गहू हे भारतातीलच नव्हे तर जगभरातील प्रमुख धान्य आहे. गव्हाच्या चपात्या आणि त्यापासून बनवलेले अनेक पदार्थ आपल्या सर्वांच्याच घरात नेहमी होतात. चांगला गहू कसा ओळखावा याचेही काही नियम आहेत. ज्या गव्हाचा रंग सोनेरी पिवळा असेल तो गहू चांगला समजला जातो. साधारण लोकवन, सिहोर, सोनालिका, डोगरी, कल्याण सोना, तेजस, चंदापिसा, सरबती आदी गव्हाच्या जाती लोकप्रिय आहेत. अलिकडे काही दिवसांपूर्वी खपली गहू नावाची जात आली आहे. हा गहू लोकप्रिय होत असतांनाच बाजारात जांभळ्या रंगाचाही गहू आला. हा गहू अधिक पोषक असल्यानं त्याची किंमत जास्त असली तरी या गव्हाला मागणी वाढली. मात्र आता यापुढेही जात शास्त्रज्ञांनी चक्क काळ्या रंगाचा गहू शोधला आहे. गव्हाचे भंडार म्हणून ज्या राज्याचा उल्लेख होतो, त्या पंजाबमध्ये या काळ्या गव्हाचा शोध लावण्यात आला आहे. हा काळ्या रंगाचा गहू अधिक पोषक असून त्याची शेती करण्यासाठी विशेष वेळ किंवा पैसा खर्च करावा लागत नाही. त्यामुळे या काळ्या गव्हाच्या शेतीकडे आता शेतकरी आकर्षित होत आहे. या काळ्या गव्हाची शेतक-यांकडून एवढी लावगड होत आहे की, आता सर्वसामान्य बाजारातही अशाप्रकारचा काळा गहू मिळू लागणार आहे. (Black wheat)
अलिकडे गव्हाच्या शेतीबाबत नवे संधोधन होत आहे. त्यातूनच गव्हाच्या अनेक जाती तयार झाल्या आहेत. या गव्हाच्या जातींबरोबर गव्हाचे रंगही बदलले जात आहेत. गहू चक्क निळ्या, जांभळ्या, लाल रंगात उपलब्ध झाला आहे. आता हाच गहू काळ्या रंगाचाही तयार करण्यात आला आहे. बाजारात काळ्या गव्हाची मागणीही वाढली आहे. या काळ्या गव्हाच्या शेतीला शेतक-यांची पसंती मिळत आहे. काळ्या रंगाच्या शेतीतून शेतक-यांनाही फायदा मिळत आहे. काळ्या रंगाच्या गव्हात (Black wheat) अनेक पौष्टिक घटक असून त्याची लागवड फायदेशीर ठरत आहे. मुळात या काळ्या रंगाच्या गव्हाला मागणी वाढली आहे, कारण त्याचा रंग हा वेगळा आहे. या काळ्या गव्हापासून काळ्या रंगाचे (Black wheat) पिठ तयार होते. त्यापासून होणारे पदार्थही काळ्या रंगाचे होतात. या रंगाच्या आकर्षणामुळे गव्हाची प्रथम मागणी वाढली. मात्र नंतर या गव्हामधील पोषक घटक पुढे आल्यावर आता रंगाबरोबरच त्यातील औषधी गुणधर्मामुळे काळ्या गव्हाची मागणी वाढली आहे.
