Home » एक सैनिक ते समाजसुधारक!

एक सैनिक ते समाजसुधारक!

by Correspondent
0 comment
Kisan Baburao Hazare | K Facts
Share

एकेकाळी आत्महत्या करायला निघालेल्या अण्णा हजारेंच्या आयुष्यात असा कोणता टर्निंग पॉईंट आला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेलं?

आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या इतिहासाची परंपरा लाभलेली आहे. ज्यांनी-ज्यांनी समाजासाठी आपले आयुष्य अर्पण केले, इतिहासाने त्या सर्व व्यक्तींची दखल घेतली. मग या इतिहास घडवणाऱ्यांमध्ये राजे-महाराजे, थोरपुरुष, राजकारणी तर काही समाजसुधारक, समाजकारणी सुद्धा होते.

आज आपण अशाच एका समाजसुधारकाच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आयुष्याची कामगिरी आणि त्यांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी कसे समर्पित केले! हे पाहणार आहोत.

आज १५ जून म्हणजेच थोर समाज सुधारक अण्णा हजारे (Kisan Baburao Hazare) यांचा जन्मदिवस. त्यांच्या जन्मदिनानिमित्त आज आपण त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या घटना आणि त्यांचा जीवन प्रवास पाहणार आहोत. चला तर मग, जाणून घेऊयात कसा होता अण्णा हजारे (Anna Hazare) यांचा सामान्य माणूस ते समाजसुधारकापर्यंतचा जीवन प्रवास.

Social Story Of Anna Hazare
Anna Hazare

मनाशी ठरवलं तर, सामान्यातून असामान्य माणूस नक्कीच घडू शकतो! याचं ज्वलंत जिवंत उदाहरण म्हणजे, अण्णा हजारे. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण आज आपण ज्यांच्याविषयी बोलणार आहोत, तेच अण्णा हजारे एकेकाळी आत्महत्या करायला निघाले होते. पण त्यांच्या आयुष्यात असा कोणता टर्निंग पॉईंट आला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. हेच आज आपण या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अण्णा हजारे यांचे पूर्ण नाव किसन बाबूराव हजारे असे आहे. त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील भिंगार या गावी वडील बाबुराव हजारे व आई लक्ष्मीबाई हजारे यांच्या पोटी दि. १५ जून १९३७ साली झाला. अण्णा हजारे यांचे वडील हे एका आयुर्वेदिक आश्रम औषध शाळेमध्ये काम करत होते. त्यामुळे त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.

घरी अठराविश्व दारिद्र्य असल्याने अण्णांना त्यांच्या आत्यांनी शिकवण्यासाठी मुंबईला आणले.  अण्णांनी मुंबईत सातवीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. दरम्यानच्या काळात भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होते. त्यामुळे सरकारने तरूणांना भारतीय सैन्यात प्रवेश घेण्याकरता आवाहन केले होते. मनात पहिल्यापासूनच समाजाप्रती आदराची भावना असल्याने, अण्णांनी सरकारच्या या आवाहनाला प्रतिसाद देत १९६३ साली सैन्यात प्रवेश घेतला.

Anna Hazare's Army Picture
Anna Hazare’s Army Picture

अण्णांनी औरंगाबाद येथे सैन्याचे ट्रेनिंग पूर्ण केले. आणि भारतीय सैन्यात त्यांनी वाहन चालक म्हणून नोकरी पत्करली. पुढे त्यांनी १५ वर्ष सैन्यात नोकरी केली. या नोकरी दरम्यान त्यांची अनेक ठिकाणी बदली झाली.

१९६५ साली पाकिस्तानने भारतावर हमला केला त्यासुमारास अण्णा खेमकरण सीमेवर तैनात होते. १२ नोव्हेंबर १९६५ ला पाकिस्तानने भारतावर हवाई हल्ला केला त्यात अण्णांचे सहकारी शहीद झाले. या युद्धाच्या काळामध्ये अण्णा यांच्या बटालियन मधील फक्त ते एकटेच जिवंत परत येऊ शकले.

मात्र आपल्या जवळील सैन्यातील सर्व मित्र शहीद झाल्याने, अण्णा निराश झाले होते. त्यांच्या डोक्यात अनेक प्रश्नांनी गोंधळ घातला होता. अशा अवस्थेमध्ये घरी परतत असताना अण्णा आत्महत्येच्या विचारपर्यंत पोहचले. आत्महत्या करण्यापुर्वी, त्यांना जीवन का नकोसे झाले आहे? असा दोन पानांचा निबंध देखील त्यांनी लिहीला होता.

पण दिल्ली रेल्वे स्थानकावर स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचे एक पुस्तक अण्णांनी विकत घेतले. ते पुस्तक वाचल्यानंतर त्यातील विचारांनी अण्णा भारावून गेले. त्या पुस्तकाने त्यांना शिकविले की मानवी जीवनाचा मुख्य उद्देश मानवतेची सेवा करणे हाच आहे. सामान्य माणसाच्या भल्याकरता काही करणं म्हणजेच परमेश्वराकरता काहीतरी केल्यासारखं आहे. या पुस्तकाने प्रेरित होऊन अण्णांनी आपला आत्महत्येचा निर्णय बदलला.

social movement against corruption
social movement against corruption

पुढे त्यांनी वयाच्या ३८व्या वर्षी म्हणजेच १९७८ मध्ये भारतीय लष्कराचा राजीनामा दिला. आणि लष्कर सोडल्यानंतर अण्णा आपल्या मूळ गावी परतले. अण्णा मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजसुधारणेसाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला.

