बांगलादेशातील पत्रकारांचे जगणे मुश्किल झाले आहे. ३२ वर्षीय युवा नेते शरीफ उस्मान हादी यांची हत्या झाल्यावर अवघ्या बांगलादेशात पुन्हा दंगळी सुरु झाल्या. लाखोंचा जनसमुदाय रस्त्यावर उतरला. या सर्वांनी सरकारी मालमत्तेला लक्ष केले, हिंदूंची दुकाने जाळली. सोबतच वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावून पत्रकारांनी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. राजधानी ढाका येथील प्रथम आलो आणि द डेली स्टार वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर जमावाने मोठा हल्ला केला. त्यामध्ये येथील संपूर्ण यंत्रणा नष्ट कऱण्यात आली. मोठ्या प्रमाणात संगणक तोडण्यात आले. काही लुटण्यात आले. त्यामुळे आता बांगलादेशातील पत्रकार अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी नव्हे तर स्वतःचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. या सर्वात येथील युनूस सरकार फक्त प्रेक्षकाच्या भूमिकेत आहे. कारण एवढी गंभीर घटना होऊनही युनूस अंतरिम सरकारनं नऊ जणांना अटक केली आहे. त्यामुळे मुहम्मद युनुस सरकारशी संबंधित इस्लामिक अतिरेकी बांगलादेशमध्ये पत्रकारांना लक्ष करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. इस्लामिक कट्टरपंथीयांनी देशातील दोन आघाडीच्या वृत्तपत्रांच्या कार्यालयांना आग लावून त्यांचे अस्तित्वच नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या सर्वाचा निषेध म्हणून आता बांगलादेशमधील पत्रकार रस्त्यावर उतरले आहेत. ( Bangladesh News )

Bangladesh Media and Reporters
बांगलादेशमधील हिंसाचार कमी होतांना दिसत नाही. पण हा हिंसाचार नियोजीत आहे का, असा प्रश्नही विचारला जात आहे. बांगलादेशमधील पत्रकारच हा प्रश्न आता तेथील युनूस सरकारला विचारत आहेत. पत्रकार स्वातंत्र्य आणि लोकशाही मूल्यांवरील हल्ल्यांचा निषेध करणारे फलक हातात बांगलादेशमधील अनेक पत्रकार राजधानी ढाका येथे जमले होते, त्यांनी मानवी साखळी करुन बांगलादेशमधील सध्याच्या दंगलशाहीचा निषेध केला. गेल्या काही महिन्यापासून बांगलादेशमध्ये पत्रकारांवर होणा-या हल्ल्यात वाढ झाली आहे. त्यात गुरुवारी उसळेल्या दंगलीमध्ये जाणूनबुजून पत्रकारांना लक्ष करण्यात आले. वृत्तपत्रांची कार्यलये फोडून लाखोंची लूट करण्यात आली. जे चोरता आले नाही, ते तोडण्यात आले. त्यामुळे ही वृत्तपत्रांची कार्यालये ठप्प झाली आहेत. याचा निषेध म्हणून बांगलादेशातील आघाडीच्या वृत्तपत्रांच्या संपादकांनी पत्रकारांचा “जगण्याचा अधिकार” आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यापेक्षा मोठा असल्याचे सांगितले.
गुरुवारी रात्री राजधानी ढाका येथील प्रथम आलो आणि द डेली स्टार या वृत्तपत्रांच्या कार्यालयांवर जमावाने हल्ला करत येथे आगही लावली. यातील धकाकादायक बाब म्हणजे, या आगीमध्ये चाळीसहून अधिक पत्रकार आणि कर्मचारी अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी जे पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक दाखल झाले होते, त्यांना जमावानं अडवून धरलं होतं. म्हणजेच या पत्रकारांना जिवंत जाळण्याचा उद्देशच या जमावाचा होता. पण या जमावावर पोलीसांनी कुठलिही कारवाई केली नाही, किंवा त्यातील कोणालाही अटक केली नाही. पोलिसांच्या या भूमिकेवर पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करुन देशातील लोकशाही संपल्याचे सांगितले. या निषेध मोर्चामध्ये अनेक वरिष्ठ राजकारणी, व्यावसायिक नेते आणि माध्यम क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते. यावेळी जी माहिती संबंधित पत्रकांनी दिली, त्यामुळे बांगलादेशातील सध्याचे युनूस प्रशासन कशाप्रकारे कट्टरवाद्यांच्या हाती गेले आहे, याची जाणीव होते. जेव्हा वृत्तपत्र कार्यालयांना आग लावण्यात आली होती, तेव्हा सोशल मीडियावर त्यांना जिवंत जाळा, असे मेसेज व्हायरल झाले होते. शिवाय सोशल मीडियावर दोन्ही वृत्तपत्रांच्या पत्रकारांना त्यांच्या घरात गाठून ठार करा, असे संदेशही फिरत होते. निषेध मोर्चाच्यावेळी उपस्थित पत्रकारांनी हे मेसेजही पोलिसांना दाखवून तुम्हा यांच्यावर कारवाई केली का, असा जाब विचारला. ( Bangladesh News )
=======
हे देखील वाचा : Osman Hadi : ग्रेटर बांगलादेश आणि हादीची हत्या
=======
या दोन्ही वृत्तपत्रांव्यतिरिक्त, छायानौत आणि उदीची शिल्पी गोष्ठी या सांस्कृतिक संघटनांच्या कार्यालयांनाही संतप्त जमावानं लक्ष केले. यावेळी हल्लेखोरांनी आरोप केला की, वर्तमानपत्रे भारताच्या हितासाठी काम करत आहेत. दरम्यान, ढाका महानगर पोलिसांनी या प्रकरणातील विलंबाचे स्पष्टीकरण असून त्वरित कारवाई केली तर जमाव अधिक हिंसक होण्याचा धोका होता. या सर्व हिंसक घटनांवर बांगलादेशातील मानवाधिकार संघटना आणि माध्यमांनी मोहम्मद युनूस सरकारवर परिस्थिती नियंत्रित करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप केला आहे. सोबतच माध्यम कर्मचाऱ्यांनी असा दावा केला आहे की, हा हल्ला युनूस यांच्या सरकारशी संबंधित लोकांनी घडवून आणला होता. अर्थात यावर युनूस यांनी कुठलिही प्रतिक्रीया दिलेली नाही. मात्र या सर्व हिंसाचारामुळे आणि त्यात झालेल्या नुकसानामुळे बांगलादेशमधील अनेक वृत्तपत्रांवर मोठे आर्थिक संकंटही आले आहे, त्याचा परिणाम त्यामध्ये काम करत असलेल्या पत्रकारांवरही होणार आहे. ( Bangladesh News )
सई बने