भारतात दरवर्षी लाखो शेतकरी हा तपकिरी सोनेरी पिवळ्या किंवा तपकिरी रंगाच्या गव्हाची लागवड करतात. परंतु हा गहू तयार करण्यासाठी लागणारा खर्च आणि मेहनत याच्या तुलनेत त्यांना मिळणारा नफा फारच कमी असल्याची शेतक-यांची तक्रार आहे. गेल्या काही वर्षात गव्हाचे उत्पादन वाढवण्यासाठी अनेक रासायनिक खतांचा वापर करण्यात आला. यामुळे गव्हाचे उत्पादन वाढले. मात्र त्यातील औषधी घटक कमी झाले. त्यामुळे गव्हावर संशोधन करण्याची मागणी वाढत होती. तसेच रासानिक खते न वापरता शरीराला आरोग्यदायी ठरेल अशा गव्हाची जात शोधावी अशी मागणी काही प्रगतशील शेतकरी करत होते. या शेतक-यांच्या मागणीनुसार गव्हाच्या जातीवर संशोधन करण्यात आले. त्यातूनच या विविधरंगी गव्हाच्या वाणांची निर्मिती करण्यात आली. त्यातून निळ्या, जांभळ्या रंगाच्या गव्हाची निर्मिती झाली. याबरोबरच आता काळ्या रंगाचाही गहू बाजारात आला आहे. हा गहू अत्यंत गुणकरी असून काळा गहू हा शेतक-यांसाठीही फायदेशीर ठरत आहे. कमी कालवधीतच हा काळा गहू एवढा लोकप्रिय झाला आहे की, ज्या शेतक-यांकडे त्याचे उत्पादन घेतले जाते. त्यांच्याकडून आधीच त्या गव्हाची नोंदणी केली जाते. त्यामुळे हा काळा गहू विक्रीसाठी शेतक-यांना बाजारातही जावे लागत नाही. घरबसल्या गव्हाला मागणी मिळत आहे आणि तो विकला जात आहे. (Black wheat)
======
हे देखील वाचा : चहाएवढी आता कॉफीलाही सध्या तेवढीच पसंती
======
हा काळा गहू (Black wheat) नॅशनल अॅग्री फूड बायोटेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट म्हणजेच NABI मोहाली, पंजाबमध्ये विकसीत करण्यात आला आहे. या संस्थेतील शास्त्रज्ञ गेली काही वर्ष गव्हाच्या नव्या वाणांवर संशोधन करत आहेत. त्यातूनच या काळ्या रंगाच्या गव्हाची जात शोधण्यात आली होती. याच शास्त्रज्ञांनी जांभळ्या रंगाचा गहूही तयार केला आहे. सामान्य गव्हाप्रमाणेच या गव्हाचीही पेरणी होत असून संपूर्ण प्रक्रिया देखील सारखीच आहे. या गव्हाचा रंग काळा असतो कारण या गव्हात एक विशेष प्रकारचे रंगद्रव्य आहे. त्यामुळे या गव्हाचा रंग बदलतो. या रंगद्रव्याला अँथोसायनिन म्हणतात. अँथोसायनिनची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे ते कोणत्याही फळाचा, फुलाचा किंवा खाद्यपदार्थाचा रंग अधिक गडद करते. जेवढे त्याचे प्रमाण जास्त असेल तेवढी ती वस्तू अधिक गडद रंगाची होते. सामान्य गव्हात अँथोसायनिन 5 पीपीएम इतके असते, तर काळ्या गव्हात ते 100 ते 200 पीपीएम असते. या गव्हामध्ये झिंक, लोह, प्रथिने आणि स्टार्च मोठ्या प्रमाणात आढळतात. लोहाचे प्रमाण 60 टक्के असते. हा गहू कर्करोग, मधुमेह, तणाव, हृदयविकार आणि लठ्ठपणा यासारख्या समस्यांपासून दूर ठेवत असल्याचा दावा संशोधकांनी केला आहे. काळ्या गव्हाची पेरणी तपकिरी गव्हाप्रमाणेच केली जाते. शेतकरी जेव्हा त्याची लागवड करतात तेव्हा सुरुवातीला त्याचे पीक तपकिरी गव्हासारखे दिसते, परंतु जसजसे पीक सुकू लागते, तेव्हा गहू देखील काळा होऊ लागतो. हाच काळा गहू (Black wheat) आता पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात पिकवला जात आहे. त्यासोबत अन्य राज्यातही या काळ्या गव्हाच्या वाणाची मागणी आहे. त्यामुळे भविष्यात सोनेरी गव्हासोबत निळ्या, जांभळ्या आणि काळ्या रंगाच्या गव्हाचेही उत्पादन वाढणार आहे.
सई बने