आली आहे. या सर्व युगांचे स्वतःचे महत्त्व आहे. त्यातील प्रत्येकाचा कालावधी हा वेगवेगळा आहे. यातीलच त्रेतायुग (Treta Yuga) हे महत्त्वाचे ठरले आहे. त्रेतायुग हे मानवी काळातील दुसरे युग म्हटले जाते. याच काळात विष्णूचे पाचवे, सहावे आणि सातवे अवतार प्रकट झाले. वामन, परशुराम आणि राम हे विष्णुचे अवतार याच काळात प्रकट झाल्याचा उल्लेख पौराणिक ग्रथांमध्ये आहे.
त्रेतायुगात (Treta Yuga) सर्व दुष्ट शक्तींचा नाश होऊन रामराज्य आल्याचा उल्लेख आहे. याच त्रेतायुगामध्ये जशी आदर्श नगरी म्हणून अयोध्येचा गौरव करण्यात येत होता, तशीच अयोध्या नगरी आता सजवण्यात येत आहे. अयोध्येमध्ये होत असलेल्या भव्यदिव्य प्रभू श्रीराममंदिराचा लोकार्पण सोहळा 22 जानेवारी 2024 मध्ये होत आहे. या सोहळ्यासाठी अवघी अयोध्यानगरी सजवण्यात येत आहे. अयोध्या नगरी त्रेतायुगात ही या जगातील सर्वात शक्तीशाली नगरी होती, तशीच अयोध्या आता होणार असल्याचा विश्वास या अयोध्येचे नागरिक व्यक्त करीत आहेत. त्यामुळेच हे त्रेतायुग नेमके कसे होते, याची उत्सुकता आहे.
अयोध्येत होणा-या श्रीराम मंदिरासोबत अयोध्या नगरीही त्रेतायुगाच्या धर्तीवर सजवली जात आहे. अयोध्येतील नागरिक आपल्या नगरीमध्ये पुन्हा रामराज्य येणार, त्रेतायुग (Treta Yuga) साकारणार असे सांगत आहेत. याच त्रेतायुगात अयोध्येमध्ये राजा राम यांचे शासन होते. त्यामुळेच त्रेतायुगाचे महत्त्व वाढले आहे. वास्तविक हिंदू मान्यतेनुसार त्रेतायुग हे चार युगांपैकी एक आहे. त्रेतायुगात विष्णूचे पाचवे, सहावे आणि सातवे अवतार प्रकट झाले. वामन, परशुराम आणि राम यांच्या या अवतारांनी त्रेतायुगाला सुवर्ण काळ असेही म्हटले जाते. असाच सुवर्णकाळ आता अयोध्यानगरीमध्ये आल्याचा विश्वास येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.
अयोध्या शहरात प्रभू श्रीरामांच्या जीवनावरील चित्रांनी सजवण्यात आले आहे. श्रीरामाची ही नगरी त्रेतायुग थीमवर सजवली जात आहे. येथील रस्त्याच्या कडेला लावण्यात आलेले सूर्यस्तंभ हे प्रभू राम यांच्या सूर्यवंशी घराण्याचे प्रतीक मानण्यात आले आहेत. याशिवाय 22 जानेवारी रोजी या मंदिर परिसरात महायज्ञ करण्यात येणार आहे. 1008 होमकुंड यासाठी तयार करण्यात आले आहेत. 14 वर्षांचा वनवास संपवून श्री रामचंद्र अयोध्या नगरीत परत आले, तेव्हा ही नगरी दिव्यांनी उजळून निघाली होती. तसाच दिपोत्सव अयोध्येत किमान आठवडाभर तरी होणार आहे. राम मंदिराचे दरवाजेही सोन्याने मढवले जाणार आहेत. या अशाच नगरीचा त्रेतायुगात उल्लेख आहे, त्यामुळे अयोध्यावासी आपल्या नगरीत त्रेतायुग (Treta Yuga) आल्याचे सांगत आहेत.
हिंदू धर्मात चार युगांचे वर्णन केले आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. सत्ययुगाच्या समाप्तीनंतर त्रेतायुग सुरू झाले. त्रेतायुगाचा कालखंड 12 लाख 96 हजार वर्षांचा होता. त्रेतायुगात धर्म आणि कर्म यांचे पालन होते. त्रेतायुगात भगवान विष्णूंनी वामन अवतार, परशुराम अवतार आणि श्रीराम अवतार असे तीन अवतार घेतले. आणि अधर्माचा नाश केल्याचा उल्लेख आहे. (Treta Yuga)
=============
हे देखील वाचा : इतिहासात पहिल्यांदाच होणार हिवाळी चारधाम यात्रा
=============
त्रेतायुगात (Treta Yuga) श्रीराम, माता सीता आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह भव्य वाड्यात राहत होते. आता अयोध्येचे भाग्यविधाते, प्रभू श्रीराम नव्या भव्य मंदिरात विराजमान होणार आहेत. हा शुभशकून असून त्रेतायुग पुन्हा आल्याचा दावा करण्यात येत आहे. त्रेतामध्ये लोक स्वभावाने धार्मिक होते आणि त्यांची वेदांवर अतूट श्रद्धा होती. त्यावेळी विष्णू, यज्ञ, प्रष्णिगर्भ, सर्वेश्वर, उरुक्रम, वृषकपी, जयंत उरुगया ही देवांची नावे अधिक प्रचलित आणि प्रिय असल्याचा उल्लेख धार्मिक ग्रंथांमध्ये आहे. शिव य त्रेतायुगातील नागरिक यज्ञ धर्म अधिक करु लागले. त्रेतायुगात माणसाचे वय 10 हजार वर्षे होते असे सांगितले जाते. संपन्न असा हा कालखंड होता. या काळात सोन्याची नाणी चलनात होती आणि भांडी चांदीची होती. त्रेतायुगातील तीर्थक्षेत्र म्हणून नैमिषारण्याचा उल्लेख आहे. या त्रेतायुगाचा कालखंड संपत आल्यावर पापाचे प्रमाण वाढायला लागले आणि पुढे द्वापार युग सुरु झाले.
आज अयोध्यानगरीमध्ये दररोज लाखो भाविक येत आहेत. या नगरीचे स्वरुप भव्यदिव्य झाले आहे. विस्तृत रस्ते आणि स्वच्छ शहरे अशी ही नगरी 22 जानेवारी रोजी नवा इतिहास रचणार आहे. त्यामुळे सध्या कुठलेही युग असले तरी या दिवसाची नोंद भविष्यात कायम राहणार आहे.
सई बने