बांगलादेशातून रोज येणा-या हिंसाचाराच्या बातम्यांमध्ये तेथील बदलती राजकीय समीकरणेही लक्षात घेण्यासारखी आहेत. फेब्रुवारी २०२६ मध्ये बागंलादेशमध्ये निवडणुका होत आहेत. या निवडणुकांसाठी बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया आणि झियाउर रहमान यांचे पुत्र तारिक रहमान हे तब्बल १७ वर्षानंतर बांगलादेशात परतले आहेत. डार्क प्रिन्स या नावांनी तारिक रहमान यांना बांगलादेशात ओळखले जाते. तारिक हे पंतप्रधानपदाच्या शर्यतीत एक मजबूत दावेदार असून त्यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षासाठी त्यांचे परतणे फिनिस्क पक्षासारखे ठरणार आहे. कारण यावेळी फक्त तारिकच निवडणुकीच्या रिंगणात उतरणार नाही, तर त्यांच्यासोबत त्यांची वकील मुलगी झैमा रहमानही निवडणुकीत उतरण्याची शक्यता आहे. झैमा रहमान हिचा बांगलादेशच्या राजकारणात प्रवेश हा येथील तरुण वर्गासाठी आशेचा किरण ठरणार आहे. सुशिक्षीत असलेल्या झैमा यांच्यामुळे बांगलादेशातील कट्टरतावादावर आवर घालण्यात येईल, अशी आशा तरुणींना आहे. भावी खालिदा झिया म्हणून आत्तापासूनच झैमा रहमान यांचा उल्लेख बांगलादेशाच्या सोशल मिडियामध्ये होऊ लागला आहे.

१७ वर्षानंतर बांगलादेशमध्ये परतलेल्या तारिक रहमान यांचे स्वागत करण्यासाठी अभूतपूर्व अशी गर्दी झाली होती. तारिक यांचे हे पुनरागमन बांगलादेशच्या राजकारणाला कलाटणी देणारे ठरणार आहे. त्यासाठी त्यांच्या पक्षानं तारिक यांच्या संबंधातील प्रत्येक बातमी हायलाईट केली. सोबतच तारिक यांची कन्या झैमा रहमान यांनाही प्रसिद्धी देण्यात आली. त्यासाठी झैमाचे तारिक रहमान यांच्यासोबतच विमानातील फोटो त्यांच्या येण्यापूर्वीच सोशल मिडियावर शेअर करण्यात आले. त्यापासूनच फक्त तारिकच नव्हे तर झैमाही बांगलादेशाच्या राजकारणात प्रवेश करणार अशी अटकळ व्यक्त होत आहे. झैमा रहमान यांना बांगलादेशच्या नवीन राजकारणाचे प्रतीक मानले जात आहे. लंडनमध्ये जन्मलेल्या आणि वाढलेल्या झैमा रहमान या वकील आहेत. त्या बीएनपी प्रमुख तारिक रहमान यांच्या एकुलत्या एक कन्या आहेत, ही त्यांच्यासाठी सर्वात जमेची बाजू आहे. झैमाला आता भविष्यातील खालिदा झिया म्हणून दाखवण्यात येत आहे. यासाठी झैमाचीही तयारी सुरु झाली आहे. बांगलादेशमध्ये येण्यापूर्वी झैमानं, “मी माझ्या मुळांचे जतन करायला कधीही विसरले नाही.” असे सूचक विधान करुन आपल्या पुढील राजकीय प्रवासाची चुणूक दाखवली आहे. बांगलादेशाच्या राजकारणात तरुण वर्ग मोठ्या संख्येनं आहे.
हे देखील वाचा
Bangladesh News : बांगलादेशात पत्रकारांचे जगणं झालंय कठीण
या तरुण वर्गासाठी झैमा ही आदर्श ठरणार आहे. तारिक रहमान यांच्या बीएनपीवर भ्रष्टाचार, दहशतवादी कारस्थाने आणि सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. पक्षाची ही प्रतिमा पुसून टाकण्यासाठी रहमान आपल्या मुलीला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता अधिक आहे. झैमाच्या या राजकीय प्रवासात तिला तिच्या वडिलांची जशी मदत होणार आहे, तशीच तिच्या आजीची आणि आजोबांच्या नावाचीही मदत होणार आहे. खालिदा झिया आणि दिवंगत राष्ट्रपती झियाउर रहमान यांना मानणारा मोठा मतदार बांगलादेशात आहे. लंडनमध्ये असतांनाच झैमानं आपल्या कुटुंबाचा वारसा सांभळण्यास सुरुवात केली आहे. झैमाने तिच्या वडिलांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमातही भाग घेतला होता. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचा उदयोन्मुख चेहरा म्हणून झैमा आता निवडणूक प्रचारातही सहभागी होण्याची शक्यता आहे. झैमाही कायद्यातील पदवीधर आहे. तिने तिचे शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण लंडनमध्य़े पूर्ण केले आहे. तिने लंडनच्या क्वीन मेरी विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आणि नंतर प्रतिष्ठित लिंकन्स इनमधून बार-अॅट-लॉची पदवी मिळवली आहे.
हे देखील वाचा
बांगलादेशमधील हिंदू संकटात आहेत !
व्यवसायाने वकील असलेल्या झैमा यांना पक्षात एक आत्मविश्वासू आणि स्पष्ट वक्ता म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच निवडणूक प्रचारात झैमा आपल्या प्रभावी भाषणांनी तरुण मतदारांबरोबर पक्षाला जोडू शकणार आहे. झैमा सध्या आपल्या वडिलांसोबत रहात असून बांगलादेशातील राजकीय बदल समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. बीएनपी पक्षानं तारिक रहमान यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले तर त्यांच्या प्रचाराची सर्व सूत्रे झैमाच्या हाती राहणार आहेत. झैमा रहमान पहिल्यांदा २००१ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मीडियाच्या नजरेत आल्या होत्या. तेव्हा अवघ्या सहा वर्षाच्या असणा-या झैमा आपल्या आजीसोबत मतदान केंद्रावर गेल्या होत्या. त्या निवडणुकीत बीएनपीने प्रचंड विजय मिळवला आणि खालिदा झिया पंतप्रधान झाल्या. याच गोष्टीला जोडून बीएनपीला विजयाची स्वप्न पडत असून तारिक रहमान यांच्यासोबत झैमाही निवडणुकीच्या मैदानात आपला राजकीय वारसा सांभाळणार अशी चर्चा सुरु आहे.
