Home » ऐतिहासिक वारसा लाभलेलं फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College)

ऐतिहासिक वारसा लाभलेलं फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College)

by Team Gajawaja
0 comment
Fergusson College
Share

फर्ग्युसन कॉलेज (Fergusson College)! शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यामधील ऐतिहासिक वारसा लाभलेलं कॉलेज म्हणजे फर्ग्युसन कॉलेज. या कॉलेजमध्ये शिकण्याचं स्वप्न घेऊन कित्येक विद्यार्थी पुण्यनगरीत येतात आणि इथलेच होऊन जातात. सध्या पुण्यामध्ये असणाऱ्या कित्येक नामांकित राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कॉलेजेसमध्ये १०० वर्षांहूनही जुनं असणारं ‘फर्ग्युसन कॉलेज’ आपलं स्वतंत्र अस्तित्व टिकवून ठेवून मोठ्या दिमाखात उभं आहे. काही वर्षांपूर्वीच या कॉलेजला युजीसी कडून ‘हेरिटेज’ कॉलेजचा दर्जा देण्यात आला आहे. 

भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीचा अंत आणि स्वातंत्र्यासाठी झालेला १८५७ चा अयशस्वी स्वातंत्र्यसमर यामुळे देशात स्वातंत्र्याचं एक नवीन पर्व सुरू झालं. याच पर्वामध्ये शिक्षणाचं महत्व अधोरेखित झालं आणि त्यादृष्टीने पावले उचलली गेली. 

पुण्यामध्ये वामन शिवराम जोशी, लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, महादेव बल्लाळ नामजोशी आणि गोपाळ गणेश आगरकर यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांच्या पुढाकारातून आणि  प्रयत्नांमधून उभं राहिलं फर्ग्युसन कॉलेज. केवळ १२०० रुपयांच्या देणगीच्या मदतीने डेक्कन एज्युकेशन संस्थेद्वारे (DES) स्थापन करण्यात आलेल्या फर्ग्युसन कॉलेजला आज १३७ वर्ष पूर्ण झाली.   

मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स फर्ग्युसन, शिक्षणाच्या प्रसाराबाबत आग्रही होते. कॉलेज स्थापनेसाठीचा त्यांचा पाठिंबा आणि योगदान लक्षात घेऊन कॉलेजच्या संस्थापकांनी कॉलेजला ‘फर्ग्युसन कॉलेज’ असे नाव देण्याची परवानगी मागितली आणि त्यांनीही ती आनंदाने दिली. 

कॉलेजच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्षपद भारताचे नोबेल पुरस्कार विजेते शास्त्रज्ञ सी. व्ही. रामन यांनी भूषविले होते. महात्मा गांधीजींनी या प्रसंगी प्राचार्य डॉ. जी. एस. महाजनी यांना लिहिलेल्या पत्रात  फर्ग्युसन कॉलेजबद्दल गौरवोद्गार काढले होते.  

Who will fail to be enthused over the noble record of the service rendered by the D.E. Society and the Fergusson College to the cause of education?”

– Mahatma Gandhi 

कॉलेजची स्थापना झाल्यापासून आजपर्यंत कित्येक विद्यार्थी फर्ग्युसन कॉलेजमधून शिकून गेले. अगदी स्वातंत्र्यसंग्रामातील महानायकांपासून ते सिनेसृष्टीमधील अभिनेत्यांपर्यंत, सामाजिक कार्याला वाहून घेतलेल्या समाजसुधारकांपासून ते स्वतंत्र भारतातील राजकीय नेत्यांपर्यंत, सर्वसामान्य विद्यार्थ्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्व क्षेत्रातील सामान्य आणि असामान्य व्यक्तींचा शैक्षणिक प्रवास या कॉलेजच्या इमारतीने ‘याची देही याची डोळा’ अनुभवला आहे. 

केवळ महाराष्ट्रातीलच नाही, तर देशभरातील कित्येक नामांकित आणि उच्च पदावरच्या व्यक्ती फर्ग्युसन कॉलेजचे विद्यार्थी आहेत. भारताचे माजी पंतप्रधान व्हीपी सिंग आणि पी. व्ही. नरसिंहराव यांच्यापासून कलमाडी, बाळासाहेब थोरात यांच्यापर्यंत कित्येक राजकारण्यांनी आपल्या महाविद्यालयीन शिक्षणासाठी फर्ग्युसन कॉलेजचीच निवड केली होती. तसंच महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे, प्र. के. अत्रे,  थोर सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल रामजी शिंदे, ज्येष्ठ नाटककार राम गणेश गडकरीदेखील याच कॉलेजचे विद्यार्थी आहेत. 

Pooja Batra Wiki, Age, Husband, Boyfriend, Family, Biography & More –  WikiBio

मनोरंजन क्षेत्राबद्दल बोलायचं तर ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, कै. स्मिता पाटील यांच्यासह गुलाबजाम फेम सोनाली कुलकर्णी, विरासत फेम पूजा बत्रा या अभिनेत्रीनीही फर्ग्युसन कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं आहे. दिग्दर्शक आणि अभिनेता गौतम जोगळेकर, अभिनेत्री सई परांजपे, वसंत कानेटकर याच्यासोबत एक विशेष नावदेखील या कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या यादीत आहे ते म्हणजे थोर स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर! 

किमया! किमया हा शब्द कॉलेजमधील आजी -माजी विद्यार्थ्यांच्या अंगावर रोमांच उभा करणारा शब्द आहे. कारण या शब्दाशी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांच्या गोड आठवणी जोडलेल्या आहेत. ‘किमया’ म्हणजे  फर्ग्युसन कॉलेमधील ओपन एअर थिएटर. जेव्हा तिथे कोणतेही कार्यक्रम नसतात तेव्हा तिथे फक्त आणि फक्त कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे राज्य असते. 

Taking A Trip Down Fergusson College Road, Pune

फर्ग्युसन कॉलेजचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे सन १९२९ मध्ये बांधलेले वाडिया ग्रंथालय.  एकाचवेळी ४०० विद्यार्थी बसू शकतील एवढ्या प्रशस्थ ग्रंथालयात सुमारे ४ लाखाहूनही जास्त पुस्तके आणि संशोधन जनरल आहे. 

हे ही वाचा: पुराणपुरुष भारत

केशरी वस्त्रांतील ‘ती’ समोर येते आणि आपल्या भावना व्यक्त करते!!!

सुमारे ६५ एकर क्षेत्रामध्ये व्हिक्टोरियन शैलीत बांधलेली मुख्य इमारत आजही पुण्यामध्ये दिमाखात उभी आहे. काही वर्षांपूर्वी कॉलेजने १०० वर्ष जुन्या असणाऱ्या ॲम्पिथिएटरचे नूतनीकरणही केलं आहे. 

सर्वार्थाने जुन्या-नव्याचा संगम असणाऱ्या या कॉलेजमध्ये केवळ भारतातीलच नाही, तर परदेशातील विद्यार्थीही शिक्षणासाठी येतात. भारताच्या इतिहासातील एक सुवर्णकाळ पाहिलेलं फर्ग्युसन कॉलेज आजही कित्येक विद्यार्थ्यांचं भविष्य घडवत आहे.

– मानसी जोशी


Share

Related Articles

Leave a Comment

Newsletter

Subscribe our Newsletter for new blog posts, tips. Let's stay updated!

All rights reserved by Gajawaja © Copyright 2023.