आज २८ ऑगस्ट १९१६ साली जन्मलेल्या संगीतकार राम कदम यांचा जन्म दिवस. राम कदमांनी मराठी सिनेमा संगीताचे दालन आपल्या सुरांनी समृध्द करून ठेवले आहे. दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ या चित्रपटात त्यांनी धमाल आणली होती. या सिनेमातील एका गाण्याची कथा खास रामभाऊंच्या जन्मदिनाच्या निमित्ताने !
आपल्या सिनेमात दिग्दर्शकाच्या हुकमी अस्त्राने कधीही पाऊस पडत असल्याने पावसाची अनेक गाणी धो धो वाहत असतात. अशाच एका पावसाली गाण्याची हि जन्म कथा.आपले दादा कोंडके त्या वेळी त्यांच्या पहिल्या मराठी सिनेमा ’सोंगाड्या’ च्या चित्रीकरणात व्यस्त होते.आपल्या पहिल्या सिनेमात लताच्या आवाजात एखादं तरी गाणं असावं अशी त्यांची फार इच्छा होती.
त्यांनी संगीतकार रामभाऊ कदमांशी तसं बोलूनच ठेवलं होतं. वसंत सबनीस यांच्याकडून त्यांनी एक मस्त लावणी लिहून घेतली.लावणीचे बोल होते ’राया मला पावसात नेऊ नका..’ लताबाईंच्या रामभाऊंसोबत रिहर्सल सुरू झाल्या.दादा इकडे कोल्हापूरात शूटींग मध्ये व्यस्त होते. त्यांनी रामभाऊंना लवकरात लवकर ती लावणी रेकॉर्ड करून ती पाठवायला सांगितली.
राम कदमांनी लगेच बॉम्बे लॅब बुककरून लताला सकाळी नऊ वाजता रेकॉडींग करीता बोलावले.लताबाई वेळेवर आल्या पण ’ आज घसा बरोबर नाही आज रेकॉर्डींग नको’ असं म्हणून निघून गेल्या.रामभाऊंवर जणू बॉम्बच पडला.रेकॉडींगचे भाडे इतर खर्च मराठी चित्रनिर्मात्याच्या आवाक्याच्या बाहेरचा होता.तिकडे दादा या लावणीची वाट पाहत खोळंबून बसले होते.रेकॉर्डींग रद्द कर्णे कुणालाच परवडणारे नव्हते.मग काय मार्ग काढायचा? त्यांचा एक ढोलकी पटू होता पंडीत विधाते नावाचा. रामभाऊंनी त्याला बोलावले व सांगितले’
आत्ताच्या आत्ता माहिमला जा आणि पुष्पा पागधरे ला घेवून या.येताना टॅक्सीतच तिला गाण्याची चाल समजून द्या व जमलं तर रिहर्सल घ्या! पण गाणं आज रेकॉर्ड झालचं पाहिजे’.ठरल्या प्रमाणे पुष्पा पागधरे आल्या व एक दोन टेक मध्येच लावणी रेकॉर्ड झाली सुध्दा! रामभाऊंनी लगोलग दुपारीच ती कोल्हापूरला दादांकडे पाठवून दिली व सुटकेचा निश्वास सोडला.पण खरी गंमत पुढेच आहे.
दोन दिवसांनी राम कदम कोल्हापूरला गेले. तिथल्या जवळच्या रेंदाळ या गावी शूट चालू होतं.रामभाऊ ला पाहताच दादांनी त्यांना मिठी मारली.आनंदाने ते म्हणाले’ अरे काय सुंदर लावणी बनवली आहेस.आणि लताने काय बेफाम गायलीय.युनिट मधील सर्व लोक पागल झालेत त्या लावणीने.आम्ही कालच चित्रीकरण सुध्दा करून टाकले.’
राम भाऊंनी त्यांचा उत्साह कमी झाल्यावर बाजूला घेवून रेकॉर्डींगची ’खरी स्टोरी’ दादांना सांगितली. आता आश्चर्यचकीत व्हायची पाळी दादांची होती.ज्या स्वराला सारे युनिट खुद्द दादा लताचा समजत होते तो आवाज तिचा नसून पुष्पा पागधरेचा आहे हे मान्य करायला त्यांना फार वेळ लागला!.आपल्या कडे एक म्हण आहे ’दाने दाने पे लिखा…’ त्याच चालीत आता म्हणावे लागेल ’गाने गाने पे लिखा है…’
राम भाऊंच्या संगीतात लताचे गाजलेले गाणे १९७२ साली आलेल्या ‘पिंजरा ‘ या चित्रपटात होते. केला इशारा जाता जाता (१९६५), अशीच एक रात्र होती (१९७१)पिंजरा (१९७२) चंदनाची चोळी अंग अंग जाळी(१९७५) हे त्यांचे अन्य गाजलेले सिनेमे.१९ फेब्रुवारी १९९७ ला त्यांचे निधन झाले.
– धनंजय कुलकर्णी