Home » गुडबाय प्रिन्स फिलीप…

गुडबाय प्रिन्स फिलीप…

by Correspondent
0 comment
Prince Philip, Duke of Edinburgh | K facts
Share

वयाच्या तेराव्या वर्षी ती एका युवकाच्या प्रेमात पडली… ब्रिटनच्या साम्राज्याची ती राजकुमारी आणि तो डॅनिश राजघराण्यातील. ब्रिटीश रॉयल नेव्हीमधील या कॅप्टनला पाहताक्षणी ही राजकुमारी त्याच्या प्रेमात पडली. राजघराणंच ते, त्यातून ब्रिटीश राजघराण्याचा दबदबा अवघ्या जगावर होता. त्यामुळे काहीकाळ झालेला विरोध मोडून हे दोन प्रेमी जीव विवाहाच्या बंधनात अडकले. 20 नोव्हेंबर 1947 रोजी ब्रिटनची राजकुमारी व नंतर महाराणी एलिझाबेथ आणि डॅनिश घराण्याचा राजकुमार फिलीप यांचा विवाह झाला. फिलीप त्यानंतर ड्यूक ऑफ एडिनबर्ग झाले. प्रिंन्स फिलीप अशी त्यांना नव्यानं ओळख मिळाली, ती अगदी कालपरवा पर्यंत… या शाही जोडप्याला चार्ल्स; प्रिन्स ऑफ वेल्स, अ‍ॅन; प्रिन्सेस रॉयल,  प्रिन्स अँड्र्यू; ड्यूक ऑफ यॉर्क आणि प्रिन्स एडवर्ड; वेल्सचे अर्ल, अशी चार मुलं झाली.

अत्यंत लाघवी. पत्नीच्या मागे भक्कमपणे उभा रहाणारा पती, मुलांचा प्रेमळ पिता, आईपासून दुरावलेल्या नातवांचा प्रेमळ आजोबा, आणि नातवांच्या मुलांचे अर्थात पणतूंचे लाड करणारे पणजोबा. या सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ब्रिटनच्या जनतेच्या मनातला राजकुमार अशी प्रिंन्स फिलीप यांची ओळख. गेल्याच वर्षी राणीनं आपल्या लग्नाचा 73 वा वाढदिवस साजरा केला. आता 99 व्या वर्षी राजकुमार फिलीप यांच्या निधनानंतर एकाकी झालेल्या राणीनं एका मोठ्या शून्यात आपल्याला एकाकी असल्यासारखं वाटतंय, अशी प्रतिक्रीया दिली त्यावरुनच या दोघांमधील प्रेमाची कल्पना येते.

Britain's Prince Philip dead at 99
Britain’s Prince Philip dead at 99

परांपरावादी ब्रिटीश राजघराण्याला लोकाभिमूख करण्याचे महत्त्वाचे काम प्रिंस फिलीप यांनी केले. राजघराण्यातील लग्नाचे लाईव्ह करण्याची पद्धत प्रिंन्स फिलीप यांच्याच पुढाकारातून सुरु झाली. दुस-या महायुद्धात सहभागी झालेल्या फिलीप यांची ओळख अत्यंत मितभाषी अशी होती. राजकुमारी डायनाच्या अपघाती निधनानंतर संपूर्ण राजघराणेच जनतेच्या टिकेचे लक्ष झाले होते. राणीवर तर चोहोबाजुनी टिका होत होती. अशावेळी डायनाच्या अंत्यसंस्काराच्यावेळी राणीनं घेतलेली भूमिका, ही प्रिंन्स फिलीप यांच्याच सांगण्यानुसार होती. डायनाच्या मृत्यूचा सर्वाधिक आघात प्रिन्स विल्सम्स आणि हॅरी यांच्यावर झाला होता.

