Home » चीन ठेवतोय भारतावर लक्ष; गुप्तहेर जहाज युआन वांग-5 श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल 

चीन ठेवतोय भारतावर लक्ष; गुप्तहेर जहाज युआन वांग-5 श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात दाखल 

by Team Gajawaja
0 comment
Yuan Wang 5
Share

चीन हा देश आपल्या भारतासाठी कायमची डोकेदुखी आहे. काही ना काही कारण काढून भारताला त्रास देण्याची एकही संधी हा देश सोडत नाही. एकीकडे भारताच्या सीमांवर अस्थिरता निर्माण करण्याचं काम करणारा चीन दुसरीकडे भारताच्या सर्व शेजारी राष्ट्रांमध्येही अस्थिरता निर्माण करत आहे.(Yuan Wang 5)

अलिकडेच भारताचा चांगला मित्र असलेल्या श्रीलंकेमध्ये निर्माण झालेली अराजकता ही फक्त चीनच्या हस्तक्षेपामुळे झाली, हे आता उघड झाले आहे. अशावेळी श्रीलंकेला मदत करण्याऐवजी चीनने आपले हात झटकले. पण भारतानं आपल्या शेजारी राष्ट्राला धान्यापासून युद्धविमानापर्यंतची मदत केली. एवढं होऊनही चीनची खुमखुमी अद्याप कमी झाली नाही.  

आता भारताला त्रास देण्यासाठी चीननं त्यांचं एक गुप्तहेर जहाज श्रीलंकेच्या बंदरात उतरवलं आहे. या गुप्तहेर जहाजामुळे भारताच्या केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक बंदरे चीनच्या रडारवर आली आहेत. हे चीनी गुप्तहेर जहाज नेमके आहे तरी कसे आणि त्यातील अत्याधुनिक प्रणालीमुळे भारताला कसा धोका निर्माण झाला आहे, हे जाणून घेऊया.(Yuan Wang 5)   

गुप्तहेर जहाज म्हणून ओळखले जाणारे युआन वांग-5 (Yuan Wang 5) हे जहाज श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात दाखल होत आहे. या जहाजावरुन 750 किमी अंतरापर्यंत निरिक्षण करता येऊ शकते. वांग 5 हे जहाज  उपग्रह आणि आंतरखंडीय क्षेपणास्त्रांचा मागोवा घेण्यास सक्षम आहे. त्यामुळेच हेरगिरीचा धोका लक्षात घेऊन भारताने याबाबत श्रीलंकेकडे निषेध नोंदवला होता. पण आयत्यावेळी श्रीलंकेनंही या जहाजाल परवानगी देऊन भारताला एकप्रकारे दुखावले आहे.  

हेरगिरीच्या उद्देशानं युआन वांग 5 (Yuan Wang 5) हे जहाज चीनने 2007 मध्ये बांधले. या जहाजाची ओळख शक्तिशाली ट्रॅकिंग जहाज अशी आहे. चीन किंवा इतर कोणताही देश क्षेपणास्त्राच्या चाचण्या करत असेल तेव्हा त्यांच्या हालचाली टीपण्याचे महत्त्वाचे काम या युआन वांग-5 जहाजावरील शक्तीशाली ट्रॅकींग प्रणालीद्वारे करण्यात येते. 750 किलोमीटर अंतरापर्यंत क्षमता असलेल्या या जहाजावर 400 प्रशिक्षीत सैनिक, तंत्रज्ञ, जहाज पॅराबॉलिक ट्रॅकिंग अँटेना आणि अनेक सेन्सर्स लावलेले आहेत.  

या जहाजाचे वजन सुमारे 25 हजार टन असून हे 2007 ला चीनच्या क्षेपणास्त्र देखभाल विभागात दाखल झाले. हे एक प्रकारचे research and survey vessel असल्याचं चीन सरकारचे म्हणणे आहे.  समुद्रातील प्रवाह, तळ, तसंच समुद्रात बदलणारे वातावरण याचा अभ्यास या जहाजातील प्रणालीपासून करण्यात येतो, असं चीनने सांगितलं आहे. यासाठी विविध शक्तीशाली रडार आणि तेवढीच ताकदवान अशी संदेशवहन यंत्रणा या जहाजावर तैनात आहे. अशा प्रकारची चार विविध जहाज चीनमध्ये कार्यरत आहेत.  