समाजसुधारणा त्यांच्या अंगात एवढी भिनली होती. की त्या वेडापायी अण्णांनी लग्न सुद्धा केले नाही. जेव्हा अण्णा आपल्या गावी म्हणजे राळेगणसिद्धीला परतले, तेव्हा त्या गावची परिस्थिती अत्यंत दयनीय होती. संपूर्ण गाव दुष्काळाच्या झळा सोसत होते. गावात वर्षाकाठी फक्त ४०० ते ५०० मि.मी एवढा पाऊस पडत होता. ८० टक्के गाव अन्नधान्याकरता दुसऱ्याच्या गावावर विसंबुन होते. अशात अजून एक भर म्हणजे गावाच्या बाजूलाच ३० ते ४० दारूची दुकाने होती. त्यामुळे गावात दररोज भांडण तंटे असायचे.

यावर तोडगा काढण्यासाठी अण्णा पावसाच्या पाणी साठवणी अभियानात पुढे आले. पाण्याचा थेंबनी थेंब जमिनीत साठवुन जमीनीची उत्पादन क्षमता वाढवण्याकरता अण्णांनी गावातील शेतकऱ्यांना प्रशिक्षीत केले. जागोजागी पाण्याकरता चरे खोदले, बांधबंदीस्ती केली, नळ बसविले, जमिनीची उत्पादन क्षमता वाढली, स्वच्छता, पाणी व्यवस्थापन व सामाजिक सलोखा असे अनेक कार्यक्रम गावाच्या प्रगतीकरता अण्णांनी सुरू केले. पुढे सर्वांना सोबत घेऊन अण्णा हजारेंचे राळेगणसिध्दी हे गाव भारतातील पहिले आदर्श गाव बनले.

Anna Hazare: Latest News, Videos and Photos on Anna Hazare - DNA News

पुढे अण्णांनी १९९१ साली एक अभियान सुरू केले या अभियानाला ‘भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन’ असे नाव देण्यात आले. यावेळी अनेक अधिकाऱ्यांच्या विरोधात पुरावे सादर करून त्यांना कारागृहात टाकण्याची विनंती अण्णांनी केली पण सर्व अधिकारी प्रचलीत पार्टीचे अधिकारी असल्याने, त्यांची ही विनंती रद्द करण्यात आली.

या घटनेमुळे अण्णा निराश झाले आणि पद्मश्री पुरस्कार भारताच्या राष्ट्रपतींना परत केला तसेच प्रधानमंत्री इंदिरा गांधीनी दिलेला वृक्षमित्र पुरस्कार देखील परत केला. मात्र अण्णा इथेच थांबले नाहीत. तर त्याउलट त्यांनी आळंदीला आंदोलन केले. या आंदोलनामुळे ४०० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांना आणि ६ पेक्षा जास्त मंत्र्यांना आपले पद सोडून द्यावे लागले. पण अण्णा इथेही थांबले नाहीत. कारण अण्णांना पूर्ण भ्रष्टाचारी सिस्टीमच बदलायची होती.

त्यामुळे अण्णांनी माहितीचा अधिकार या अभियानाला सुरूवात केली. या अभियानाकरता १९९७ साली मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन केले परंतु सरकारने या आंदोलनाकडे दुर्लक्ष केले आणि त्यांची मागणी धुडकावुन लावली. पुढे सरकारने अण्णांना आश्वासन दिले की माहितीचा अधिकार हा कायदा बनविला जाईल परंतु राज्यसभेत त्याचा उल्लेख केला जाणार नाही.  अण्णांना हे मान्य नव्हते. म्हणून २००५ मध्ये अण्णांनी मुंबईतील आझाद मैदानावर तब्बल १२ दिवस उपोषण केले. यावेळी अण्णांची १० दिवस तब्बेत अस्वस्थ होती. म्हणून नाईलाजाने भारताच्या राष्ट्रपतींनी सर्व राज्यांमध्ये माहितीच्या अधिकाराचा कायदा लागु करण्याचे आदेश दिले. आणि अशा पद्धतीने अण्णांच्या आंदोलनाला यश आले.

पण अण्णा इथेही थांबले नाहीत. तर पुढे अण्णांनी २ सप्टेंबर २०११ रोजी लोकपाल विधेयकासाठी भारतीय जनतेला हाक दिली. आणि संबंध जनता अण्णांच्या पाठीमागे उभी राहिली.

 Anna Hazare and Arvind Kejriwal
Anna Hazare and Arvind Kejriwal

मग काय! शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनाला मदत करण्यासाठी लहान-लहान आंदोलने होऊ लागली. आणि या आंदोलनातून एकच मागणी होऊ लागली ती म्हणजे, लोकपाल विधेयक मंजूर करण्याची. अण्णांना मिळत असलेला जनतेचा पाठिंबा पाहता, सरकारलाही हे विधेयक काही प्रमाणात मान्य करावे लागले. आणि अण्णांनी याही आंदोलनात सरकारला घाम फोडत बाजी मारली.

अण्णांची कामगिरी इथेच संपत नाही, तर अण्णा प्रत्येकवर्षी २५ ते ३० गरीब जोडप्यांचे सामुहीक विवाह लावत असत. एखाद्या सभेला गेल्यानंतर त्याठिकाणी आर्थिक मदत मागून मिळालेली रक्कम गावासमोर मोजून, ती रक्कम लोकपयोगी आणतात.

अण्णांची कामगिरी बघता, भारत सरकारने त्यांना १९९० साली ‘पद्मश्री’ आणि १९९२ साली ‘पद्मभूषण’ पुरस्कारांनी सन्मानित केले. तसेच त्यांना स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी म्हणुन २५ लाख रुपयांचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. यासह ते अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत.

अशा या अण्णा हजारेंचा आज वाढदिवस… त्यानिमित्त टीम क फॅक्टस तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

– निवास उद्धव गायकवाड


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.