या दोन नातवांच्या पाठी फिलीप आजोबा मोठ्या धैर्यानं उभे राहिले. याबरोबरच आपलं कुटुंबही त्यांनी जोडून ठेवलं. प्रिंन्स चार्लस आणि कॅमेला यांच्या विवाहातही प्रिन्स फिलीप यांचा मोठा वाटा होता. याच विवाहासारखे वादळ प्रिंन्स हॅरी आणि मेघन मार्कलच्या विवाहाच्यावेळी झाले. अमेरिकन मेघनला राणीचा विरोध होता असं म्हटलं जातं, पण फिलीप यांनी नातवाच्या मनाचा विचार केला. राणीची समजूत काढून मेघनला राजघराण्यात घेण्यात फिलीप यांची भूमिका महत्त्वाची ठरली. पुढे हॅरी आणि मेघननं राजघराण्याचा त्याग करण्याचा निर्णय घेतली. परंपरा आणि कुटुंब जपणा-या ब्रिटीश राजघराण्यात असं पहिल्यांदाच होत होतं.  पण यावेळीही फिलीप यांनी नव्या मतांना पाठिंबा दिला.

Prince Philip dead: Queen Elizabeth II's husband dies at 99

प्रिन्स फिलीप म्हणजे माझा आधार… राणी एलिझाबेथ नेहमी त्यांचा या थोडक्या शब्दात उल्लेख करायची. हे थोडे शब्दच राणी आणि फिलीप यांच्यातील प्रेम सांगण्यासाठी पुरेसं होतं. फिलीप यांच्या निधनानंतर एकाकी बसलेल्या राणीला बघितल्यावर अनेकांना पुन्हा त्यांच्या या शब्दाची आठवण झाली. ड्यूक ऑफ एडिनबर्ग प्रिंस फिलिप यांची अंतिम शाही सवारी त्यांच्या आवडत्या लैंड रोवर मधून निघाली, तेव्हा राजघराण्याबरोबर ब्रिटनचा प्रत्येक नागरिक हळहळला. हा माणूस अंत्यंत हौशी. लैंड रोवर गाडीचं मॉडेल त्यांनी स्वतः तयार केलं होतं. फिरायला जातांना ही गाडी ते नेहमी वापराचयचे. त्यातूनच त्यांचा अंतिम प्रवासही झाला. त्यांची पत्नी आणि ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ आपल्या 99 वर्षीय पतीची ही अंतिम यात्रा अत्यंत दुःखी मनानं बघत होती. प्रिंस फिलीप यांच्यावर शनिवारी विंडसर कैसलमध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यावेळी एकाकी बसलेल्या राणीला बघून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलं. 

वयाच्या तेराव्या वर्षी एलिझाबेथ आणि फिलीप यांची प्रेमकहाणी सुरु झाली. या दोघांच्या नात्यात सर्व रंग आले प्रेम, राग, लोभ, रुसवे… पण या सर्वांवर मात करुन एलिझाबेथ आणि फिलिप यांनी आपलं नातं भक्कम ठेवलं. या शाही दाम्पत्यामधील वादही शाहीच होते. एलिझाबेथ राणी झाल्यावर कोणाचे नाव लावणार हा वाद निर्माण झाला. सासरचे नाव माऊंटबॅटन तर माहेरचे विंडसर, ही दोन मोठी घराणी त्यामुळे एलिझाबेथ यांच्यावर दबावही मोठा होता.

The Prince Philip, Duke of Edinburgh
The Prince Philip, Duke of Edinburgh

शेवटी या वादात तत्कालीन ब्रिटीश पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांनी मध्यस्थी केली. राजघराण्याचं नाव बदलता येणार नाही, ही भूमिका एलिझाबेथ यांना मान्य करावी लागली.  त्यामुळे फिलीप काही काळ नाराज झाले होते. आपल्या मुलांना वडीलांच्या घराण्याचे नाव लावता येणार नाही, असं करणारा मी ब्रिटनमधील एकमेव पिता असेल, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. पण शाही दाम्पत्यामधील हा वाद काही काळानं मिटला.

फिलीप यांच्या निधनानंतर अवघं राजघराणं हळहळलं… कारण फिलीप कधीही पदाच्या मागे धावले नाहीत… ते मागे राहिले ते त्यांच्या कुटुंबाच्या आणि ब्रिटनच्या… त्यामुळेच फिलीप हे कायम या जनतेच्या मनातले प्रिन्स राहिले आणि राहतीलही.

  • सई बने

Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.