आता हंबनटोटा बंदरात पोहोचल्यानंतर या जहाजाला दक्षिण भारतातील कल्पक्कम, कुडनकुलम सारख्या प्रमुख लष्करी आणि आण्विक तळांवर नजर ठेवणे शक्य होणार आहे. तसेच केरळ, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशातील अनेक बंदरे चीनच्या रडारवर असतील.  त्यामुळेच चीनने हे जहाज भारताच्या प्रमुख नौदल तळ आणि आण्विक प्रकल्पांच्या हेरगिरीसाठीच आणल्याचे सांगण्यात येत आहे 

=====

हे देखील वाचा – मेड इन इंडिया हॉवित्झर तोफेमुळे भारतीय सेना अधिक सशक्त; काय आहेत याची वैशिष्ट्ये 

=====

युआन वांग-5 (Yuan Wang 5) या जहाजावर असलेल्या यंत्रणा अंतराळ आणि उपग्रह ट्रॅकिंगमध्ये प्रभावी आहेत. या जहाजावरील ट्रॅकींग प्रणाली उपग्रह, रॉकेट आणि इंटरकॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाइल्स (ICBMs) च्या प्रक्षेपणाचा मागोवा घेऊ शकते. या सर्व प्रकरणात श्रीलंकेची भूमिकाही संशय निर्माण करणारी आहे. आता चीनचे जहाज ज्या हंबनटोटा बंदरात आहे, त्याच बंदराच्या वाटाघटीवरुन श्रीलंकेची अर्थव्यवस्था पार धुळीस मिळाली आहे. एवढे होऊनही श्रीलंकेनं चीनला होकार दिल्यानं अनेकांनी शंका उत्पन्न केली आहे. हंबनटोटा बंदरासाठी चीनने श्रीलंकेला 1.5 अब्ज डॉलरचे कर्ज दिले होते. या कर्जाचे हप्तेही श्रीलंका भरु न शकल्यानं चीनने हे बंदर 99 वर्षांच्या भाडेतत्त्वावर श्रीलंकेकडून घेतले आहे. श्रीलंका आणि चीन यांच्यातील करारानुसार येथे फक्त व्यावसायिक उपक्रम चालवले जातील. असे असले तरी चीनच्या उद्दीष्टांबाबत कोणालाही शंका येईल.  (Yuan Wang 5)

परराष्ट्रव्यवहारातील काही जाणकारांच्या मते चीन हंबनटोटा बंदरातील गुंतवणुकीच्या आधारावर मोठा लष्करी तळ उभारण्याच्या तयारीत आहे. यामुळे चीन भारतावरच काय पण संपूर्ण आशिया खंडावर वर्चस्व मिळवू शकतो. अशीच शक्यता अमेरिकेच्या गुप्तचर संस्था, सीआयएनेही व्यक्त केल्यानं भारतीय संरक्षण खात्याची डोकेदुखी वाढली आहे. या जाहाजावरील यंत्रणा केवळ भारतीय उपग्रहांवर पाळत ठेवत नसून त्यावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानासह लक्ष्यही करु शकते अशी शंकाही निर्माण करण्यात आली आहे.  

भारताच्या पूर्व किनाऱ्यावर असलेल्या श्रीहरीकोट या उपग्रह प्रक्षेपण स्थळाचा रडारद्वारे वेध घेण्याची क्षमता या जहाजात आहे. तसंच भारताच्या दक्षिण भागात अवकाशातून जाणाऱ्या उपग्रहांवर लक्ष ठेवण्याची क्षमताही या जहाजात आहे. बंगालच्या उपसागरात भारतीय नौदलाची गस्त चालू असते यावरही नजर ठेवणे चीनला या जहाजामुळे शक्य होणार आहे. तसंच बंगलाच्या उपसागरात भारत सातत्याने विविध पल्ला असलेल्या आंतरखंडीय क्षेपणास्त्रांच्या चाचण्या करत असतो त्याचा माग काढणे या जहाजद्वारे शक्य आहे. मात्र या सर्व शक्यतांना चीनच्या परराष्ट्र खात्यानं नकार दिला आहे. 

चीनच्या परराष्ट्र खात्यानं चीनचा उद्देश स्वच्छ असल्याचं स्पष्ट केलं आहे. हे जहाज फक्त इंधन भरण्यासाठी हंबनटोटा बंदरात थांबले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण चिनचा इतिहास बघता या सर्व शक्यतांबाबत भारत अतिशय सावधगिरीची भूमिका घेत आहे. याबाबत श्रीलंकेला समज देऊनही या जहाजाच्या स्वागताचा कार्यक्रम झाला, ही भारतासाठी अधिक चिंतेची बाब ठरली. हे जहाज श्रीलंकेच्या बंदरात दाखल झाल्यावर श्रीलंकेतील चीनचे राजदूत क्यूई झेनहॉंग यांनी स्वागत समारंभ केला. या सर्वात भारतानं योग्य ती दखल घेतली आहे.  

सई बने


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.